16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुवर्तन महोत्सव निमित्त चंद्रपूर शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर (Holiday declared for schools and colleges in Chandrapur city on October 16 on the occasion of Dhammachakra Anuvarthan Festival)

Vidyanshnewslive
By -
0
16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुवर्तन महोत्सव निमित्त चंद्रपूर शहरातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर (Holiday declared for schools and colleges in Chandrapur city on October 16 on the occasion of Dhammachakra Anuvarthan Festival)

चंद्रपूर :- दिनांक 15 व 16 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याकरीता चंद्रपूर व इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी होत असतात. त्यामुळे चंद्रपूर शहरात मोठया संख्येने वाहन येणे, वाहतुकीची कोंडी होणे, वाहतुक व रहदारी सुरळीत सुरू राहावी तसेच कोणतेही अनुचित घटना / दुर्घटना घडू नये म्हणून 16 ऑक्टो रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त चंद्रपूर शहरातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना एक दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30(2) (XI). (XVII), (XX) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर शहरातील सर्व अंगणवाड्या, पुर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे तसेच शासकीय/निमशासकीय कार्यालयांनी अनावश्यक गर्दी कमी ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी. नागरीकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपात्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, दूरध्वनी क्र. 07172- 250077 या यावर संपर्क साधावा, असेही जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या आदेशात नमुद आहे.
             धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल शहरामधील दीक्षाभूमी मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे 15 आणि 16 ऑक्टो रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून सदर सोहळयात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. या दरम्यान वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून दीक्षाभुमी मैदानकडे जाणाऱ्या रहदारीच्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक बंद ठेवणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने 15 ऑक्टो. च्या सकाळी 8 वाजतापासून 17 ऑक्टो. च्या 8 वाजेपर्यंत शहरातील वाहतुक व्यवस्थेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या वाहनाकरीता खालील मार्ग बंद : दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौध्द बांधवाची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक - जुना वरोरा नाका ते कलेक्टर बंगला रोड/हुतात्मा स्मारक जवळील रोड, तसेच वरोरा नाका चौक -मित्रनगर चौक ते सिंधी पंचायत भवन व मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत या सर्व परीसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच सदरचा सर्व परीसर नो पार्कीग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. अवजड वाहनाकरीता पर्यायी रहदारीचा मार्ग : 1) सदर कालावधी दरम्यान गरजेनुसार नागपूरकडून चंद्रपुरकडे येणारी सर्व प्रकारची जड़ वाहने ही हॉटेल कुंदन प्लाझा येथून सीटीपीएस मार्गे नेहरू नगरवरून मुल रोडला जातील. 2) मुलकडून नागपुरकडे जाणारी जड वाहने ही बंगाली कॅम्प, सावरकर चौक, वरोरा नाका उडाणपुल या मार्गाने जातील. किंवा नेहरू नगर वरून सिटीपीएस मार्गे नागपुर कड़े जातील. तसेच गरजेनुसार एम.ई. एल.नाका चौक येथे सदर वाहने थांबवण्यात येतील. 3) बल्लारशा कडून नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प, नेहरू नगर वरून सिटीपीएस मार्गे नागपूरकडे जातील किंवा पलीकडे बंगाली कॅम्प डि.आर.सी. बंकर, बायपास रोड येथे दीक्षाभूमी मार्गावरील अनुयायांची गर्दी पाहुन थांबवण्यात येईल.


        शहरातील दुचाकी व चारचाकी हलकी वाहनाकरिता रहदारी व्यवस्था : जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय-मित्र नगर चौक-टि. बी . हॉस्पीटल पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाकरिता (सायकल सहीत) बंद करण्यात येत आहे. पाण्याची टाकी, विश्रामगृह, जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहना करिता (सायकल सहीत) दोन्ही बाजुने बंद करण्यात येत आहे. करिता नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळून) वरोरा नाका उड्डाण पुल सिध्दार्थ हॉटेल, बस स्टैंड, प्रियदर्शनी चौक मार्गे शहराकडे जातील. रामनगर, मित्र नगर, आकाशवाणी, स्नेहनगर, वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची टाकी –दवा बाजार - संत केवलराम चौक- दाताळा रोड मार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने, जड वाहने वगळून घेवून जातील. त्याचप्रमाणे जटपुरा गेट कडून रामनगर मार्गे जुना वरोरा नाकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने पाण्याची टाकी, प्रियदर्शनी चौक, बस स्टैंड, सिध्दार्थ हॉटेल, उड्डान पुल मार्गं नागपूरकडे जातील.
           दीक्षाभूमी सोहळयास येणाऱ्या नागरिकांकरिता वाहन पार्कींग स्थळ : 1) नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरीता शकुंतला लॉन, जनता कॉलेज समोरील पटांगण (ईदगाह मैदान) 2) शहरातून दीक्षाभूमी कडे येणारे वाहनाकरीता सेंट मायकल स्कुल मैदान, सिंधी पंचायत भवन जवळील मैदान. 3) वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातुन दीक्षाभूमीकडे येणारी वाहनाकरिता लोकमान्य टिळक हायस्कुल (जिल्हा स्टेडीयम जवळ), जीवन साफल्य गृह निर्माण सहकारी संस्था (मनोमय हॉस्पीटलच्या मागे), 4) मुल रोड, बंगाली कॅम्प, तुकुम या परिसरातुन येणाऱ्या अनुयायांनी आपली वाहने कृषी भवन जवळील ट्रॅव्हल्स स्टँड या ठिकाणी (मोटार सायकल) पार्क करावी व चारचाकी वाहने वरील दिलेल्या इतर पार्किंग स्थळी पार्क करावी. सदर अधिसूचना 15 ऑक्टो च्या सकाळी 8 वा पासून 17 ऑक्टो च्या सकाळी 8 वाजतापर्यंत अंमलात राहील. तसेच सदर अधिसूचनेच्या अमंलबजावणीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल. तरी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्यामध्ये सहभागी सर्व बौध्द बांधव / अनुयायी व जनतेने वरील वाहतुक व्यवस्थेचा वापर करून घोषित पार्कींग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवावी तसेच वाहतुक व्यवस्थेचे (नियमाचे) पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)