नव्या वर्षातील पहिला उत्सव; सावित्रीबाई फुले जयंती - सुभाष वारे (The first celebration of the new year; Savitribai Phule Jayanti - Subhash Vare)

Vidyanshnewslive
By -
0
नव्या वर्षातील पहिला उत्सव; सावित्रीबाई फुले जयंती - सुभाष वारे (The first celebration of the new year;  Savitribai Phule Jayanti - Subhash Vare)
वृत्तसेवा :- ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस. शेणा, दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट सावित्री माई चालत राहिली म्हणूनच आज महिलांच्या प्रगतीचा प्रशस्त महामार्ग तयार झाला. आज या वाटेवरून चालताना सावित्री माईची आठवण तर जागवायलाच हवी. त्याची सुरुवात स्वतः पासून, स्वतःच्या घरापासून आपण सर्वांनी केली पाहिजे. दारात आकाशकंदील लावून, दरवाज्याला फुलांचे तोरण बांधून, घरासमोर रांगोळी काढून, घरात गोडाधोडाच जेवण करून आणि उंबऱ्यावर ज्ञानाची एक पणती लावून आणि त्याच बरोबर एक पुस्तक विकत घेऊन ३ जानेवारीला 'सावित्री उत्सव' घराघरात साजरा करण्याचं काम मागील काही वर्षांपासून अनेकजण करत आहेत. या दिवशी अनेक जण आपापल्या घरात "सत्य सर्वांचे आदिघर" हा अखंड सामुदायिकरित्या गातात. सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा फुले यांच्या पुस्तकातील एका उताऱ्याचे वाचन करतात. अनेक महिला, सावित्रीबाई जशी कपाळावर 'आडवी चिरी ' (कुंकू) लावायच्या तशी चिरी लावून ऑफीस, शाळा, कॉलेज मध्ये जात असतात. लोकल ट्रेन, बस, आपली कार्यालये येथे चाफ्याचे, गुलाबाचे फुल एकमेकींना देवून सावित्रीबाईं बद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. आपल्या परिसरातील समाजोपयोगी काहीतरी वैशिष्टपूर्ण काम करणाऱ्या स्त्रीला बोलावून तिला "सावित्रीच्या लेकी पुरस्कार" देवून गौरवितात. सावित्रीबाई सारखे चिरी (आडवे कुंकू) लावलेले व्यक्तिगत, सामूहिक फोटो सोशल मीडियावर टाकतात. वर्षभरात आपण अनेक सण उत्सव साजरे करत असतो. त्यातील काहींचे संदर्भ किंवा औचित्य आपल्याला कळते तर काहींचे कळत नाही. तरीही आपण ते करतो. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने स्त्री-शुद्रादीशूद्र वर्गावर जी अनेक बंधने घातली होती त्यातील शिक्षण बंदी हे सर्वात घातक बंधन होते. शिक्षणाची संधी न मिळाल्याने बहुजन समाजाचे काय काय नुकसान झाले हे महात्मा फुले यांनी साध्या सोप्या भाषेत "एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले" या आपल्या रचनेतून लोकांना समजावून सांगितले. नुसते समजावून नाही सांगितले तर स्त्री शुद्रादी शूद्रांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी जंग जंग पछाडले.या कामाला विरोध करणाऱ्या  पुरोहितशाहीशी ते थेटपणे भिडले. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाआपा शेख यांनी स्त्री शिक्षणासाठी चालविलेल्या अभियानाला वस्ताद लहुजी साळवे, तात्यासाहेब भिडे अशा अनेकांनी मदत केली. या सगळ्यांच्या प्रयत्नातून बहुजनांच्या शिक्षणाचा गाडा पुढे जात राहिला. पुढे "आम्ही भारतीय" लोकांनी भारतीय संविधान स्वीकृत केले.
      भारतीय संविधानाने जात, धर्म, लिंग असा कुठलाही भेद न करता शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची भूमिका घेतली. महात्मा फुले, सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांनी सुरू केलेल्या मोहिमेला कायद्याचे पाठबळ मिळाले. आपल्या सर्वांच्या आयुष्यात एवढे सकारात्मक परिवर्तन घडविण्यास कारणीभूत ठरलेल्या सावित्रीबाईंची कृतज्ञ आठवण "सावित्री उत्सव" साजरा करत काढणे ही आपली जबाबदारीच आहे, वर्षाचा पहिला सण म्हणून. "सावित्री उत्सव" साजरा करताना वरील सगळ्या गोष्टी करतानाच आपण आणखीही काही गोष्टी करू शकतो.  म. जोतिबा फुले, सावित्रीबाई, फातिमा शेख, लहुजी वस्ताद, तात्यासाहेब भिडे यांच्या पिढीनंतर कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, मामासाहेब जगदाळे अशा अनेक महामानवांनी बहुजनांमधील शिक्षण प्रसाराच्या कामास गती दिली. "सावित्री उत्सव" २०२४ साजरा करताना या कामात आपलाही खारीचा वाटा म्हणून, पुढील वर्षभरात आपण आणखी एखादी महत्त्वाची कृती करण्याचा निर्धार करु शकतो. सत्यशोधक विचारांशी जोडून घेण्याचा निश्चय करु शकतो.
"आपण काय करु शकतो!"
१) आपल्या संपर्कात असणाऱ्या कष्टकरी कुटुंबातील एका मुलीचा वर्षाचा शैक्षणिक खर्च पुर्णपणे किंवा अंशतः भागविण्याचा निर्धार करणे, २) आपल्या संपर्कातील कष्टकरी कुटुंबातील एका मुलीस गणित/इंग्रजीसारखे अवघड विषय शिकविण्याचा निर्धार करणे, ३) आपल्या संपर्कातील एका कष्टकरी कुटुंबातील सर्वांसाठी किमान एक लाख रुपयांचा सामूहिक आरोग्यविमा काढून देण्याचा निर्धार करणे, ४) शिक्षण आणि आरोग्य सेवा सर्वांच्या आवाक्यात यायच्या असतील तर, सरकारी शिक्षण व्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट होणे हाच यावरील खरा उपाय आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील बेलगाम खाजगीकरण रोखले पाहिजे. शासनाने या व्यवस्थांवरील खर्च वाढवला पाहिजे, या मागणीसाठी सुरू असलेल्या अभियानात तसेच त्यासाठीच्या शांततामय जनआंदोलनात सहभागी होण्याचा निर्धार आपण करू शकतो. बहुजनांच्या दारात शिक्षणाची पहाट उजाडावी म्हणून आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाईंचा वारसा पुढे नेण्यासाठी एवढे तर आपण करूच शकतो, नाही का ?

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)