आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन ! राजेंद्र पातोडे (The Ideological Degradation of a Justice Claiming the Ambedkarite Legacy ! - Rajendra Patode)

Vidyanshnewslive
By -
0
आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन ! राजेंद्र पातोडे (The Ideological Degradation of a Justice Claiming the Ambedkarite Legacy ! - Rajendra Patode)

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ प्रतिज्ञांच्या माध्यमातून या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कनिष्ठेचा मार्ग दाखवला. "मी केवळ त्या धर्माला मानतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो," असे सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणारे जेव्हा तथाकथित 'चमत्कारी' दरबारात नतमस्तक होतात, तेव्हा त्यांचा वैचारिक पाया किती ढिसाळ आणि तडे गेलेला आहे याची जाणीव होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी नुकतीच सहकुटुंब बागेश्वर धामला दिलेली भेट आणि तिथल्या 'भोंदूगिरी'चे केलेले उदात्तीकरण हे याचेच ताजे आणि दुर्दैवी उदाहरण आहे. न्यायमूर्ती गवई ज्या पदावर बसले होते, ते पद संविधानाच्या रक्षणाचे आहे. संविधानाचे कलम ५१ अ (एच) प्रत्येक नागरिकाला 'वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चौकस बुद्धी' विकसित करण्याचे कर्तव्य बजावण्यास सांगते. अशा जबाबदार पदावरील व्यक्तीने जेव्हा 'अंधश्रद्धेचे माहेरघर' समजल्या जाणाऱ्या बागेश्वर धामसारख्या ठिकाणी जाऊन विधी-विधान करणे, हे केवळ वैयक्तिक श्रद्धेचा भाग उरत नाही. हा त्या उच्च पदाचा आणि ज्या आंबेडकरी चळवळीतून ते इथपर्यंत पोहोचले, त्या विचारांचा अपमान आहे. त्यामानाने श्याम मानव उजवे आहेत की त्यांनी ह्या भोंदू विरुद्ध थेट पोलिस तक्रार दाखल करून विरोध दर्शविला होता. ही भेट आंबेडकरी विचारधारा ह्याची शोकांतिका आणि विचारांशी प्रतारणा आहे. बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या भोंदूगिरी, कर्मकांडांविरुद्ध लढा दिला, त्याच कर्मकांडांचे समर्थन करताना आजचे तथाकथित 'आंबेडकरी' उच्चपदस्थ दिसत आहेत. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे वारंवार आपल्या विधानांतून लोकशाही मूल्ये आणि सामाजिक सलोख्याला आव्हान देत असतात. अशा व्यक्तीच्या चरणी नतमस्तक होणे म्हणजे त्यांच्या प्रतिगामी विचारांना मूक संमती देणेच होय. 
       सर्वोच्च न्यायालयात बसलेली व्यक्ती जेव्हा अशा चमत्कारांचा दावा करणाऱ्या पीठावर जाते, तेव्हा समाजातील सामान्य वर्गाला "अंधश्रद्धा पाळण्यात काहीच गैर नाही" असा चुकीचा संदेश जातो. म्हणून केवळ पद मोठे असून चालत नाही, विचारही मोठे हवे असतात. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणि धर्मांतर यांसारख्या क्रांतीकारी पावलांद्वारे कर्मकांडांच्या शृंखला तोडल्या होत्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, मानवाचा उद्धार हा विज्ञानाने आणि प्रज्ञेने होईल, चमत्काराने नाही. बागेश्वर धाममध्ये ज्या प्रकारचे 'दरबार' भरवून लोकांच्या समस्यांवर अघोरी किंवा चमत्कारिक उपाय सांगितले जातात, ते विज्ञानाच्या युगात पूर्णपणे हास्यास्पद आहेत. माजी न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी तिथे जाऊन 'सुख-समृद्धीची' कामना केली. पण ही समृद्धी विधी-विधानाने येते की सामाजिक न्यायाने आणि धर्म निरपेक्ष व्यवस्थे मुळे? हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारायला हवा आहे. गवई कुटुंबाने तिथे 'आध्यात्मिक अनुभूती' घेतली. परंतु, जिथे संविधानाच्या मूळ ढाच्यालाच नाकारले जाते, तिथे एका न्यायमूर्तीला आध्यात्मिक शांतता कशी मिळू शकते? हा केवळ वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न नाही, तर हा नैतिक जबाबदारीचा प्रश्न आहे. तुम्ही जेव्हा सार्वजनिक जीवनात सर्वोच्च पदावर असता, तेव्हा तुमचे प्रत्येक पाऊल हे समाजासाठी आदर्श किंवा मार्गदर्शक असले पाहिजे. ज्या समाजाने आरक्षणाच्या आणि संघर्षाच्या जोरावर आपल्या प्रज्ञावंतांना मोठ्या पदावर बसवले, त्या समाजाला आज 'वैज्ञानिक' नेतृत्वाची गरज आहे, ना की भोंदू कडे साकडं घालणाऱ्या 'भक्तांची' कारण "बुद्धीचा विकास करणे हेच मानवाच्या अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते सर्वात महत्वाचे आहे. त्यामानाने भूषण गवई फारच खुजे ठरले आहे.
            बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे सातत्याने भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची मागणी करत असतात. त्यांचे 'हिंदू गाव' संकल्पनेचे मॉडेल हे थेट भारतीय संविधानातील 'धर्मनिरपेक्षता' आणि 'सर्वधर्मसमभाव' या तत्त्वांना सुरुंग लावणारे आहे. ज्या संविधानाची शपथ घेऊन न्यायमूर्ती गवई यांनी न्यायदानाचे कार्य केले, त्याच संविधानाला आव्हान देणाऱ्या शक्तींसोबत ते पीठावर बसून काय साध्य करत आहेत? 'हिंदू गाव' बनवण्याच्या नावाखाली जे सामाजिक ध्रुवीकरण केले जाते, त्याला न्यायमूर्तींच्या उपस्थितीमुळे एक प्रकारचे 'सामाजिक अधिमान्यता' मिळते, जे अत्यंत घातक आहे. स्वतः ​डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सावध केले होते की, "जर हिंदू राष्ट्र ही वस्तुस्थिती बनली, तर या देशावर सर्वात मोठे संकट येईल. "स्वतःला आंबेडकरी चळवळीतून आलेले, चळवळीचा वारसा सांगणारे अशा संकटाचे स्वागत करताना दिसत आहे. ही अत्यंत धोकादायक बाब आहे. संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसून 'अंधश्रद्धेच्या धाम'ची वारी करणे हे वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. आंबेडकरी जनतेने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून, बोध घेतला पाहिजे. आम्ही सातत्याने सांगत आहोत की रा सु गवई, राजेंद्र गवई आणि भूषण गवई ह्यांनी आंबेडकरी चळवळीला मातीत घालण्याचे कामच केले आहे. त्यावर आरक्षण उपवर्गीकरण निकाल असो की आताचे भोंदू बाबा चरणी लोटांगण गवई एक टक्के देखील संविधानवादी आणि आंबेडकरी विचाराचे नाहीत हेच सिद्ध झाले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)