केरळ मधील ध्येयवेळा शिक्षक जो चक्क नदीतून पोहून विद्यार्थ्यांना विद्यार्जन करतो, 20 वर्षांपासून सुरु आहे अविरत सेवा (A teacher from Kerala who swims across rivers to teach students has been serving for 20 years)
वृत्तसेवा :- दररोज सकाळी एक माणूस पाण्यात उतरत असतो - त्याच्या हातात प्लास्टिकची एक पिशवी असते, ज्यात कपडे, जेवणाचा डबा आणि पुस्तकं असतात. तो कोणी मोठा जलतरणपटू नाही, पण त्याचं ध्येय मात्र जगावेगळं आहे. केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यातल्या पदिंजट्टुमुरी गावात राहणारे अब्दुल मलिक नावाचे हे शिक्षक गेली तब्बल २० वर्षं एका नदीतून पोहत शाळेत जात आहेत. अब्दुल मलिक हे प्राथमिक शाळेत गणिताचे शिक्षक आहेत. त्यांच्या घरापासून शाळेचं अंतर फारसं नाही, पण दररोज बसने जायचं झाल्यास तीन तास लागतात आणि तेही प्रवास खडतर आणि अस्वस्थ करणारा असतो. म्हणून त्यांनी एक वेगळा मार्ग निवडला - कडलुंडी नदी पार करत पोहून शाळेत जाण्याचा. पाण्यात पोहताना ते एका टायर ट्यूबचा वापर करतात आणि त्यामुळंच त्यांना "ट्यूब मास्टर" म्हणून ओळख मिळाली. आजवर त्यांनी एकही दिवस शाळा चुकवलेली नाही. त्यांचं शिस्तबद्ध जीवन आणि शिक्षणासाठी असलेली निष्ठा विद्यार्थ्यांमध्ये एक आदर्श निर्माण करतं. इतकंच नाही, तर त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना पोहणं शिकवणंही सुरू केलं आहे. अब्दुल मलिक हे केवळ शिक्षक नाहीत, तर पर्यावरणप्रेमी नागरिकही आहेत. नदीचं प्रदूषण वाढू नये म्हणून ते नियमितपणे विद्यार्थ्यांसह नदी स्वच्छ ठेवण्यासाठी उपक्रम राबवतात. पाण्यातील प्लास्टिक, कचरा ते स्वतः गोळा करून नदीचे संरक्षण करतात. त्यांची ही संघर्षमय आणि प्रेरणादायी कथा संपूर्ण देशभर चर्चेचा विषय बनली आहे. ग्रामीण भागातील शिक्षकांनी कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागतं, याचं हे एक सजीव उदाहरण आहे. अब्दुल मलिक यांनी परिस्थितीवर मात करत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे - जो शिक्षण, पर्यावरण आणि समर्पण या तिन्ही गोष्टींचं जिवंत प्रतीक आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या