चंद्रपूरात उभारणार मुंबईच्या विपश्यना केंद्राच्या धर्तीवर पॅगोडा (A Pagoda modeled after Mumbai's Vipassana Center will be built in Chandrapur.)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूरात उभारणार मुंबईच्या विपश्यना केंद्राच्या धर्तीवर पॅगोडा (A Pagoda modeled after Mumbai's Vipassana Center will be built in Chandrapur.)

चंद्रपूर शहरातील धम्मभूमी, आंबेडकर नगर, बाबूपेठ येथे सुमारे ७ एकर जागेवर भव्य विपश्यना ध्यान केंद्र

चंद्रपूर :- मुंबई येथील पॅगोडा विपश्यना केंद्राच्या धर्तीवर चंद्रपूर शहरातील धम्मभूमी, आंबेडकर नगर, बाबूपेठ येथे सुमारे ७ एकर जागेवर भव्य विपश्यना ध्यान केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करत प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. आ. किशोरभाऊ जोरगेवार यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून प्रकल्पाच्या आराखड्याबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सर्व संबंधित विभागांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि सविस्तर प्रस्ताव तयार करून तात्काळ शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. प्रस्ताव तयार करताना कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. स्थळ पाहणीदरम्यान तहसीलदार विजय पवार, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुले, मनपा शहर अभियंता रविंद्र हजारे, उपअभियंता भसारकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राठोड, महावितरणचे कार्यकारी अभियंता दार्वेकर, मनपा अभियंता पवार, धम्मभूमी महाविहारचे संचालक महाथेरो डॉ. सुमनवन्नो, सायली येरणे, निलिमा वनकर आदी उपस्थित होते. 
           प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबतही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. प्रवेशमार्ग सुकर करणे, पाणी व वीजपुरवठ्याची योग्य व्यवस्था, पर्यावरणीय संतुलन राखणे तसेच संपूर्ण प्रकल्पाचा आराखडा पॅगोडा धर्तीवर आकर्षक व दर्जेदार पद्धतीने तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की, प्रस्तावित विपश्यना केंद्र हे केवळ धार्मिक स्थळ नसून मानसिक शांतता, ध्यानधारणा आणि अध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वपूर्ण ठरेल. या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही चालना मिळेल. प्रस्ताव शासनाकडे पाठविताना सर्व आवश्यक कागदपत्रे, नकाशे आणि तांत्रिक बाबी पूर्ण करून सादर कराव्यात, जेणेकरून मंजुरी प्रक्रियेत विलंब होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.   

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)