बल्लारपूरात ज्येष्ठ दाम्पत्यावर अमानुष अत्याचार : दोघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल पोलीस तपास सुरु (Inhuman torture of a senior couple in Ballarpur: A serious case has been registered against both of them.)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूरात ज्येष्ठ दाम्पत्यावर अमानुष अत्याचार : दोघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल पोलीस तपास सुरु (Inhuman torture of a senior couple in Ballarpur: A serious case has been registered against both of them.)

बल्लारपूर :- एकीकडे बल्लारपूर शहरात आंबेडकर जयंतीचा उत्साह सुरु असतांना दुसरीकडे बल्लारपूर शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली शहरातील श्रीराम वॉर्ड परिसरात मानवी संवेदनांना हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली असून, एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेला व तिच्या आजारी पतीला त्यांच्या स्वतःच्या घरातून हाकलून देत मारहाण व मानसिक छळ केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी सून व तिच्या वडिलांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे. लीला सुंदरलाल बहुरिया (६५) हे त्यांचा मुलगा राजकमल बहुरिया हा पत्नी सीमा बहुरियासह त्याच घरात राहत असून, वारंवार वाद व छळाचे प्रकार घडत होते. मात्र, १३ एप्रिल रोजी घडलेली घटना अधिकच भयावह ठरली. लीला सुंदरलाल बहुरिया घरात जेवण करत असताना आरोपी सून सीमा बहुरिया हिने अचानक घरात येऊन शिवीगाळ करत त्यांना जबरदस्तीने उठवले व त्यांच्यासह त्यांच्या आजारी पतीला घराबाहेर काढले.
 

          आरोपींकडून वारंवार वृद्ध दाम्पत्याचा छळ केला जात असून, त्यांच्या वस्तू घराबाहेर फेकणे, धमकावणे व मारहाण करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. मदतीला धावून आलेल्या पुतणी राजश्री बहुरिया हिलाही आरोपींकडून शिवीगाळ करण्यात आली. यापूर्वीही अशाच स्वरूपाची तक्रार नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. वृद्धत्व आणि आजारपणाची जाणीव असूनही आरोपींकडून करण्यात येणारा हा अमानुष छळ अत्यंत संतापजनक असून, समाजात संतापाची लाट उसळली आहे. वृद्ध दाम्पत्याला रात्रीच्या वेळी घराबाहेर ठेवून मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी सून सीमा राजकमल बहुरिया व तिचे वडील शंकर वांढरे यांच्या विरोधात ज्येष्ठ नागरिक व पालकांचे पालनपोषण व कल्याण अधिनियम, २००७ चे कलम २४ तसेच बीएनएस अंतर्गत कलम ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकांत मेंढे करीत असून, या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)