चंद्रपूर :- आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात एकूण 497 शासकीय आश्रमशाळा कार्यान्वित आहे. या आश्रमशाळा व वसतीगृहात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयीसुविधा, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून ‘संवाद चिमुकल्यांशी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 7 फेब्रुवारी 2025 रोजी आदिवासी विकास विभागातील कार्यरत अधिकारी / कर्मचारी हे एका शासकीय आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृहात मुक्कामी राहणार आहेत. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेनुसार सदर अभियानाच्या अनुषंगाने, आदिवासी विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी सर्व अपर आयुक्त आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सर्व प्रकल्प अधिकारी यांना निर्देश जारी केले आहेत. यात 7 फेब्रुवारी रोजी प्रत्येक शासकीय आश्रमशाळेत प्रकल्प कार्यालयातील एक अधिकारी मुक्कामी राहतील. मुलींच्या आश्रमशाळेत महिला अधिका-यांची नेमणूक करावी. भेट देणा-या अधिका-यांनी पूर्णवेळ व रात्री मुक्काम करून शाळेतील सर्व सोयीसुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. भेट देणा-या अधिका-यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून आपला अभिप्राय नोंदवावा. मुख्याध्यापक स्तरावर सोडविण्यात येणा-या अडीअडचणी कालबध्द वेळेत पूर्ण कराव्यात, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. शासकीय आश्रमशाळा / वसतीगृहात या बाबींची होणार पाहणी : विद्यार्थ्यांची उपस्थिती, पटावरील संख्या, शिक्षक / कर्मचा-यांची माहिती, अन्नधान्याचा दर्जा, कोठीगृह रजिस्टर, अन्नधान्य व भाजीपाला साठवणुकीची पध्दत, स्वयंपाकाचा गॅस, शेगडीची व्यवस्था, आश्रमशाळा व वसतीगृहातील पिण्याच्या पाण्याची व आंघोळीच्या गरम पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ फिल्टर मशीन लावले आहे का, ते सुस्थितीत आहे का, मुला-मुलींकरीता स्वतंत्र स्नानगृह व शौच्छालय, तेथील स्वच्छता, मुलींना सॅनॅटरी नॅपकीन दिले जाते का, सॅनॅटरी नॅपकीन वेंडीग मशीन लावले आहे का, विद्यार्थीनींच्या वसतीगृहात धोक्याची सुचना देणारी प्रणाली कार्यान्वित केली आहे का, मुलींना वसतीगृहात असुरक्षित तर वाटत नाही ना, विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या गाद्या, बेडशीट, उशी सुस्थितीत आहे का, वसतीगृहात व आश्रमशाळेत खिडक्या, लाईट व्यवस्था, विद्युत फिटींग, पंखे, सीसीटीव्ही बसविले आहे का, त्यापैकी किती कार्यान्वित आहे, अग्निशमन यंत्र, संगणक कक्ष, तक्रार पेटी आदी बसविले आहे का. तसेच आश्रमशाळेत किंवा वसतीगृहात विशाखा समितीची स्थापना केली आहे का. या बाबी जाणून घेण्यात येणार आहे. याबाबत द्यावा लागणार स्वयंस्पष्ट अभिप्राय : 1. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवण 2. टेट्रा पॅक दूध 3. निवास व्यवस्था 4. पिण्याचे पाणी / आंघोळीचे पाणी 5. वसतीगृह सोयीसुविधा 6. विद्यार्थ्यांची सुरक्षितता 7. शिक्षकांचे अध्यापक व अभ्यासक्रम या बाबींबाबत मुक्कामी असणा-या अधिकारी / कर्मचा-यांना स्वयंस्पष्ट अभिप्राय द्यावा लागणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या