वृत्तसेवा :- संत कबीरा ला अलीकडे काही काम धाम दिसत नाही. आमच्या सारख्या, नेहमीच कामात असणाऱ्या कर्तव्य दक्ष, विचारी,संयमी माणसांना, कलावंतांना अविचारी, कामचोर करायला कबीर कुणाची सुपारी घेऊन आला. हे कळायला काही मार्ग नाही. निरर्थक दोहे सांगून आमचा आणि आपला वेळ दवडायला कबिरला कुठला अघोरी आनंद मिळतो.?? वेळ घालवायला इतरही जागा उपलब्ध असतांना कबीर भरल्या बाजारात येऊन उभा असतो. निरर्थक "ना लेना, ना देना मगन रहणा" असले निरर्थक दोहे सांगून..कबीरांनी बाजारात निव्वळ वेळ घालवायला यावं.. हे काही आमच्या सारख्या ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला ,आणि बाजारात जाऊन वस्तू , खरेदी करण्यासाठी पायपीट करणाऱ्या गरजू ला अजिबात पटणारं नाही. शेवटी कबिरांनी भरल्या बाजारात यावं तरी कशाला? ज्याला बाजाराचं कवडीचं ज्ञान नाही. असा माणूस बाजारात आला तर लुटलाच समजा. स्वतःच्या धंद्यावर लक्ष नाही. म्हणून डबघाईस आलेला कबीर आता अख्ख्या देशाची वाट लावायला निघाला." कबिरा खडा बाजार मे , मागें सब की खैर..ना काहू से दोस्ती, ना काहु से बैर.". आताशा जग कसं जागतिकरणाच्या, उदारीकरणाच्या आणि खाजगीकरणाच्या साचेबद्ध पंगतीत बसतंय, शिक्षणाचे बाजारीकरण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे. शेअर्स बाजाराची चढाओढ, रुपयांचे मूल्य मापन.रुपया चे घसरण. स्टाक एक्सचेंज,डॉलर ची उलाढाल. नव वासाहत वादी इथल्या मूळ आदिवासी च्या कब्जात बेकार असलेल्या जंगलातून, पडीक जमिनीतून खनीज, लोह, कोळसा काढून देशाचा बाजाराचा सन्मान करीत आहेत. जंगलात राहणाऱ्या आदिवासीना पारंपरिक जगण्याच्या साधनातून मुक्ती देऊन नव प्रवाहात आणून विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी इथला बाजार किती परिश्रम करीत आहे.
"बाजार" म्हटले की स्पर्धा आली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या ही आल्या. जाहिराती आल्या.जाहिराती चा एकमेव उद्देश म्हणजे नफा.. घर तोडून मांडव टाकणाऱ्या कबिरांनी उगाच बाजारात का बरे यावे. मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारलेल्या या देशात फक्कड कबिरांचे निरर्थक ज्ञान कसल्या कामाचे. अमेरिका, चीन सारख्या जागतिक बाजारपेठेत भारताने ही ताठ मानाने उभे राहावे म्हणून पी.व्ही.नरसिंह राव, प्रणव मुखर्जी, मनमोहन सिंग यांनी किती कष्ट उपसले.गॅट करार करून ,डंकेल च्या प्रस्तावावर लफ्फेबाज सह्या केल्यानेच, आज देशभरात मोठी औद्योगिक क्रांती झालेली दिसते. औद्योगिक कारखान्यात देश उभा करण्यासाठी कसलाही संप न करता मजूर मुकाट्याने, मिळेल त्या दरात काम करतांना दिसतो. मोठं मोठी मॉल उभे दिसतात. दूध, दही, मटण भाजीपाला, तेल, साखर, ते कुलर, टीव्ही, फ्रीज,कपडे,सौंदर्य प्रसाधने, दागिने,जुते, चप्पल एकाच बाजारात मिळतात.क्रेडिट कार्ड, फोन पें, गुगल पें, हातातील मोबाईल ने एका क्लिक ने कधी नेट कॅश द्वारे.खरेदी होते. वाण्याचा माणूस घरी वसुलीसाठी यायची झंझट नाही. मोची गल्ली, महात्मा फुले भाजी मार्केट, कपडा मार्केट, सोनार गल्ली, तेल घाना, अनाज मार्केट, फ्रुट मार्केट, पिशवी घेऊन रस्त्याने चौफेर फिरायची गरज नाही. देशाने इतकी प्रगती केली की,फुकटात मिळणारे पाणी विक्रीसाठी उपलब्ध असते. बाटलीबंद पाण्याचा व्यापार गुण्यागोविंदाने सुरू आहे. समुद्रात वाहून जाणाऱ्या कवडीमोल पाण्याला बाजारात किंमत आली. वर्तमान बाजारपेठेत विकणारा जर बलवान असला तर कचराही चढ्या भावात विकून टाकतो. म्हणून बाजारात आल्या नंतर कुणाशी तरी वैर पत्करावेच लागेल, कुणाशी तरी दोस्ती करावेच लागेल. अमेरिकेच्या दोस्ती साठी भारत किती आटापिटा करीत असतो.