चंद्रपूरात पोलिसांच्या सतर्कतेने हत्यारांचा डाव उधळला, मोठ्या शस्त्रसाठ्यासह ७ जण पोलिसांच्या ताब्यात (Police Vigilance Foils Plot Involving Weapons in Chandrapur; 7 Individuals Detained with Large Cache of Arms)
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात धारदार शस्त्रांसह फिरत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांवर चंद्रपूर शहर पोलिसांनी मोठी व तात्काळ कारवाई केली आहे. या कारवाईत एक प्रौढ आरोपीसह एकूण ७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून तलवारी, चाकू व अन्य घातक शस्त्रांसह मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल २०२६ रोजी अटल बिहारी वाजपेयी गार्डन(बजरंग ग्राउंड), बाबुपेठ परिसरात काही युवक हातात धारदार शस्त्रे घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीसांनी संशयितांचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार नेताजी चौक परिसरातून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांपैकी काही जण विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले. त्याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हरीश पष्णु गोस्वामी (वय १९) वर्षे, रा. सोना माता मंदिराजवळ, बाबुपेठ याला अटक केली. इतर दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले.
विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान किरकोळ वाद झाला होता. रॅलीत नाचताना एका युवकाचा दुसऱ्या गटाशी धक्का लागल्याने वाद निर्माण झाला. या वादातून संतप्त झालेल्या काही युवकांनी संबंधिताला मारहाण करण्याची धमकी दिली. पुढील दिवशी म्हणजेच १५ एप्रिल रोजी तेच युवक संबंधिताच्या घरी गेले; मात्र तो तिथे न सापडल्याने त्यांनी फोनवरून धमक्या दिल्या. यानंतर संबंधित युवकाने आपल्या मित्रांना संपर्क करून काही महिन्यांपूर्वी ऑनलाईन मागविलेल्या तलवारी व अन्य शस्त्रे आणण्यास सांगितले. त्यानुसार सुमारे २० ते २५ युवक एकत्र येऊन अटल बिहारी वाजपेयी गार्डन परिसरात हातात तलवारी व धारदार शस्त्रे घेऊन प्रतिस्पर्ध्यांचा शोध घेण्यासाठी फिरत होते. मात्र समोरच्या गटाला शस्त्रे दिसताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यागंभीर घटनेनंतर आरोपींनी आपल्या ताब्यातील शस्त्रे लालपेठ कॉलरी क्रमांक २ येथील कब्रस्तानाजवळील झुडपात लपवून ठेवली होती. पोलिसांनी आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार तेथून शस्त्रे जप्त केली.
दरम्यान, आरोपी विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३) अंतर्गत धारदार शस्त्रे बाळगण्यास बंदी घातलेली असताना देखील आरोपींनी आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये एक पांढऱ्या रंगाची तलवार, एक लोंबडी मुठ असलेली तलवार, एक लोखंडी चाकू, एक लोखंडी पाईपपासून बनविलेले हत्यार, एक स्टीलचा चाकू तसेच आयफोन, विवो आणि सॅमसंग कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण सुमारे ९१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे. सदरकारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सोनवाणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, विलास निकोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सतिश अवथरे, रजनिकांत पुट्टावार, सुभाष गोहोकार, दिपक डोंगरे, इम्रान खान, संशाक बदामवार, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे तसेच चंद्रपूर शहर डिबी चे सचिन बोरकर, भावना रामटेके, संजय धोटे, निकेश ढेंगे, कपुरचंद खरवार, रूपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदुरकर, निलेश ढोक, प्रफुल भैसारे, सुशांत घिवे, दिपीका झिंगरे यांनी संयुक्त कार्यवाही केली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या