बल्लारपूर मध्यरात्री सशस्त्र हल्ल्याने हादरले, युवकांवर शस्त्राने गंभीर हल्ला, आरोपी फरार झाल्याचे वृत्त (Ballarpur rocked by armed attack at midnight; youths brutally assaulted, accused reportedly absconding.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर मध्यरात्री सशस्त्र हल्ल्याने हादरले, युवकांवर गंभीर हल्ला, आरोपी फरार झाल्याचे वृत्त (Ballarpur rocked by armed attack at midnight; youths brutally assaulted, accused reportedly absconding.)

बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील मौलाना आझाद वार्ड परिसरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वैमनस्यातून काही आरोपींनी एका युवकावर खंजर, चाकू व जांभीया यांसारख्या धारदार शस्त्रांनी सपासप वार करत त्याला जीवघेणा मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात निरंजन यादव हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 
           मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकित रामटेके व जखमी निरंजन यादव हे दोघे मित्र असून ते नेहमीप्रमाणे घरासमोरील निंबाच्या झाडाजवळील ओट्यावर बसले होते. दरम्यान, ५ एप्रिल रोजी रात्री सुमारे १.३० वाजताच्या सुमारास आरोपी शाहरुख शेरखान पठाण, सोहेल खान, भोकण्या भुऱ्या रा. रवींद्र नगर, बल्लारपूर तसेच बाबू आणि एक अनोळखी तरुण मोटारसायकलवरून घटनास्थळी आले. आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून निरंजन यादव याला उघडपणे जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर धारदार शस्त्रांनी अमानुष हल्ला चढवला. डोक्यावर व शरीरावर झालेल्या गंभीर वारांमुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. शहरात नाकाबंदी करून आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून पोलीस आरोपींच्या अटकेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)