जीवाचे रान करीत असतो. शेजारच्या पाकिस्ताना बरोबर कायम चे वैर टिकून राहावे म्हणून वैर बजेट केल्या जाते. अलीकडे फुकटात दोस्तांना होत नसतो. ताजमहल चे चौथरे सजवावे लागतात. गंगा घाटावर पाहुण्याच्या स्वागतासाठी महा आरत्या कराव्या लागतात. भजनं गावे लागतात. होणाऱ्या नवं दोस्ता च्या बायकांचे लाड पुरवावे लागतात. रुपयात कर्ज घेऊन डॉलर मधे देण्याचे करार करावे लागतात. तेंव्हा कुठे पक्की दोस्ती होते. व्यापाराचे उगम हे वैराने झाले आहे. म्हणून वैर टिकून ठेवण्यासाठी पैसे मोजावे लागतात. दोस्ती आणि वैर हे दोन भावंडं बाजारा साठी पूरक आवश्यक असतात. दोस्ती आणि वैर महत्वाचे घटक असल्याने, घाटा लाभ तपासली जातात त्याचे ही स्वतंत्र एडिट केल्या जाते. हे बाजाराचे ज्ञान कबिराला नसल्याने कबिरांनी अर्थतज्ज्ञ पंतप्रधाना कडून शिकूनच बाजारात यावे.वैराने मतं मिळतात.मिळालेल्या मता द्वारे सत्ता स्थापन, संपादन केल्या जाते. महत्प्रयासाने मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी वैरी पगारावर पोसावे लागतात. बाजारात वैरत्व पेरणारे मोठे- मोठे एजंट असतात. त्यासाठी मुल्ला, पंडित, बाबा, महात्मे अण्णा, महंता बरोबरच मोठमोठ्या बातम्या देणाऱ्या स्टुडिओ मध्ये वैर तज्ञा ची फोज उभी करावी लागते. वैर,आणि दोस्ती फुकटात सहजपणे मिळत नसते कबीर भाऊ.. त्यासाठी कष्ट उपसावे लागतात. दोस्ती किसींसे भी की जाये. पर दुष्मनो की राय ली जाये. कबिरांनी सांगितले "आधी घागरी छलकत जाये." अर्थात आधा ज्ञान, अधुरा ज्ञान नुकसान दायक असतो. मग हे बाजारा बाबत कबिरांना कसं कळलं नसावं...सतत चढ्या किमतीत जीवनावश्यक वस्तूचा काळाबाजार होत असतांना...कबीर निव्वळ थापा मारण्यासाठी बाजारात येतो."कबिरा खडा बाजार मे लिये लुकाटी हात.जो घर फुके आपणा चले हमारे साथ" या बाबतीत अमेरिका, चीन सारख्या नवं वसाहती राष्ट्राने.लुकाटी हाताने बाजारात यायचे आणि बाजार लुटून न्यायचे, कॅशलेस बाजारपेठेत अलीकडे भारताचे महत्त्व वाढले आहे.हे कबूल करावेच लागेल. लुकाटी हाताने बाजारात जायला कबीर सांगतो आणि घर फुकुन यायचे म्हणतो,. शेवटी ज्यांनी ज्यांनी आपले घर फुकले त्यांना कबीर नेणार तरी कुठे.? कदाचित इजराईल च्या धर्तीवर फुकलेल्या, लोकांची नवं वसाहत बनवायचे असेल..तर खुशाल बनवावे. आम्ही बर्बादी गुलिस्ता मध्ये ठीकच आहोत.त्यांनीआपल्याला गृहीत धरू नये. पुंजीवादी, भोगवादी, चंगळवाद स्वीकारलेल्या लोकांना कबीर च्या घरून आणलेल्या शिदोरी आणि झाडा च्या सावलीत ला सत्संग मुळीच पसंत पडणार नाही. संत, महात्मे, बाबा, स्वामी,चे वातानुकूलित चकचकीत आश्रम आणि त्यात होणारे बलात्कार.. जितके जास्त बलात्कार, यौन शोषण त्यावरूनच आश्रमाचा स्टार दर्जा ठरतो. तेंव्हा टुकार कबिरांनी आपला गाशा गुंडाळून इथून गेलेलं बरं. हाच निर्वाणीचा सल्ला त्याच्या जयंती निमित्त द्यावासा वाटतो. परवा नागपुरातल्या इंदोरा,बेझनबाग, धंतोली, लकडपुल, ते गडकरी च्या महाल पर्यंत जाणाऱ्या, येणाऱ्या लोकांना कबीर अडवून विचारीत होता. इथला बाजार कुठे गेलाय ? समोर असलेली चावडी दिसत नाही. चावडी पुढचा बाजार दिसत नाही.? गंगा जमुना देहविक्री करणाऱ्या गजबजलेल्या बाजारात कसा शुकशुकाट दिसतोय. तीसेक वर्षे लैगिंक शरीर सेवा देणाऱ्या अर्ध वयाच्या बाई जवळ जाऊन बाजार कसं शांत दिसत आहे.लोकांची लैंगिक भूख,गरज भागली का.? हायवेवर,लोकं नपुसंक होत असल्याच्या आणि शर्तीया ईलाज च्या जाहिराती मी वाचतच आलो आहे. त्यावर ती महिला उद्दिग्न होऊन सांगू लागली, अलीकडे या बाजारात ग्राहक येतच नाही. येतात ते फक्त पोलिसच. ऑनलाइन बुकिंग वर छापील, सॉफीस्तिकेट, महिला लपून धंदा (व्यवसाय) करतात. म्हणून आमचा बाजार आता नाममात्र बाजार राहिला आहे.
