चंद्रपूर :- आपल्या देशात दत्तक प्रक्रियेंतर्गत बालक दत्तक घेतले जाते. परंतु व्यंगत्व असलेले बालक दत्तक घेण्याचे धाडक सहसा कोणी करीत नाही. मात्र हे करून दाखविले आहे एका स्वीडीश दाम्पत्याने. स्पेशल नीड (व्यंगत्व) असलेल्या बालकाला त्याच्या जन्मदात्यांनी नाकारले, परंतु स्वीडन येथील निपुत्रिक दाम्पत्याने या बालकाला स्वीकारून थेट स्वीडन गाठण्याची तयारी केली आहे. केंद्रीय दत्तक नियमावली 2022 व बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 अंतर्गत प्रक्रिया करून जिल्हा न्यायालय चंद्रपूर येथून सदर बालकाला कायदेशीर दत्तक देण्यात आले. 11 फेब्रुवारी रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत यांच्या हस्ते असाच एक आगळा-वेगळा दत्तक निरोप समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमात सदर बालकाला स्वीडन येथील रिकार्ड टोबायस हेडबर्ग आणि मारिया एलिझाबेथ व्हिक्टोरिया एरिक्सन या परदेशातील पालकाकडे सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमाला किलबिल दत्तक संस्थेच्या संस्थापिका प्रभावती मुठाळ, उपाध्यक्ष वंदना खाडे, प्रा. डॉ विद्या बांगडे, हेमंत कोठारे तसेच आदी किलबिल दत्तक तथा प्राथमिक बालगृहाचे कर्मचारी उपस्थित होते. अनाथ, परित्याग केलेले आणि सोडून दिलेले बालकाचे संरक्षण, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या 1098 मोफत क्रमांक सेवा माध्यमातून केले जाते. अशा बालकांच्या पालन पोषणकरिता किलबिल दत्तक योजना संस्था कार्यरत असून बालकल्याण समिती चंद्रपुर, यांच्या आदेशाने दाखल करण्यात येते. यानंतर सदर बालकांना बालकल्याण समितीद्वारे दत्तक मुक्त केले जाते. दत्तक इच्छुक पालक महिला व बालविकास मंत्रालयाच्या CARA (Central Adoption Resource Authority) cara.wcd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन cara पोर्टलवर नोंदणी करून बालक दत्तक घेऊ शकतात. पालकत्व ही प्रत्येक विवाहित व्यक्तीसाठी महत्वाची बाब असते. परंतु निसर्गाने ती संधी काढून घेतल्याने काही जोडप्यांचे पालक बनण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. यावर आता शासनाने सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षला तसेच चंद्रपूर येथील किलबिल दत्तक संस्थेला भेट द्यायची आहे. अर्थात शासनाने पालकत्व मिळणे करीता तीन प्रकारे पालक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 1) अनाथ बालक दत्तक घेणे 2) नात्यातील बालक (रक्तातील नाती) दत्तक 3) प्रतिपालकत्व दत्तक घेणे. दत्तक प्रक्रियेविषयी अधिक माहिती घेण्याकरीता चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098 क्रमांकावर फोनद्वारे माहिती मिळू शकते, असे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या