वृत्तसेवा :- तुम्ही म्हणता हे पुस्तक काढून टाका अस्वस्थता पसरते म्हणे ! हो, अस्वस्थता पसरते कारण सत्याला ताप असतो आणि तुमच्या सत्तेला थंडी 'ते पन्नास दिवस' हे फक्त पानांवरचे शब्द नाहीत ते रस्त्यावर वितळलेले पाय आहेत ते भुकेने आकांतलेले पोट आहेत ते घाम, रक्त आणि अश्रूंची एक अखंड यात्रा आहे रस्त्यांवर चालत नव्हते लोक ते ढकलले जात होते इतिहासाच्या कड्यावरून मुंबई ते वाराणसी ही फक्त अंतराची रेषा नव्हती ही होती वर्ग आणि जातीच्या दरम्यानची रक्ताळलेली फाळणी ते पन्नास दिवस माझ्यासाठी काळ नव्हता हा होता वर्गयुद्धाचा उघडा धडा जिथे रस्ते बनले रणांगण आणि भूक झाली घोषणाबाजी हा आजार नव्हता फक्त ही होती व्यवस्थेची चाचणी आणि तुम्ही नापास झालात कारण तुमचं गणितच चुकलेलं होतं माणूस = शून्य तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये फक्त GDP मोजलं जातं मजूर नाही ज्याच्या पायांवर उभं आहे तुमचं सगळं साम्राज्य ते पन्नास दिवस नव्हते तो तुमचा मनुवादी लॉकडाऊन होता तो होता राज्याचा उघडा कबुलीजबाब की 'माणूस' त्यांच्या जातीच्या नकाशात नव्हताच कधी ! जिथे गरीबाला सांगितलं गेलं "तुझं दुःख ही तुझीच चूक आहे!" लेखक म्हणतो हा तर नियोजित खून होता जिथे भूक ही आरोपी नव्हती तर सत्ताच खुनी होती!
कायद्याच्या नावाखाली तुम्ही पायांना साखळदंड घातले आणि मग विचारलंत का चालत नाहीत हे रस्त्यांवर पडलेले देह हे अपघात नव्हते ते होते तुमच्या उदासीनतेचे जिवंत पुरावे ! जेव्हा पवन भगतने याचा पंचनामा केला- "ते पन्नास दिवस" तुम्ही घाबरलात का? कारण त्या पानांवर तुमचा खरा चेहरा उमटला होता निरंकुश, निर्दयी आणि पूर्णपणे नागडा ! म्हणूनच तुम्ही ठरवलंत "हे शिकवायचं नाही" कारण विद्यार्थी जर समजले तर प्रश्न विचारतील लॉकडाउन कोणासाठी? रस्ता कोणाचा? देश कोणाचा? आणि प्रश्न हेच तर 'विश्वगुरू'साठी सर्वात मोठं संकट आहे ! तुम्हाला भीती आहे की एखादा विद्यार्थी पुस्तक बंद करून मूठ उगारेल आणि म्हणेल "ही व्यवस्था अन्यायाची आहे!" म्हणून विद्यापीठं आता कारखाने झालेत विचारांचे नाही तर आज्ञाधारक मेंदू तयार करण्याचे विद्यापीठाच्या भिंतींवर लिहिलं पाहिजे होतं "सत्याला प्रवेश नाही" पण तुम्ही ते पुसून टाकलं जणू इतिहासही पुसता येतो ! पण लक्षात ठेवा इतिहासाला सायलेंसर नसतो तुम्ही कादंबरी काढून टाकलीत पण रस्त्यावरचे मृतदेह कोण काढणार? तुम्ही अभ्यासक्रम बदललात पण लोकांच्या स्मृतीतल्या जखमा कोण पुसणार? 'ते पन्नास दिवस' आता आमचे शस्त्र आहेत आमचा घोष आहे आमचा पुरावा आहेत!
मरणाच्या वाटेवर एक होतात रामस्वरूप पंडित ब्रिजमोहन आरिफ आणि दिपाली त्यांच्या हातात रोटी नव्हती पण माणुसकी होती आशा होती आणि हीच मानवी आशा तुमच्या सत्तेला सर्वात जास्त धोकादायक वाटते ! जोतिरावांनी सांगितलं होतं 'विद्येविना मती गेली...' आंबेडकरांनी सांगितलं होतं "शिका, चेतवा, संघटित व्हा" पण तुम्ही काय केलं? शिक्षणातूनच संघर्ष काढून टाकलात! कादंबरी काढून टाकली कारण ती सत्य बोलते आणि तुम्हाला सत्याची अॅलर्जी आहे विद्यापीठ आता मंदिर झालंय जिथे विचारांची नाही तर आज्ञाधारकतेची पूजा होते तुम्ही भीता पुस्तकांना कारण त्यात गोळ्यांपेक्षा जास्त ताकद असते ती विचार बदलतात आणि विचार बदलले की सत्ता हादरते हे लक्षात ठेवा आम्ही फक्त वाचक नाही आम्ही इतिहासाचे लेखक आहोत तुम्ही अभ्यासक्रमातून काढाल आम्ही रस्त्यावर आणू प्रत्येक शब्द प्रत्येक जखम प्रत्येक मृत्यू ! ऐका पुस्तक काढून टाकलंत म्हणून कथा मरत नाहीत त्या रस्त्यावर पुन्हा जन्म घेतात प्रत्येक मजुराच्या पावलात प्रत्येक आईच्या हुंदक्यात प्रत्येक भुकेल्या पोटात तुम्ही अभ्यासक्रम बदलू शकता पण काळाचा अभ्यास बदलू शकत नाही ! कारण ज्या दिवशी माणूस स्वतःला फक्त 'माणूस' म्हणून ओळखेल त्या दिवशी तुमच्या सगळ्या 'सिलेबस'ना आग लागेल आणि त्या आगीतून उरेल एकच धडा प्रेम आणि बंड हेच अंतिम सत्य ! 'ते पन्नास दिवस' संपले नाहीत ते अजूनही चालू आहेत प्रत्येक भुकेल्या पोटात प्रत्येक बेरोजगार हातात प्रत्येक बंद केलेल्या पुस्तकात आणि आम्ही आम्ही लिहित राहू जळत्या अक्षरांनी तुमच्या सेन्सॉरशिपच्या राखेवर कारण क्रांती ही फक्त रस्त्यावर नसते ती पुस्तकातही असते आणि जेव्हा तुम्ही पुस्तकाला घाबरता तेव्हा आम्हाला कळतं सत्तेचा शेवट जवळ आलाय !
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या