धक्कादायक ! चंद्रपूर शहरात पतीने पत्नीला जिवंत जाळल्याची घटना, पोलीस तपास सुरु (Shocking ! A husband allegedly burned his wife alive in Chandrapur city; police investigation is underway.)
चंद्रपूर :- शहरातील गौतम नगर, महाकाली वॉर्ड येथे पतीने पत्नीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली असून उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली आहे. यासंदर्भात कमला समय्या भडके (७०), रा गौतम नगर, महाकाली वॉर्ड, चंद्रपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची नात दीक्षा शुभम भडके (२७) ही आजीसमवेत राहत होती. दीक्षाचा विवाह पाच वर्षांपूर्वी शुभम राजू भडके (२८) याच्याशी जातीरीतीनुसार झाला होता. मात्र मागील सहा ते सात महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये सतत वाद व भांडणे होत असल्याने शुभम हा आपल्या आई-वडिलांकडे वेगळा राहत होता.५ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता कमला भडके या आपल्या बहिणीकडे गेल्या होत्या. रात्री ९ वाजताच्या सुमारास त्या घरी परतल्या असता घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी घरातून दीक्षा मला वाचवा, मला वाचवा’ असे जोरजोरात ओरडत असल्याचा आवाज येत होता. दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता दीक्षा ही गंभीर अवस्थेत विव्हळत होती. तिचे अंगावरील कपडे व केस जळालेले होते. कमला भडके यांनी तात्काळ दीक्षाला दुसरे कपडे घालून दिले. तिच्या आरडाओरडीतून परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांच्या मदतीने दीक्षाला रिक्षातून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना ७ जानेवारी २०२६ रोजी दीक्षाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरुवातीला चंद्रपूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र दीक्षाचा मृत्यू झाल्यानंतर गुन्ह्यात कलम १०३ अंतर्गत खुनाचा गुन्हा वाढविण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी शुभम राजू भडके याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके करीत आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या