वादळी वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त घरांचे तातडीने सर्वेक्षण करा, आमदार किशोर जोरगेवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना (Conduct an immediate survey of houses damaged by storms, MLA Kishor Jorgewar instructs the District Collector)

Vidyanshnewslive
By -
0
वादळी वाऱ्यामुळे नुकसानग्रस्त घरांचे तातडीने सर्वेक्षण करा, आमदार किशोर जोरगेवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना (Conduct an immediate survey of houses damaged by storms, MLA Kishor Jorgewar instructs the District Collector)


चंद्रपूर :- दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास चंद्रपूर शहरात आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांमध्ये घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देत तातडीने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत मिळवून देण्याच्या सूचना केल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीत वाऱ्याच्या जोरामुळे अनेक घरांच्या छपरांवर झाडे कोसळली असून काही घरांची छपरे उडून गेली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विजेच्या सुविधा, घरातील साहित्य तसेच इतर मूलभूत सेवाही बाधित झाल्यामुळे नागरिक आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. आ. जोरगेवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, सदर नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांच्या घरांचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचे छत व भिंती कोसळल्या असून अनेकांच्या उपजीविकेवरही याचा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने या भागाचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव त्वरीत सादर करावा. तसेच जिल्हा प्रशासनाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. सदर नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक भागांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. महावितरणनेही युद्धपातळीवर काम करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)