ब्रम्हपुरीतील इथेनॉल प्रकल्पात भीषण स्फोट ; 2 ते 3 किलोमीटरपर्यंत धक्के, सुदैवाने जीवितहानी नाही (Massive explosion at ethanol plant in Brahmapuri; Shockwaves 2 to 3 kilometers away, fortunately no casualties)
ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी शहरालगत असलेल्या बोरगाव रोडवरील रामदेव बाबा सॉलव्हनंटस Solvents (RBS) कंपनीच्या इथेनॉल प्रकल्पात आज (दि.१९) सायंकाळी प्रचंड स्फोट होऊन भीषण आग लागली. ब्रम्हपुरी जवळील बोरगाव गावाच्या रस्त्यावर असलेल्या रामदेव बाबा Solvents फॅक्टरीच्या समोरील इथेनॉल प्रकल्पात सायंकाळी सुमारे 5:30 वाजताच्या सुमारास मोठी आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणांतच प्रचंड स्फोट झाला आणि त्याचा धक्का तब्बल 2 ते 3 किमीपर्यंत जाणवल्याने जनजीवन काही क्षणासाठी स्थिरावले. या धक्क्याचा प्रभाव बोरगाव, उदापुर, झिलबोडी, फुलेनगर, पेठवॉर्ड, धुमणखेडा, शिवाजी चौक आणि ब्रह्मपुरी शहरातील विविध भागांमध्ये स्पष्टपणे जाणवला. अनेकांनी घरं हलल्याचा अनुभव सांगितला असून काही घरांची काच फुटल्याची चर्चाही सुरु आहे.
कंपनी परिसरात 1.25 लाख लिटर इथेनॉलचा साठा असल्याचे समोर आल्याने आग अधिक भीषण स्वरूप धारण करण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रकल्प नुकताच पुन्हा सुरू झाल्याचेही समजते. घटना घडल्यानंतर ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल तसेच गडचिरोली आणि वडसा येथील फायर ब्रिगेड पथके तातडीने पोहोचली. आग मोठ्या प्रमाणात असल्याने महानगरपालिका चंद्रपूरकडून फोम सोल्यूशनसह दोन फायर टेंडरही रवाना करण्यात आली आहेत. यासोबतच पोलीस दल व डॉक्टरांची टीमही घटनास्थळी तातडीने दाखल झाली आहेत. घटनास्थळी प्रचंड धुराचे लोट उठत असून परिसरातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षा कारणास्तव परिसरातील रस्ते तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून घटनेची सखोल चौकशी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या