स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बनावट नोटा छापखाण्यावर पोलिसांची धाड, 91 लाख 15 हजाराचा मुद्देमालासह एकास अटक (Local Crime Branch action, police raid on fake currency printing house, one arrested with goods worth Rs 91 lakh 15 thousand)
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील उर्जानगर परिसरात सुरू असलेल्या बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. राजश्री अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे तब्बल ९१ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मध्यप्रदेशातील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. चंद्रपूर शहरात बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. माहितीनुसार, १० मार्च रोजी उर्जानगर मेजर गेट परिसरातील ‘राजश्री अपार्टमेंट’ येथे काही व्यक्ती अवैधरित्या बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०३ वर छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटांचे १० बॉक्स जप्त केले. तसेच नोटा छापण्यासाठी वापरला जाणारा एप्सन कंपनीचा कलर प्रिंटर आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ९१ लाख १५ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेप्रकरणी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस करत असून या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी मध्यप्रदेशातील शुभम दिनेश नागर (वय २६) या आरोपीला ताब्यात घेतले आहे. बनावट नोटा तयार करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चंद्रपूर शहरात बनावट नोटांचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या