शिक्षण महर्षी ॲड. बाबासाहेब वासाडे यांचे वृद्धापकाळाने निधन, राजकीय वर्तुळातुन शोकसंवेदना (Education Maharishi Adv. Babasaheb Vasade passes away due to old age, condolences from political circles)

Vidyanshnewslive
By -
0
शिक्षण महर्षी ॲड. बाबासाहेब वासाडे यांचे वृद्धापकाळाने निधन, राजकीय वर्तुळातुन शोकसंवेदना (Education Maharishi Adv. Babasaheb Vasade passes away due to old age, condolences from political circles)

चंद्रपूर :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी सारख्या उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वासाडे यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. अभियांत्रिकी बीआयटी महाविद्यालय बामणी स्थापनेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच मुल व परिसरातील शैक्षणिक चळवळीला गती देण्यासाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले. शिक्षण महर्षी ही उपाधी त्यांना त्यांच्या या कार्यामुळे लाभली. शिक्षण, सहकार व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून हजारो विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी दिशा दाखवणारे शिक्षण महर्षी ॲड बाबासाहेब वासाडे (८१) यांचे शुक्रवारी दि. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता वृद्धापकाळाने व दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सहकार व राजकीय क्षेत्रातील एक भक्कम स्तंभ हरपला आहे. कृषी जीवन विकास प्रतिष्ठान, येनबोडी व शिक्षण प्रसारक मंडळ, मुल या संस्थांचे ते माजी अध्यक्ष होते. राजकारणातील अनेक मोठ्या नेत्यांशी त्यांचे स्नेह व निकटचे संबंध होते. विशेषतः माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांचे ते निकटवर्ती सहकारी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण कार्यकर्त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांच्या निधनाने वासाडे कुटुंबियांवर शोककळा पसरली असून त्यांचे मागे तीन मुलं, सुना व नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरून शांतीधामकडे निघणार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली असून, विद्यार्थ्यांसाठी सतत झटणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आता आपल्या सोबत नसल्याची खंत सर्वत्र व्यक्त होत आहे. यासोबतच खा. प्रतिभाताई धानोरकर, माजी गृह राज्यमंत्री, हंसराज अहिर, माजी खासदार नरेश बाबू पुगलिया, आ. सुधिर भाऊ मुनगंटीवार, आ. देवराव भोंगळे, आ. विजय भाऊ वडेट्टीवार, आ. करण दैवतळे यांच्या सह राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

सहकार व शिक्षण चळवळीचे आधारस्तंभ हरपले - आ. किशोर जोरगेवार

सहकार आणि शिक्षण क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेले, सहकार व शिक्षण महर्षी बाबासाहेब वासाडे यांचे दुःखद निधन हे संपूर्ण समाजासाठी एक अपूरणीय नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने सहकार व शिक्षण चळवळीचे आधारस्तंभ हरपले असल्याची प्रतिक्रिया आपल्या शोकसंदेशातून आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे. बाबासाहेब वासाडे यांनी आपल्या कार्यातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सहकार क्षेत्राशी निगडित घटकांना नवी दिशा दिली. सहकार चळवळीचे महत्त्व आणि त्यातून होणारी सामाजिक-आर्थिक उन्नती याची जाणीव त्यांनी प्रत्येक गावागावांत पोहोचवली. त्यांच्या अथक प्रयत्नांतून जिल्ह्यात सहकाराची मजबूत पायाभरणी झाली. कॉलेज जीवनापासूनच ते राजकारणात सक्रिय झाले. या दरम्यान ते युवक काँग्रेसचे अध्यक्षही झाले. ते शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय होते. शाळा, महाविद्यालये, अभियांत्रिकी कॉलेज उभे करून त्यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक बदल घडवून आणले. ८४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. ही वार्ता मनाला चटका लावून गेली. त्यांचे कार्य केवळ सहकार क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते, तर शिक्षण, सामाजिक ऐक्य आणि समाजजागृती यामध्येही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी आपले आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी अर्पण केले आणि असंख्य तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले. आज त्यांच्या जाण्याने केवळ एक सहकार महर्षी हरपलेले नाहीत, तर संपूर्ण समाजाने एक मार्गदर्शक, एक दूरदर्शी नेता आणि एक समाजकारणी गमावला आहे. त्यांची पोकळी भरून निघणारी नाही. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या अपार कार्यातून समाजाला नेहमी नवी प्रेरणा मिळत राहो, अशी प्रार्थना आपल्या शोकसंदेशातून आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)