चंद्रपूरात पहिल्यांदाच आंबेडकर जयंतीत रक्तरंजित घटना : रॅलीदरम्यान एका तरुणाची हत्या तर एक गंभीर जखमी (First-Ever Bloody Incident During Ambedkar Jayanti in Chandrapur: One Youth Murdered and Another Critically Injured During Rally)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरात पहिल्यांदाच आंबेडकर जयंतीत रक्तरंजित घटना : रॅलीदरम्यान एका तरुणाची हत्या तर एक गंभीर जखमी (First-Ever Bloody Incident During Ambedkar Jayanti in Chandrapur: One Youth Murdered and Another Critically Injured During Rally)

चंद्रपूर :- शांतता, समता आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला चंद्रपूर शहरात यंदा पहिल्यांदाच हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. आंबेडकर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान DJ वर नाचताना झालेल्या किरकोळ धक्काबुक्कीचे रूपांतर भीषण हल्ल्यात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाल्याची धक्कादायक घटना शहरातील आंबेडकर पुतळा परिसरात घडली. मृत व्यक्तीचे नाव रविकांत टेंभूरकर (वय ३३), रा. इंदिरा नगर) असे असून तो इंदिरा नगर परिसरातील रहिवासी आहे. या घटनेत अनिकेत गलबले हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
        या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा नगर येथील भीमरत्न बहुद्देशीय युवा संस्था यांच्या वतीने गांधी चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य रॅली काढण्यात आली होती. रॅली शहरातील प्रमुख मार्गाने जात असताना DJ च्या तालावर युवक मोठ्या उत्साहात नाचत होते. याचदरम्यान काही युवकांमध्ये धक्काबुक्की झाली आणि त्यातून वाद निर्माण झाला. सुरुवातीला किरकोळ असलेला हा वाद काही वेळातच उग्र बनला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी पुढे गेलेल्या रविकांत टेम्बुरकर यांच्यावर काही युवकांनी अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात अनिकेत गलबले हाही जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी जलद कारवाई करत सहा आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रेहांत पठाण (१९), शेख जिशान (२२), चेतन सोनवणे (३१), बादल भैसारे (१९), यासील शेख (३२) यांचा समावेश आहे. तसेच एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी होणारी आंबेडकर जयंती यंदा मात्र हिंसाचाराने गाजल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ही चंद्रपूर शहराच्या इतिहासातील पहिलीच अशी घटना असून, यामुळे सामाजिक ऐक्यावर आघात झाला आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)