बाप... म्हणजे जीवनाला आकार देणारा शिल्पकार असतो (A father... is a sculptor who shapes life.)

Vidyanshnewslive
By -
0
बाप... म्हणजे जीवनाला आकार देणारा शिल्पकार असतो (A father... is a sculptor who shapes life.)


वृत्तसेवा :- अगदी जन्माला आल्यावर पहिला आनंद होतो या बापाला. मुलगी असो वा मुलगा, आपल्या घरात नवीन पाहुणा आल्याचा आनंद तो मित्रांना पार्टी देऊन साजरा करतो. मुलाच्या जन्मापासून मनातून प्रत्येक गोष्टीची काळजी करणारा बाप. मुलं अ‍ॅडमीट असल्यावर डोळ्यांतून अश्रू न दाखवणारा बाप मनातून रडत असतो आणि प्रार्थना करत असतो, पण आपण हळवे नाही हे दाखवून किती कठोर आहे, हेच बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करतो. या जगातले मुलांचे जीवन घडविणारे आद्यगुरू म्हणजे आई-वडील. आपल्या मुलांच्या यशस्वीतेचा आनंद आई-वडिलांएवढा कुणाला होणे शक्य नाही. हे एक वेगळंच समीकरण निसर्गाने घडविलं आहे. वडिलांनी ओरडलं तर आईनं जवळ घ्यायचं, पण या सर्वामध्ये आतापर्यंत आईची महती वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून पुढे आली. साने गुरुजींनी सांगितलेली श्यामची आई, सिंधुताई सकपाळमधली मुलांची जोपासना करणारी आई आणि जगात श्रेष्ठत्व प्राप्त झालेली आई, जन्म देणारी आई ही सर्व समावेशक आई आपण वाचली, पण कठोर दिसणारा प्रेमळ मनाचा बाप आपल्या फार कमीच वाचनात आला. बापाबद्दल एक असं व्यक्तिमत्त्व उभं केलं आहे की, रागीट स्वभावाचा वेळोवेळी दम देणारा ज्याच्यापासून मुलं थोडी घाबरून असतात असा असणारा; असे हे व्यक्तिमत्त्व या समाजाने रेखाटलं आहे, पण प्रत्यक्षात अंतर्मनाचा बाप कुणी लिहिलाच नाही. मुलांच्या प्रत्येक घडणीत बाप उभा राहतो. आईला आधार बापाचा असतो. एखाद्या प्रसंगात मुलाची बाजू सांगायची तर बाप आल्यावर एक धाक निर्माण होतो. या बापाला आयुष्यात अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात, स्वत:ला वगळून घरच्यांसाठी हे त्याचे नेहमीचे समीकरण. मुलांच्या समाधानात स्वत: आनंद मानून घेणारा हा माणूस. प्रत्येक गोष्ट बायकोसाठी, मुलांसाठी, आईसाठी, अशा मताचा हा राकट माणूस. दिसायला कठोर; वागण्यात ताठर मन, मनाने हळवा असलेला हा बाप स्वत:चं दु:ख स्वत:मध्ये लपवून जीवन जगत असतो. कर्ता करविता असल्याने सर्व चिंतेच्याच गोष्टी असतात. आर्थिक चणचण, कामाचा, प्रवासाचा ताण, हे सर्व सहन करून घरात त्याला आपण आनंदी आहे हे भासवावे लागते. आपण कितीही टेन्शनमध्ये असलो आणि कामावरून थकून आलो आणि मुलांनी हट्ट केला की, बाबा आपण खेळूया तर त्यांच्या आनंदात तो सहज सामावून जातो असा हा बाप. मुलं बहुतेक गोष्टी आईकडे शेअर करतात कारण बाबाची भीती वाटते, पण ही भीती या समाजाने निर्माण केलीय. बाबांच्या मनातले तुमच्या बद्दलचे आचार-विचार तो सांगत बसत नाही. जमेल तेवढा तुम्हाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो. मुलांपेक्षा मुलींना बाबा आवडतो. कारण बाबाचा जीव मुलींवर फार असतो आणि माहीत नाही पण, अगदी लहानाची मोठी, शाळेत जाताना शाळेतल्या मिटिंगला एवढंच नाही, कुठेतरी जायचं तर बाबाचा हात पकडून त्यांना जायचे असते. लग्न झाल्यावर बापाला भेटून रडणारी मुलगी, कठोर बापही खूप भावनाविवश होऊन रडतो, कारण हिला सततची चिंता आपल्या लेकीची असते. अंगाखांद्यावर खेळणारी गोजीरवाणी आता आपल्या नजरेआड होणार ही कल्पना त्याला सहन होणारी नसते. मुलांच्या फीसाठी ओढाताण करणारा हा बाप चिंतेची बाब कधी घरात दाखवत नसतो. अनेक गोष्टी मनातल्या मनात स्वत:लाच समजवत असतो. आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये, आपण स्वत: सर्व पेलवू शकतो एवढी हिंमत या बाप माणसात असते. मुलांच्या शिक्षणासाठी, अ‍ॅडमिशनसाठी, नोकरीसाठी कितीही कुणाकडे पाय-या झिजवाव्या लागल्या तरी हा बाप खंबीर असतो. त्याला धास्ती असते मुलांच्या भविष्याची. लग्नासाठी तडजोड करणारा हा बाप असतो. प्रतिष्ठा जपताना समोरच्यांचा आदर सन्मानही ठेवतो, पण मुलीच्या बाबतीत मात्र फार चिंतातूर असतो. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पोरगी आपण परक्या घरात देतोय ती सुखी राहील ना ही चिंता सतत डोक्यात असते. पैशापेक्षा नाते टिकले पाहिजे. तिच्या चेह-यावरच्या हास्याने या बाबाची छाती फुगते, तिच्या यशाने डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतात असा आहे हा बाप. सर्वानाच बाप कळतो असे नाही आणि ज्यांना मिळाला त्याची किंमत सर्वानाच असते असेही नाही. कारण हा बाप बहुरंगी कलाकार आहे. ऑफिसला गेल्यावर ऑफिससारखा वागतो, लोकलमध्ये तिथल्या लोकांसारखा आणि घरात एक कुटुंबप्रमुख म्हणून वागतो. असा हा बाप आणि त्यातला माणूस ज्यांना कळला त्यांनी बाबाच्या भावनांचा आदर करा. रागाने बाबाबरोबर बोलणं बंद केलंत तरी बाबाला राहवत नाही. मुलांवर हात उगारला तर रात्रभर मनातून रडणारा बाप समजायला वेळ लागतो. बाप दुष्ट नसतो. रागीट असतो, पण शिस्तीशी तडजोड करणारा नसतो. तो लाड करेल पण, अवगुणांना आश्रय देणार नाही. कुणासमोर मान झुकवावी लागणार नाही याची काळजी घेणारा हा बाप असतो. मित्रांनो एवढंच सांगावंसं वाटतं, आई-वडिलांचा नेहमीच आदर करा. भावनांना समजून घ्या. बाबांशी पण मोकळेपणाने बोला. कारण बाप हा फक्त तुमचा बाप नाही तर जगाला पुरून उरेल एवढे त्याचे कर्तृत्व आहे. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)