स्तब्ध होऊन विचार करीत कबीर एम्प्रेस मिल जवळ आले. मजुरांच्या टोळ्या इथे सक्रिय असायच्या, जवळच रिक्षा चालक घोळक्याने बिडी फुकत बसायचे, पुढे एक बाजार होता. तो बाजार कुठे आहे. असे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवून विचारत असतांनाच . एका स्किन टाईट जीन्स, टॉप घातलेल्या पोरी ने समोरच असलेल्या एम्प्रेस मॉल कडे बोट दाखवून, बावाजी तुम्हाला हवं असलेलं हेच बाजार. पाहिजे ते इथेच मिळणार म्हणून कबिराला बोटाच्या इशाऱ्यानी दाखविले. बाजार आणि कबिरांचे नाते म्हणजे शरीर आणि प्राणा सारखे असल्याने लगेच ते भल्या मोठया प्रवेश द्वारातून आवारात शिरले.प्रशस्त गगनचुंबी इमारत .एका जाग्यावर उभे राहून लोकं सात आठ माळे चढत होते.उतरत होते.यंत्र माणसाला घेऊन जात होते. खाली आणीत होते.काचेच्या चकचकीत इमारती मध्ये आकर्षक दुकाने थाटली होती. कुठलीही भावबाजी होत नव्हती, तराजू काटा दिसत नव्हते, पासरी,पायली चा पत्ता नव्हता. तोल -मोल होत नव्हते. ट्रॉली मध्ये भर भरून ग्राहक सामान घेऊन जात होती. मसाज सेंटर, मोठी मोठी कापडाची दुकाने, शिंपी (टेलर्स) नसतांनाही अगदी मापाचे तंतोतंत कोट, पॅन्ट, शर्ट, जीन्स, मस्त पैकी विकल्या आणि खरेदी केल्या जात होते. दागदागिने, सजविले ले चकचकीत काचेचे दुकान, प्रत्येक दुकाना पुढे तरुण, तरुणीचे पुतळे उभे, इत्यादी पाहून सहज कबिरांनी एकाला बैल बाजार कुठे आहे. असे विचारले. लगेच कबिरांनी बिग बाजारात आपल्या नेहमीच्या सवयी प्रमाणे एकतारी घेऊन गाणे गायला सुरवात केले .तेंव्हा काही सुरक्षा रक्षक धावून आले. आणि गाणे म्हणण्याचा एका मोठ्या हॉल कडे कबीर ला घेऊन गेलेत.करावोके वर तरुण तरुणी गाणे म्हणत होती.कबिरांना गाणे म्हणण्याचे दर दाखवू लागले. तेव्हा कबिरांनी काढता पाय घेतला. आणि संत्रा मार्केट च्या बाजूला नवीन रेल्वे स्टेशन च्या रस्त्याने मोठ्या पुलाच्या खाली एक आठवडी चिंदी बाजार तेव्हढा सुरू होता. एक थकलेली महिला मोलकरीण,घरकामाचे काम आटपून जुने कपडे विकणाऱ्या च्या गाठोड्यात नवी साडी शोधत होती. हातात लहान मुलांचे कपडे होते. भावताव करीत होती. विकसनशील देशात जुन्या कपड्यांची "चिंदी बाजार" खुले असल्याने कबिराच्या ओठांवर हसू आले. अंग झाकण्यासाठी धडपडणाऱ्या त्या कष्टकरी महिलेच्या फाटक्या साडी कडे एक नजर,आणि जवळच्या शॉपिंग मॉल मधून भरभरून खरेदी करून घोळक्याने येणाऱ्या लोकांकडे एक नजर..
"मन मैला, तन उजला, बागुला कपटी अंग
तासे तो कोवा भला, तन मन एकही रंग".त्या बाई च्या फाटक्या साडी आणि अनवाणी पाया कडे पाहत कबिरा गात होते..कबिरा कहे ये जग अंधा..!
संकलन -: पवन भगत, चंद्रपूर, 9067611890
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या