चंद्रपूर मनपातील स्थायी समिती सदस्यांची निवड, काँग्रेसमध्ये गटबाजी कमी होण्याऐवजी वाढल्याची चिन्ह...! (The election of standing committee members in Chandrapur Municipal Corporation is a sign that factionalism in the Congress has increased instead of decreasing...!)
चंद्रपूर :- चंद्रपूरमध्ये संधी असतानाही आपापसातील मतभेदांमुळे सत्ता गमावणाऱ्या काँग्रेसमधील गटबाजी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर मनपातील स्थायी समिती सदस्यांची निवड करण्यासाठी आज गुरुवार दि. 6 फरवरीला दुपारी 1:00 वा महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात महासभा बोलावण्यात आली. त्यात एकूण सोळापैकी काँग्रेसच्या वाट्याला सात जागा आल्या असल्या तरी, या सर्व सातही जागांवर विजय वडेट्टीवार गटाचे नगरसेवक नेमल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचे नगरसेवक नाराज झाले आणि महासभेवर बहिष्कार टाकत बाहेर पडले. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील सोळा सदस्यांच्या नावांवर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले. यासाठी महानगरपालिकेच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित पक्षाच्या गटनेत्यांनी दिलेल्या नावांची घोषणा महापौरांनी केली. महापौरांची निवडणूक झाल्यानंतर तत्काळ स्थायी समितीची निवड प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, एक महिना उलटूनही ही निवड न झाल्याने नगरसेवकांमध्ये मोठा असंतोष होता. काँग्रेससह सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांची भेट घेत स्थायी समिती निवडणुकीबाबत तत्काळ निर्णय घेण्याची आक्रमक मागणी केली होती. त्यानंतर गुरुवारी विशेष सभा घेत स्थायी समिती सदस्यांच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आला. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वसंत देशमुख, सचिन कात्याल, राजेश अडूर, संजीवनी वासेकर, चंदा वैरागडे, सोफिया तवंगर, विनोद लभाने हे सात सदस्य तर भारतीय जनता पक्षाचे सुभाष कासनगोटूवार, संजय कंचर्लावार, प्रज्वल कडू, सारिका संदुरकर, सविता सरकार, पुष्पा उराडे हे सहा सदस्य, त्याचप्रमाणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मनस्वी गिऱ्हे, श्रुती घटे या दोन व काँग्रेसचा मित्रपक्ष जनविकास सेनेचे पप्पू देशमुख असे एकूण सोळा सदस्य या स्थायी समितीत असणार आहेत. मात्र काँग्रेसच्या सदस्यांमध्ये सर्व नगरसेवक हे वडेट्टीवार गटाचे आहेत. त्यामुळे खासदार धानोरकर यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे स्थायी समिती सभापती निवडीच्या वेळी खासदार धानोरकर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मित्रपक्ष जनविकास सेनेचा एक सदस्य हा धानोरकर यांच्या विश्वासातील मानला जातो. या स्थायी समितीत शिंदेसेना, वंचित बहुजन आघाडी ला भोपळा मिळाला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या