वृत्तसेवा :- मी....... महाडचे चवदार तळे बोलत आहे. शतकभराचा इतिहास माझ्या लाटांमध्ये साठलेला आहे. असंख्य पिढ्या माझ्या काठावर आल्या, गेल्या....... पण २० मार्च १९२७ चा दिवस मात्र आजही माझ्या स्मरणातून पुसला गेला नाही. त्यासाठी एक ऐतिहासिक कारण आहे माझ्या कुशीत साठलेले गोड पाणी निसर्गाने सर्वांसाठी दिले होते. पण माणसाने माणसात भेद केला. स्पृश्य....... आणि अस्पृश्य ! ज्यांना समाजाने अस्पृश्य ठरवले, त्यांना माझ्या पाण्याजवळ येण्यासही मनाई होती. त्यांच्या ओठांवर माझ्या पाण्याचा एक घोटही लागू नये, असा अन्याय समाजाने केला होता. कागदोपत्री निर्णय झाले... सार्वजनिक तलाव सर्वांसाठी खुले असावेत, असे मुंबई लेजिस्लेटिव्ह कौन्सिल ने १९२३ ला जाहीर केले. ५ जानेवारी १९२४ रोजी महाड नगर परिषदने मला सर्वांसाठी खुले असल्याचा दूरगामी परिणामकारक ठराव मंजूर केला. पण समाजाच्या मनातील भिंती अजूनही तशाच उभ्या होत्या......आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस २० मार्च १९२७. महाडच्या भूमीवर हजारो लोक जमले होते. त्यांच्या डोळ्यांत स्वाभिमानाची ज्योत पेटली होती. त्या जनसमुदायाच्या अग्रभागी उभे होते मानवमुक्तीचे महान योद्धे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. वातावरण फार गंभीर होते. काही लोकानी विरोध केला तरीही त्यांच्या सोबत हजारो अस्पृशा सहित, सर्व समाजातील महाड परिसरातील काही नागरिक, माझ्याकडे यायला निघाले.
बाबासाहेब माझ्या काठावर आले..... क्षणभर थांबले. आणि त्यांनी माझे पाणी आपल्या ऑजळीत घेऊन प्राशन केले. त्यांच्या स्पर्शाने मीही थरथरुन गेलो.
त्या दिवशी त्यांनी केवळ पाण्याचा घोट घेतला नव्हता..... तर शतकानुशतकांच्या अन्यायाला आव्हान दिले होते! हजारोनी त्यांना साथ दिली. त्या क्षणी माझ्या पाण्याने एक सामाजिक क्रांती पाहिली- मानवी मूलभूत हक्कांसाठींची क्रांति हीच ती ऐतिहासिक घटना महाड चवदार तळे सत्याग्रह. त्या दिवसापासून महाड ही केवळ एक नगरी राहिली नाही....... ती बनली - क्रांतिभूमी! समतेची आणी मानवतेची ! पण संघर्ष अजून संपला नव्हता. बाबासाहेबांनी न्यायालयातही लढा दिला. दहा वर्षांच्या संघर्षानंतर १९३७ साली न्यायालयानेही सांगितले माझे पाणी सर्वांचे आहे. काळ पुढे सरकत गेला... महाड वाढले, माझ्या भोवती घरे उभी राहिली. लोकांच्या गरजा वाढल्या........ आणि माझ्या पाण्यावर त्याचा परिणाम झाला. ते गढुळ होत गेले. तरीही दरवर्षी हजारो लोक माझ्या काठावर येतात. क्रांती दिनी ते माझे पाणी घोटभर पितात....... आणि त्या महान मानवी हक्काच्या संघर्षाला वंदन करतात. त्या क्रांतीला लवकरच शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. या शताब्दी वर्षात माझ्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरू आहे. माझे पाणी पुन्हा स्वच्छ आणि निर्मळ व्हावे यासाठी शासनातर्फे प्रयत्न होत आहेत. माझी हया प्रसंगी सर्वाना एक विनंती आहे, जसे आपण मला स्वच्छ करायच ठरविले तसेच सर्वांनी आपली मनेसुद्धा स्वच्छ करणे फार गरजेचे आहे. तेच खरे परिवर्तन आहे इतिहासातील त्या महान दिवसाचा........ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी घडवलेल्या मानवतेच्या क्रांतिचा आणि आज सुरू असलेल्या नव्या परिवर्तनाचाही...... मी साक्षीदार आहे. मी आहे - महाडचे चवदार तळे........ समतेच्या, स्वाभिमानाच्या आणि मानवतेच्या मूलभूत हक्कांच्या संघर्षाचा जिवंत इतिहास.
जय भीमचा गजर राहू दे,
मानवतेचा विजय होऊ दे........
चवदार तळे सांगतंय आज,
"समता हीच खरी पूजा करू!"
डॉ. हर्षदीप कांबळे, भा.प्र.से.
प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या