चंद्रपूरातील ऊर्जानगर मध्ये क्रिकेटसामना सुरु असतांना मधमाशांचा हल्ला एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त (Reports indicate that a bee attack occurred during a cricket match in Urjanagar, Chandrapur, resulting in one fatality and leaving two others critically injured.)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरातील ऊर्जानगर मध्ये क्रिकेटसामना सुरु असतांना मधमाशांचा हल्ला एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी असल्याचे वृत्त (Reports indicate that a bee attack occurred during a cricket match in Urjanagar, Chandrapur, resulting in one fatality and leaving two others critically injured.)

चंद्रपूर :- चंद्रपूरमध्ये क्रिकेट स्पर्धेदरम्यान मधमाश्यांनी प्रेक्षकांवर केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रपूर शहराजवळच्या ऊर्जानगर कॉलनीतील ओआरसी क्रिकेट स्पर्धेच्या दरम्यान हा प्रकार घडला. धक्कादायक गोष्ट म्हणजे डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे खवळलेल्या मधमाश्यांनी थेट मैदानातील लोकांचा वेध घेतला, ज्यामुळे आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या 'सरपंच चषक' स्पर्धेवर अचानक शोककळा पसरली आहे. या हल्ल्यात नवेगाव शिनाळा येथील रहिवासी आणि एमएससीबीचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर रंगारी (वय 65) यांना मधमाश्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात दंश केला की, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. डीजेच्या आवाजाचा असा भयानक फटका बसेल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. 
          ऊर्जानगरच्या सरपंचांच्या वतीने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी हा सामना रंगात होता, तेव्हा मैदानात लावलेल्या डीजेचा आवाज खूप मोठा होता. या आवाजाच्या कंपनांमुळे जवळच असलेल्या एका चायनीज सेंटरजवळील मधमाश्यांचे पोळे उठले. या माश्यांनी थेट मैदानातील लोकांवर हल्ला केला. या हल्ल्यात अन्य दोन जणही जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. दुसऱ्या जखमी व्यक्तीवर वीज केंद्राच्या कॉलनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून क्रिकेट प्रेमींमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)