स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ८.०१५ किलो अमली पदार्थासह एका आंतरराज्यीय तस्कराला अटक (Local Crime Branch Operation: Interstate Smuggler Arrested with 8.015 kg of Narcotics)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ८.०१५ किलो अमली पदार्थासह एका आंतरराज्यीय तस्कराला अटक (Local Crime Branch Operation: Interstate Smuggler Arrested with 8.015 kg of Narcotics)

चंद्रपूर :- अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई करत ८.०१५ किलो गांजासह एका आंतरराज्यीय तस्कराला अटक केली. ही कारवाई कुंदन प्लाझा चौक, नागपूर रोड परिसरात सापळा रचून करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती ओडिशा राज्यातून गांजाची खेप घेऊन चंद्रपूर शहरात विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुंदन प्लाझा चौक येथे नाकाबंदी करून सापळा रचला. दरम्यान, पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास संशयित इसम प्लास्टिकची पिशवी घेऊन येताना दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे ८.०१५ किलो वजनाचा ओला गांजा (पाने, फुले व बिया) आढळून आला. 
          अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शहादेव ठाकूरदास मलिक (५३, रा. ठाकूरनगर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली, सध्या रा. राष्ट्रवादी नगर, चंद्रपूर) असे आहे. आरोपीकडून सुमारे २ लाख रुपये किमतीचा गांजा तसेच एक जुना इन्फिनिक्स कंपनीचा मोबाईल असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने हा गांजा ओडिशा राज्यातून तस्करी करून आणल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अमली औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ मधील कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पो.उपनि. विनोद भुरले, पो.उपनि. सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, पोअं/ हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)