या वर्षांपासून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची (एनईपी) अंमलबजावणी होणार, पहिलीचा अभ्यासक्रम बदलणार (The new National Education Policy 2020 (NEP) will be implemented from this year, the first grade curriculum will change.)

Vidyanshnewslive
By -
0
या वर्षांपासून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची (एनईपी) अंमलबजावणी होणार, पहिलीचा अभ्यासक्रम बदलणार (The new National Education Policy 2020 (NEP) will be implemented from this year, the first grade curriculum will change.)


वृत्तसेवा :- नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची (एनईपी) अंमलबजावणी महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात यंदापासून होत असून, जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम असेल. हे शिक्षण धोरण चार टप्प्यांत विविध वर्गांना लागू होईल आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य असेल, जूनपासून पहिलीसाठी आणि या शैक्षणिक वर्षापासून चार टप्प्यांत विविध वर्गांना नवे शैक्षणिक धोरण लागू करणारा शासन निर्णय बुधवारी शालेय शिक्षण विभागाने जारी केला. यंदा पहिलीला नवीन पुस्तके या नव्या धोरणानुसार असतील. २०२६-२७ म्हणजेच पुढल्या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांच्या अभ्यासक्रमात बदल होईल. त्यानंतर इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या चार वर्षांचा अभ्यासक्रम तिसऱ्या टप्प्यात म्हणजे २०२७-२८ मध्ये बदलणार आहेत. अंतिम टप्प्यात २०२८-२९ मध्ये आठवी, दहावी आणि बारावी या इयत्तांची पुस्तके बदलणार आहेत. हिंदी भाषा तिसऱ्या भाषेप्रमाणे शिकवली जाईल. इतर माध्यमांमध्ये माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी या तीन भाषा अभ्यासक्रमात असतील. इयत्ता सहावी ते दहावी साठी भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार निश्चित केले जाईल असेही या निर्णयात स्पष्ट केले आहे. शालेय वेळापत्रक, विषययोजना, मूल्यांकन पद्धती आणि परीक्षांचे वेळापत्रक यामध्येही आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत. संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे नियोजन एससीईआरटी च्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येणार असून ते शाळांना जूनपूर्वी दिले जाणार आहे. तीन ते आठ वर्षांपर्यंत म्हणजेच इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत स्तर असेल. त्यानंतर तिसरी ते पाचवी या इयत्तांचा समावेश पूर्वतयारी स्तरात असेल. सहावी, सातवी आणि आठवी या तीन इयत्ता पूर्व माध्यमिक स्तरात असतील आणि नववी ते बारावीपर्यंत माध्यमिक स्तर गणला जाईल. एनईपीची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमासाठी २०२३-२४ शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली. यंदा शालेय शिक्षणात सुरू होईल. त्यासाठी एनसीईआरटीच्या धर्तीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्य अभ्यासक्रम आराखडाही तयार केला. आता प्राथमिक आणि माध्यमिक असे विभाग राहणार नसून त्याऐवजी पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा चार स्तरांमध्ये इयत्तांची विभागणी करण्यात आली आहे. शिक्षणाची नवीन रचना ५+३+३+४ आकृतीबंध पायाभूत स्तर ३ ते ८ - बालवाटिका १, २, ३ + इयत्ता पहिली व दुसरी, पूर्वतयारी स्तर ८ ते ११ तिसरी, चौथी आणि पाचवी पूर्वमाध्यमिक स्तर ११ ते १४- सहावी, सातवी आणि आठवी, माध्यमिक स्तर - १४ ते १८ नववी, दहावी, अकरावी आणि बारावी, नवीन अभ्यासक्रम असा टप्प्याटप्प्याने २०२५-२६: पहिली, २०२६-२७: दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, २०२७-२८: पाचवी, सातवी, नववी, अकरावी, २०२८-२९: आठवी, दहावी, बारावी साठीचा अभ्यासक्रम असणार आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)