बल्लारपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान समाजशास्त्री व समाज सुधारक होते. त्यांच्या विचारात मानवाची प्रगती व विकास, स्वतंत्रता दिसून येते. त्यांनी मानवास आरंभ आणि अंतिम मानत सर्व गतीविधीचे स्तोत्र व इतिहास रचिता असे सबोधले आहे.
म्हणूनच आज जगाच्या मोठमोठ्या प्रबळ व शक्तिशाली देशात बाबासाहेब यांचे गौरव केल्या जाते. आज जगातील बहुतांश देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहाने आणि थाटामाटात साजरी केली जाते. बाबासाहेब यांचे गुणगौरव म्हणजेच अमेरिकेच्या कोलंबीया विद्यापीठाने "सिंबॉल ऑफ नॉलेज" म्हणून सम्बोधले हे होय.
आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या विषमतावादी समाज व्यवस्थेने सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक गुलामी कायम केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या समग्र गुलामगिरीच्या विरोधात आपला लढा चालवला. ते आपला संघर्ष चालवत असताना सामाजिक दायित्वासोबतच देशहितही जोपासत होते.
भारताच्या भरीव जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यात भारतीय रिझर्व बँकेची स्थापना, दामोदर निगम, केंद्रीय ऊर्जा आयोग तसेच मिनरल डेव्हलपमेंट पॉलिसी यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांना फक्त स्वतःचा उद्धार नको होता, तर त्यांच्यासोबतच संपूर्ण मागासवर्गीय समाज – OBC, NT, SC/ST – यांनाही मानवी हक्क मिळावेत, ही त्यांची जिद्द होती. त्यांनी 1919 ची साऊथब्युरो कमिशन, 1928 ची सायमन कमिशन, 1930–32 ची गोलमेज परिषद, पुणे करार, 1935 चा सेकंड इंडिया अॅक्ट, आणि 1934 ची जातीयनिहाय वर्गवारी (SC, ST, OBC, NT) यांचा प्रभावी वापर करून समाजाला शैक्षणिक व सामाजिक गुलामीतून बाहेर काढले.
भारतीय स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी या सर्व मूलभूत हक्कांना भारतीय राज्यघटनेत कायद्याच्या रूपाने समाविष्ट करून न्याय दिला. ते केवळ वर्तमानाचा विचार करत नव्हते, तर भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांची जाणीव देऊन उपायही सांगत होते. 1938 मध्ये त्यांनी मुंबई विधानमंडळात 'परिवार नियोजन' बिल सादर केले. ते शेतकऱ्यांची पीडा समजून घेत होते आणि जमीनदारशाही विरोधात लढणारे पहिले नेते होते.
गोलमेज परिषदेत त्यांनी स्पष्टपणे भांडवलशाही, जमीनदारी आणि कामगारांच्या शोषणावर आवाज उठवला. "हे सरकारला माहिती असूनही हस्तक्षेप करीत नाही," अशी तेवढी स्पष्ट टीका त्यांनी केली. बाबासाहेब आंबेडकरांना या देशातील तमाम कष्टकरी, शेतकरी व कामगार यांच्या दुःखाची जाणीव होती. "मी या देशाच्या पंतप्रधान पदी एका शेतकऱ्याच्या मुलाला पाहू इच्छितो," हे त्यांचं उदात्त स्वप्न होतं. परंतु दुर्दैव असे की, ज्या वर्गासाठी त्यांनी लढा दिला, त्याच वर्गात बाबासाहेबांच्या कार्याबाबत अज्ञान व अवहेलना दिसून येते. OBC साठी संविधानात कलम 340 बाबासाहेबांनी मांडले,
पण त्यांचे योगदान अनेकांना माहिती नाही. कामगारांसाठी त्यांनी कायदे केले, महिलांसाठी सुरक्षितता आणि शेतकऱ्यांसाठी सिंचन योजना आणल्या – आजही त्या आपल्याला लाभदायक ठरतात. आपल्या कार्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकटं आली. त्यांची चार मुलं कुपोषणामुळे मरण पावली, पण बाबासाहेब आपल्या मिशनपासून मागे हटले नाहीत. ते हिमालयासारखे अढळ राहून शोषितांसाठी शेवटपर्यंत लढत राहिले. आपली जबाबदारी आहे मिळालेले हक्क टिकवणे, कारण सनातनवादी विचारधारा पुन्हा उगम पावत आहे. जर आपण एकजूट होऊन संघर्ष केला नाही, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या