डॉ. ज्योत्स्ना प्रभाकर राऊत (येलमुले)
मराठी विभाग महिला महाविद्यालय, गडचिरोली, मो. - ७०८३३७८७०१
गडचिरोली :- "आरोग्य परमं भाग्य स्वास्थ सर्वार्थसाधनम शरीरमाद्य खलू धर्मसाधनम" याचा अर्थ म्हणजे आरोग्य हेच आपले सर्वात मोठे भाग्य आहे. निरोगी शरीरामुळेच सर्व कामे साध्य होतात. शरीर हेच धर्म, आपले कर्तव्य पार पाडण्याचे मुख्य साधन आहे असे म्हटले जाते. सायंकाळी दिवेलागणीला देवाकडे श्लोकरुपी प्रार्थना करताना म्हटले जाते की,' शुभंकरोती कल्याणम आरोग्यम् धनसंपदा ' हा श्लोक म्हणताना, मानवाजवळ कितीही पैसा, मालमत्ता किंवा वैभव, ऐश्वर्य असले तरी जर त्याचे आरोग्य चांगले नसेल तर त्या संपत्तीचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे चांगले आरोग्य हेच सर्वात मोठे धन मानले जाते. आरोग्य चांगले असेल तरच मनुष्य सुखी जीवनाचा चांगल्या प्रकारे आनंद व उपभोग घेऊ शकतो.
'आरोग्य 'हा शब्द नेहमी आपल्या कानावर पडत असतो. पण याचा नेमका अर्थ काय? तर आरोग्य म्हणजे आपले शरीर व मन दोन्ही उत्तम अवस्थेत असणे होय. म्हणजे आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवाची वेदना किंवा तक्रार नसणे. अर्थात सर्व अवयव सुदृढ असणे होय. जागतिक आरोग्य संघटनेने ''आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक समतोलाची अवस्था होय ''असे म्हटले आहे. यावरून असे म्हणतात की, निरोगी असण्याबरोबर आपण आपल्या समाजात गुण्या - गोविंदाने, आनंदाने सर्व कार्य सुरळीतपणे पार पाडले पाहिजे म्हणजेच त्यास उत्तम आरोग्यवान मानव म्हणता येईल. एखाद्या विद्यार्थ्याचे आरोग्य चांगले असेल तरच तो विद्यार्थी अभ्यासात प्रगती करू शकतो. समजा जर एखादा विद्यार्थी खूप हुशार आहे त्याने भरपूर अभ्यास केला आणि नेमका परीक्षेच्या वेळी आजारी पडला आणि परीक्षा देऊ शकला नाही तर त्याची संपूर्ण वर्षभराची मेहनत वाया जाते म्हणून आरोग्य निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप आवश्यक असते. संतुलित आहारात फळे, भाज्या, धान्य आणि प्रथिने यांचा समावेश असावा. सकाळी व्यायाम किंवा योग केल्याने शरीर तंदुरुस्त राहते.रोगप्रतिकार शक्ती वाढते, त्याचबरोबर मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तणाव आणि चिंता, नैराश्य यामुळे मनावर व शरीरावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे सकारात्मक विचार, ध्यानसाधना आणि छंद जोपासणे यामुळे मन प्रसन्न राहाते. कुटुंब व मित्रांशी चांगले संबंध ठेवणेही मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस पैसा कमावण्याच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतो. स्वतःच्या चुकीची जीवनशैली जसे की, जंक फूड खाणे, मोबाईलच्या आहारी जाऊन उशिरापर्यंत जागरण करणे आणि व्यायाम टाळणे यामुळे शरीर आणि मन दोन्ही दुर्बल होतात. तसेच अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे वेळेवर जेवण, पुरेशी विश्रांती आणि स्वच्छता याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत माणुस कितीही श्रीमंत असला तरी त्याला सुखाचा अनुभव घेता येत नाही. या सर्व गोष्टीवरून आरोग्य हीच खरी संपत्ती मानून निरोगी राहण्यासाठी योग्य जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे 'निरोगी शरीरात निरोगी मन वास करते' हे लक्षात ठेवून सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्य चांगले असेल तर आपण सर्व कार्य सुरळीतपणे पार पाडू शकतो. शारीरिक, मानसिक दृष्ट्या निरोगी राहण्यासाठी स्वस्थ आरोग्याची गरज असते. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश रोग, उपोषण आणि आरोग्य सेवांच्या अभावाशी झुंजत होते. अशा परिस्थितीत, सर्व देशांसाठी आरोग्य धोरणे बनवू शकेल अशा जागतिक संघटनेची आवश्यकता भासू लागली. त्यातूनच जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेचा विचार पुढे आला. ७ एप्रिल १९४८ रोजी WHO(world helth orgnation) ची स्थापना झाली आणि दरवर्षी हा संस्मरणीय दिवस जागतिक आरोग्य देऊन म्हणून साजरा करण्याची परंपरा १९५० पासून सुरू झाली. त्यामुळे आज ७ एप्रिल हा केवळ जागतिक आरोग्य दिन नसून जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिन २०२६ ची थीम "आरोग्यासाठी एकत्र: विज्ञानाच्या पाठीशी उभे रहा अशी "अशी आहे. ही थीम वैद्यकीय संशोधने आणि आरोग्य प्रणाली वरील जनतेचा विश्वास बळकट करण्याच्या महत्त्वावर जोर देते.या दिवशी सरकारने आरोग्य सेवा संस्था जागरूकता कार्यक्रम आणि सामुदायिक उपक्रम राबवतात,ज्यामुळे प्रतिबंध लवकर निदान आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
जागतिक आरोग्य दिन हा केवळ एक दिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता, प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात चांगल्या सवयी अंगीकारून निरोगी राहण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. रोग होऊ नये यासाठी प्रयत्न करणे, हे रोग झाल्यावर उपाय करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. 'Prevention is better than cure', अशा अर्थाचे इंग्रजीत म्हण आहे.
जसे की आरोग्याचे काही घटक आहे.निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच यशस्वी जीवनाचे खरे गमक आहे म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती!! Helth is welth. संपत्तीचा बँक बॅलन्स महत्त्वाचा नाही तर आरोग्याचा बँक बॅलन्स चांगला असला तरच आपल्या आयुष्याला खरा अर्थ आहे. निरोगी शरीर संपदेच्या बळावर आपण कितीही धन कमावू शकतो. आपले जीवन सुखी समाधानी ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजे उत्तम आरोग्य होय म्हणूनच 'आरोग्यम् धनसंपदा' असे म्हटले जाते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या