"ते पन्नास दिवस " ही कादंबरी अभ्यासक्रमातुन काढणं म्हणजे खऱ्या अर्थाने एका विचाराची हत्या...! (Removing the novel "Te Pannas Divas" from the curriculum is, in the true sense, the murder of an idea!)
कोरोना काळातलं वास्तव मांडणं म्हणजे शासन विरोधी भूमिका होती का?
वृत्तसेवा :- सरकार विरोधी कादंबरी असल्याचे सांगून.. अभ्यास क्रमातून काढल्याचा निर्लज्ज निर्णय खऱ्या अर्थाने अघोषित आणीबाणी आहे. ही केवळ कादंबरी काढणे नाही ही विचारांची हत्या आहे! "ते पन्नास दिवस " ही कादंबरी काढणं म्हणजे खऱ्या अर्थाने एका विचाराची हत्या आहे. एका वास्तवाला गाडण्याचा प्रयत्न आहे. एका वर्गाच्या जखमा, वेदना आणि इतिहासाला शांतपणे संपवण्याची कारवाई आहे. हे पुस्तकांवरचं प्रेम नाही हे पुस्तकांवरचं नियंत्रण आहे. सत्तेला भीती पुस्तकांची नसते, भीती असते त्या पुस्तकातून उभ्या राहणाऱ्या जागृतीची. ज्या कादंबऱ्या प्रश्न विचारतात, ज्या अन्याय उघड करतात, ज्या जात, वर्ग, श्रम यांचं उघडं सत्य दाखवतात त्या कादंबऱ्या सत्तेला नको असतात. मग त्या जाळल्या जात नाहीत… त्या सिलॅबसमधून हद्दपार केल्या जातात. हा खेळ फार जुना आहे फरक एवढाच, पूर्वी बंदी जाहीर व्हायची… आता बंदी अघोषित असते. ही अघोषित आणीबाणीच आहे. कारण इथे अधिकार काढून घेतले जात नाहीत इथे विचार काढून घेतले जातात. इथे तोंड बंद केलं जात नाही इथे कान बंद केले जातात, जेणेकरून कुणालाच सत्य ऐकू येऊ नये. तुम्ही लक्षात घ्या अभ्यासक्रमातून नेहमीच “सुरक्षित” साहित्य राहतं, आणि “धोकादायक” साहित्य बाहेर फेकलं जातं. धोकादायक म्हणजे काय? धोकादायक म्हणजे जे प्रश्न विचारतं. जे विद्रोह शिकवतं. जे माणसाला माणूस म्हणून उभं करतं. म्हणूनच आज ते पन्नास दिवस ही उपाशी, रस्त्यावर पायदळी चालणाऱ्या कष्टकरी, मजुरांची कैफियत सांगणारी कादंबरी काढली जाते… उद्या कविता काढली जाईल… परवा इतिहास बदलला जाईल… आणि मग एक दिवस तुम्हाला तुमचंच वास्तव खोटं वाटायला लागेल. हा फक्त शिक्षणाचा प्रश्न नाही. हा वर्चस्वाचा प्रश्न आहे. कोण ठरवणार काय वाचायचं? कोण ठरवणार कोणता आवाज जिवंत राहील? कोण ठरवणार कोणता इतिहास सांगितला जाईल? कोण ठरविणार तुम्ही काय खाणार? जर हे सगळं सत्ता ठरवत असेल, तर आपण शिक्षण घेत नाही आपण घडवले जातोय. ही प्रक्रिया हळूहळू तुमचं विचार करणं मारते. तुम्हाला आज्ञाधारक बनवते. तुम्हाला प्रश्न विचारण्यापासून रोखते. आणि जेव्हा समाज प्रश्न विचारणं थांबवत. तेव्हा सत्ता हुकूमशहा बनते. म्हणूनच हा क्षण साधा नाही. हा इशारा आहे. आज एक कादंबरी काढली गेली आहे उद्या तुमचा आवाज काढला जाईल. जर तुम्ही अजूनही शांत असाल, तर लक्षात ठेवा शांतता ही तटस्थता नसते, ती संमती असते. आता वेळ आहे लिहिण्याची, बोलण्याची, उभं राहण्याची. कारण जर तुम्ही आज बोललात नाही, तर उद्या तुमच्यासाठी बोलायला कोणी उरणार नाही.
कादंबरीवर आक्षेप घेणारं तीन पानी सविस्तर पत्र अकॅडमिक कौन्सिलच्या सदस्य संगीता जगताप यांनी कुलसचिवांना दिलं होतं," असं ते म्हणाले. "ही कादंबरी मोदी सरकारनं कोरोना लॉकडाऊनबाबत घेतलेल्या निर्णयावर टीका करते तसेच या काळाचं चुकीचं चित्रण करते, असा आक्षेप या पत्रातून घेण्यात आला होता." तसेच, "पंतप्रधान मोदींचा आणि हिंदुत्ववाद्यांचा द्वेष करण्याचा आपला छंद मजुरांच्या दु:खाचा सहारा घेऊन जोपासण्याचा एक लाजिरवाणा आणि दयनीय प्रयत्न लेखकाने या कादंबरीरूपाने केल्याचं अत्यंत स्पष्टपणे दिसतं," असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही या कादंबरीवर आक्षेप घेणारं पत्र दिलं कुलसचिवांना दिलं होतं, अशीही माहिती मिळाली. या घडलेल्या घटनाक्रमासंदर्भात आम्ही लेखक पवन भगत यांच्याशीही चर्चा केली. ते म्हणाले की, "मला असं वाटतं की, ही एकप्रकारे अघोषित आणीबाणी आहे. लेखनस्वातंत्र्यावर गदा येणं आणि सेन्सॉरशीप करणं उचित नाही. ही कादंबरी अभ्यासक्रमाला लावा, असा कसलाही अर्ज मी विद्यापीठांना कधीही केलेला नाही. विद्यापीठानेच हे पुस्तक स्वीकारलं होतं." ज्यांना एकछत्री राज्य आणायचं आहे आणि जे लोक सांस्कृतिकदृष्ट्या देशाला कमकुवत करू पाहत आहेत, अशांच्या अघोषित आणीबाणीचा हा प्रकार आहे." कुठल्याही विचाराने ग्रसित होऊन नव्हे, तर पन्नास दिवसांचा प्रवास जो लोकांनी भोगला, ते मांडण्याचा प्रयत्न या कादंबरीतून केला आहे." "सध्याचं सरकार विरोधी मत ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. आपलीच मतं थोपवणं हे लोकशाहीला हानिकारक आहे," असं ते सांगतात. विशेष म्हणजे ही कादंबरी मुंबईर विद्यापीठात 'एमए'ला तसेच अहमदनगरमधील 'न्यू आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज (स्वायत्त)'मध्ये 'बीए सेकंड'लाही आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संकलन - पवन भगत, चंद्रपूर
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या