सिडिसीसी बँकेतील सायबर हल्ला प्रकरणातील चोरट्याला शोधण्यास फॉरेन्सिक ऑडिट करणार (CDCC will conduct forensic audit to find the thief in the bank cyber attack case)
चंद्रपूर :- सायबर हल्ल्याच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३ कोटी ७० लाखांची रक्कम लुटणाऱ्या चोरट्याचा शोध घेण्यासाठी बँक संपूर्ण ऑनलाईन प्रणालीचे त्रयस्थ संस्थेकडून फॉरेन्सिक ऑडीट करणार आहे. यासंदर्भातील प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे. दरम्यान बँकेने या रकमेचा विमा काढलेला नव्हता अशीही धक्कादायक माहिती समोर आली असून माहिती व तंत्रज्ञानाच्या यंत्रणेवर बँक वर्षाला अडीच ते तीन कोटी रूपये खर्च करते. त्यानंतरही हा प्रकार घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून आरटीजीएस व एनईएफटी करतांना ३३ ग्राहकांच्या खात्यातून ३ कोटी ७० लाख रूपये अज्ञात व्यक्तीने सायबर हल्ला करून लुटले आहे. विशेष म्हणजे ही रक्कम हरियाणा येथील अज्ञात व्यक्तीच्या खात्यात जमा झाली आहे. चंद्रपूर बँकेने आरटीजीएस व एनईएफटी प्रणालीसाठी नागपुरातील ट्रस्ट फिनटेक लि. व येस बँक सोबत कोर बँकिंग सिस्टीम करिता करार केला आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण यंत्रणेवर चंद्रपूर बँक वर्षाला अडीच ते तीन कोटींचा खर्च करते. इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करूनही ही यंत्रणा सुरक्षित नव्हती. त्यामुळेच ३३ ग्राहकांच्या खात्यातून ३ कोटी ७० लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरली आहे. दरम्यान या घटनेनंतर बँकेची आरटीजीएस व एनईएफटी प्रणाली बंद पडली आहे. चंद्रपूर जिल्हा बँक आता आयडीबीआय या नविन बँकेसोबत यासाठी करार करणार असल्याची माहिती आहे. या सायबर हल्ल्यात नेमका कुणाचा हात आहे व चोराला शोधून काढण्यासाठी बँकेने सायबर तज्ञांकडून आज दिवसभर सल्ला घेतला. सायबर हल्ल्याच्या तपासासाठी एक पथक गठीत केले आहे. या पथकाला सायबर हल्ला व ऑनलाईन गुन्हे याबाबत मार्गदर्शन केले आहे. हे पथक लवकरच हरियाणा येथे रवाना होणार आहे. या सायबर हल्ल्याचा तपास सुरू आहे. यात नेमके कोण दोषी आहे याचा शोध घेतला जात आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली आहे. बँक चोरी शोधण्यासाठी लवकरच त्रयस्थ कंपनीकडून या संपूर्ण यंत्रणेचे फॉरेन्सिक ऑडीट करणार असल्याची माहिती बँकेचे सीईओ राजेश्वर कल्याणकर यांनी दिली. या सायबर हल्ल्याच्या घटनेनंतर बँकेचे अध्यक्ष संतोष रावत, सीईओ राजेश्वर कल्याणकर यांनी बँकेत दिवसभर बैठका घेवून ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर चर्चा केली. तसेच शहरातील आयकर सल्लागारांना बोलावून देखील अधिकची माहिती घेतली. दरम्यान ऑनलाईन व्यवहारातील या रकमेचा विमा बँकेने काढलेला नव्हता अशीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे ग्राहकांचे पैसे बँकेत किती सुरक्षित आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या