बल्लारपूर पोलिसांची कारवाई, दोन विविध घटनेत 3 आरोपीना देशी कट्टा तसेच धारदार लोखंडी शस्त्रासह अटक (Ballarpur Police Action: Three Accused Arrested in Two Separate Incidents, Seized with Country-made Pistols and Sharp-edged Iron Weapons.)
चंद्रपूर :- शहरातील रविंद्रनगर परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने अवैधरित्या देशी बनावटी अग्नीशस्त्र बाळगून फिरणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी चित्रपटातील थरारक पाठलागानंतर अटक केली आहे. या कारवाईनंतर दोन दिवसांपूर्वी मंदिर परिसरात झालेल्या वादाशी या घटनेचा संबंध असल्याचा संशय व्यक्त होत असून, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक हद्दीत नियमित गस्त घालत असताना खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. रविंद्रनगर वार्डातील उमाशंकर बरदानी निषाद (वय ४०) हा परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने देशी बनावटी पिस्तूल घेऊन फिरत असल्याचे समजले. माहितीची शहानिशा करून पोलिसांनी तत्काळ रविंद्रनगर परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित आरोपीने कारवा रोडच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेगाने पाठलाग करून कारवा रोडवरील सार्वजनिक शौचालयाजवळ त्याला घेराव घालत ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान आरोपीच्या कमरेमागे लपवून ठेवलेले ७.६५ एमएम बोरचे देशी बनावटी सिंगल बॅरल पिस्तूल अंदाजे किंमत २५ हजार रुपये व एक जिवंत काडतूस असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर २ एप्रिल रोजी रविंद्रनगर वार्डातील संकटमोचन मंदिर परिसरात जेवणाच्या कारणावरून वाद झाल्याची बाबही पुढे आली आहे. या वादादरम्यान महेश निषाद यांनी रमेश निषाद यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले असून, सदर घटनेचा आणि आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या अग्नीशस्त्राचा काही संबंध आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात पोउपनि अभिषेक जंगमवार, पोहवा संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, प्रविण निकोडे, मोहन निषाद, पंकज शिंदे, संतोष दंडेवार, विकास जुमनाके, नापोअं सचिन अल्लेवार तसेच पोलीस अंमलदार लखन चव्हाण, खंडेराव माने, गुरू शिंदे, मिलिंद आत्राम, शरद कारूष व अनिता नायडू यांनी केले.
तर दुसऱ्या घटनेत बल्लारपूर शहरातील कॉलरी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने धारदार लोखंडी शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या दोन इसमांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत तलवार व कोयता जप्त करण्यात आला आहे.सदर कारवाई ३ एप्रिल रोजी रात्री ९.३० वजताच्या सुमारास करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, सरदार पटेल वॉर्ड परिसरात दोन इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे समजताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. बल्लारपूर येथील कॉलरी ग्राउंड परिसरात पोलिसांनी छापा टाकला असता, दोन इसम हातात शस्त्रे घेऊन उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. हिरा सोनीलाल बहुरीया (४४), रा. श्रीराम वॉर्ड बल्लारपूर आणि रामजित मंगल राजभर (वय ५२), रा. सरदार पटेल वॉर्ड बल्लारपूर असे आरोपीचे नाव आहे.
आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये सुमारे ८२.५ सें.मी. लांबीची लोखंडी तलवार आणि ५६ सें.मी. लांबीचा लाकडी मुठ असलेला कोयता यांचा समावेश आहे. दोन्ही शस्त्रे जुनी व वापरात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात पोउपनि अभिषेक जंगमवार, पोहवा संतोष पंडीत, सत्यवान कोटनाके, प्रविण निकोडे, मोहन निषाद, पंकज शिंदे, संतोष दंडेवार, विकास जुमनाके, नापोअं सचिन अल्लेवार तसेच पोलीस अंमलदार लखन चव्हाण, खंडेराव माने, गुरू शिंदे, मिलिंद आत्राम, शरद कारूष व मपोअं अनिता नायडू यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या