बल्लारपूरातील असे 2 वार्ड ज्यांनी शहराला दिले 10 नगराध्यक्ष (2 wards in Ballarpur that gave 10 mayors to the city)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील किल्ला वॉर्ड व राणी लक्ष्मी वार्डचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ऐतिहासिक किल्ल्याचा समावेश असलेल्या किल्ला वॉर्डाचे वैशिष्ट्य असे की, प्रभाकरराव भास्करवार, राजारामजी डुबेरे, नारायणराव मारपल्लीवार, एम. बाल. बैरय्या, घनश्याम मुलचंदानी आणि रजनी मुलचंदानी असे एकूण सहा नगराध्यक्ष दिले आहेत. हा या वॉर्डाचा विक्रमच! त्या खालोखाल कृष्णानगर अर्थात राणी लक्ष्मी वॉर्ड येतो. या वॉर्डाने गीता वटाणे, पुंडलिकराव माकोडे, दिलीप माकोडे, आणि मुरलीधर रहिकवार असे चार नगराध्यक्ष दिले आहेत. विशेष म्हणजे वार्ड पद्धतीत व प्रभाग पद्धतीत ही या वॉर्डाची ओळख कायम राहिली आहे. विशेषतः खेडे, गाव व लहान शहरांमध्ये वॉर्ड असतात आणि त्या-त्या वॉर्डाना, त्यांना शोभेची नावे दिली जातात. प्रत्येक वॉर्डाचा एक प्रतिनिधी अर्थात नगरसेवक, त्याला त्या वॉर्डातील मतदार निवडून देऊन आपल्या वॉर्डाचा प्रतिनिधी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेत पाठवितात. एका वॉर्डाचा एकच नगरसेवक. यामुळे त्याला आपल्या पूर्ण वॉर्डाची काळजी आणि वॉर्डातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता सदा प्रयत्नशील असावे लागते. या वॉर्डाचा हा नगरसेवक अशी नगरसेवकांची शहरात ओळख असते. सन २००१ ला पहिल्यांदा वॉर्डाचे विभाजन करून प्रभाग रचना केली गेली आणि प्रत्येकी एका प्रभागातून दोन ते चार नगरसेवक निवडून देण्याची प्रथा सुरू झाली व ती आजतागायत सुरू आहे. पूर्वी, या वॉर्डाचा हा नगरसेवक असे संबोधले जाई. प्रभागानंतर अमूक प्रभागाचे अमूक नगरसेवक असे संबोधले जाते. प्रभाग पद्धतीमुळे प्रशासकीय व्यवस्थेत वॉर्डाची नावे मागे पडली आहेत. मात्र, नागरिक आपल्या वॉर्डाची नावे विसरले नाहीत. आजही ते प्रभागाचा उल्लेख करतांना त्यातील आपल्या वॉर्डाचे आवर्जून नाव घेतात. प्रभाग पद्धत सुरू झाली. आता तीच पद्धत सुरू राहणार आहे व कालांतराने वॉर्डाची नावे विस्मरणात जाऊन प्रभाग क्रमांक हीच ओळखणार असणार आहे, ग्रामपंचायत आणि नगरपंचायतमध्ये आहे त्याप्रमाणे ! बल्लारपुरात सन १९५१-५६ च्या नगरपालिका सत्रात सात वा आठ वॉर्ड होते. त्यावेळी रेल्वे वॉर्ड, किल्ला वॉर्ड, डेपो वॉर्ड, कालरी वॉर्ड असे वॉर्डाची नावे होती. लोकसंख्या वाढली तशी वॉर्डाची संख्या वाढली आणि त्या त्या वॉर्डाना त्या त्या वॉर्डातील वैशिष्ट्याप्रमाणे नावे देण्यात आलीत. या शहरात थोर पुरुषांच्या नावांनी अनेक वॉर्ड आहेत. बरेचदा वॉर्डाची नावं बदलत गेली. मात्र, किल्ला वार्ड आणि रेल्वे वार्ड यांची नावे पूर्वीपासून तर आतापर्यंत तशीच कायम आहेत.
संकलन/मार्गदर्शन :- मा. वसंत खेडेकर, ज्येष्ठ पत्रकार, बल्लारपूर
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या