नागपूरच्या ३ वर्षीय चिमुकलीचा जागतिक डंका ! 'गोजिरी' ठरली जगातील सर्वात लहान आंतरराष्ट्रीय पेटंटधारक (Global Acclaim for a 3-Year-Old Girl from Nagpur! 'Gojiri' Becomes the World's Youngest International Patent Holder.)

Vidyanshnewslive
By -
0
नागपूरच्या ३ वर्षीय चिमुकलीचा जागतिक डंका ! 'गोजिरी' ठरली जगातील सर्वात लहान आंतरराष्ट्रीय पेटंटधारक (Global Acclaim for a 3-Year-Old Girl from Nagpur! 'Gojiri' Becomes the World's Youngest International Patent Holder.)


​नागपूर :- आपल्या बालपणात साबणाचे गोल-गोल फुगे तयार करून हवेत उडवण्याचा आनंद प्रत्येकानेच घेतला असेल. साबणाचे फुगे म्हणजे नेहमीच गोलाकार असतात, हाच विचार सर्वांच्या मनात पक्का बसलेला असतो. परंतु, नागपूर येथील अवघ्या तीनवर्षीय चिमुरडीने या पारंपारिक कल्पनेला छेद दिला आहे. तिने साबणाच्या फुग्यांना चक्क त्रिमितीय (थ्रीडी) आणि विविध भौमितिक आकार देण्याची किमया साधली आहे. तिच्या या अनोख्या व आश्चर्यकारक संशोधनाची दखल घेत तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट बहाल करण्यात आले आहे. अशा प्रकारे स्वतःच्या नावावर आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवणारी ती जगातील सर्वात तरुण संशोधक बनली असून, तिने एक नवा इतिहास रचला आहे. 
              या बाल संशोधक मुलीचे नाव गोजिरी अजिंक्य कोत्तावार असे आहे. ​सध्या गोजिरी ही मनीषनगर भागात असलेल्या स्मॉल वंडर प्री-स्कूल या शाळेमध्ये नर्सरी वर्गात शिक्षण घेत आहे. लहान मुलांना नेहमीच साबणाचे बुडबुडे उडवणे खूप आवडते आणि ते नेहमीच गोल आकाराचे पाहायला मिळतात. पण, गोजिरीने केलेल्या या नव्या संशोधनामुळे आता या बुडबुड्यांना थ्रीडी स्वरूप मिळाले आहे. या प्रक्रियेमध्ये एका विशेष प्रकारच्या बेसची निर्मिती करण्यात आली आहे. या खास बेसचा वापर करून हवेत फुगे सोडल्यावर ते केवळ गोल न राहता, विज्ञानातील निरनिराळे थ्रीडी आकार घेतात. या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी २० नोव्हेंबर २०२५ रोजी जर्मनी सरकार कडून तिला अधिकृत पेटंट प्रदान करण्यात आले आहे. या घवघवीत यशानंतर ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड ने देखील तिची यंगेस्ट इंटरनॅशनल पेटंट होल्डर म्हणजेच जगातील सर्वात तरुण पेटंटधारक म्हणून अधिकृत नोंद घेतली आहे. गोजिरीला मिळालेले हे यश म्हणजे केवळ योगायोग नाही. तिला हा संशोधनाचा समृद्ध वारसा घरातूनच लाभलेला आहे. तिचे वडील डॉ. अजिंक्य कोत्तावार हे स्वतः एक अत्यंत प्रख्यात आणि नामवंत संशोधक आहेत. त्यांच्या खात्यावर आजवर तब्बल ४८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट्स जमा आहेत. त्यांनी विशेषतः शिक्षण आणि शेती या क्षेत्रात मोलाचे कार्य केले असल्यामुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचे फुनसुक वांगडू या नावाने ओळखले जाते. त्यांच्या या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्कार साठी देखील नामांकन प्राप्त झाले आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी यवतमाळ या ठिकाणी ऊबुंटू नावाची एक अभिनव आणि प्रयोगशील शाळा सुरू केली आहे, जिथे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष 'प्रयोगातून शिक्षण' देण्यावर भर दिला जातो. गोजिरीने मिळवलेल्या या यशाबद्दल बोलताना डॉ. अजिंक्य कोत्तावार यांनी सांगितले की, घरात गोजिरीसोबत खेळत असतानाच या नाविन्यपूर्ण संशोधनाची संकल्पना त्यांच्या मनात आली. आजची तरुण पिढी केवळ नोकरी मिळवण्याच्या मागे धावत असते, परंतु त्यांनी स्वतः संशोधक बनून संपूर्ण जगासमोर एक आदर्श प्रस्थापित करावा, या उदात्त हेतूने त्यांनी हे संशोधन गोजिरीच्या नावे समर्पित केले आहे. याच एका योगायोगातून गोजिरी ही जगातील सर्वात कमी वयाची पेटंटधारक मुलगी ठरली आहे, याचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी व्यक्त केले. आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात मुलांना चौकटीबाहेरचा विचार करायला शिकवणे अत्यंत गरजेचे आहे. कोत्तावार कुटुंबाने गोजिरीला दिलेले प्रोत्साहन हे प्रत्येक पालकासाठी अतिशय प्रेरणादायी असून, प्रयोगातून शिक्षण हीच खऱ्या अर्थाने नव्या तंत्रज्ञानयुगाची गरज आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)