अजित पवार हे महाराष्ट्रातील लोकनेते - ना. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
जनसामान्यांचा नेता हरवला : पालकमंत्री डॉ. अशोक उईके
जनसेवेसाठी तत्पर लोकनेता, सहृदय मित्र गमावला : आ सुधीर मुनगंटीवार यांची संवेदना
संवेदनशील नेतृत्वाचा अस्त..... - आ. किशोर जोरगेवार
उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली..! - खा. प्रतिभा धानोरकर
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी - माजी खा. हंसराज अहीर
चंद्रपूर :- राज्याचे लाडके नेते, विकासाची दृष्टी असलेले उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विमान अपघाताची बातमी मनाला सुन्न करणारी आहे. 'शब्दाला पक्का माणूस' आणि 'कामाचा धडाका' ही त्यांची ओळख आज कायमची स्मृती बनली आहे. मंत्रालयातील फाईल्सचा निपटारा असो वा पहाटेच्या बैठका, दादांनी कामाचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला होता. मनात एक आणि ओठावर एक असा स्वभाव नसलेला हा नेता सामान्य कार्यकर्त्यांसाठी नेहमीच 'हक्काचा आधार' होता. महाराष्ट्राच्या राजकारणातील 'पॉवरफुल' आणि कणखर नेतृत्व हरपले..!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने जनसामान्यांचा नेता हरविला आहे. अजित दादांचा स्वभाव हा अतिशय मनमोकळा आणि निर्भीड होता. प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आणि राज्याच्या प्रश्नांची जाण असलेल्या या नेत्याला संपूर्ण महाराष्ट्र माहीत होता. अजितदादांचा अभ्यास अतिशय दांडगा असल्यामुळे त्यांची राज्याच्या राजकारणावर पकड होती. जनसामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी नेहमीच पुढे येऊन मदत केली आहे. वेळेच्या बाबतीत ते अतिशय काटेकोर असायचे. कार्यालयीन कामकाज असो विधिमंडळातील भाषणे असो की सार्वजनिक व्यासपीठावर केलेले मार्गदर्शन असो, त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व झळकत होते. अशा या उमद्या नेत्याला आज महाराष्ट्र मुकला आहे. ही राज्याचीच नव्हे तर देशाची अपरिमित हानी आहे. मंत्रिमंडळातील माझे सहकारी गमावल्याचे अतिशय दुःख आहे. दादांना विनम्र श्रद्धांजली.....
अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभ्यासू, अनुभवी आणि ठाम विचारांचे नेतृत्व होते. मतभेद असले तरी विचारांचा आदर राखणे, आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणे—ही त्यांची खरी ओळख होती. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रात एक स्पष्ट वक्ता, आणि वैयक्तिक आयुष्यात एक सहृदय मित्र आपण गमावला आहे, अशा शब्दात माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शोकभावना व्यक्त केली व्यक्त केली आहे. अजितदादांचा स्वभाव हा नेहमीच स्पष्ट आणि निर्भीड वक्तेपणाचा राहिला. जे योग्य वाटे ते त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता मांडले. सत्ता, विरोध किंवा समीकरणे यापेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी त्यांची भूमिका अनेकदा राजकीय चर्चांना दिशा देणारी ठरली. मतभिन्नता असूनही परस्पर सन्मान राखण्याची त्यांची शैली आजच्या राजकारणात दुर्मिळ म्हणावी अशी होती. विधानसभा असो वा सार्वजनिक व्यासपीठ त्यांचे बोलणे ठाम, मुद्देसूद आणि आशयघन असे. राजकारण हे केवळ पदांचे नव्हे, तर मूल्यांचे असते, ही जाणीव त्यांच्या वागण्यातून कायम प्रकट होत असे. त्यामुळेच सहकारी असोत वा विरोधक, सर्वांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. विकासासाठी प्रत्येकाला मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. दातृत्व या शब्दातला दा हा दादा या विशेषणात दडला आहे. व्यक्तिगत पातळीवर ते एक आपुलकीचे, संवेदनशील आणि विश्वासू मित्र होते. राजकीय मतभेद कधीही वैयक्तिक नात्यांच्या आड येऊ नयेत, हा त्यांचा आग्रह होता. अनेकदा त्यांच्या स्पष्ट, प्रामाणिक शब्दांनी मार्गदर्शन लाभले; आज तेच शब्द आठवणींतून अंतःकरणाला भिडत आहेत. आज अजितदादा आपल्यात नाहीत, याची जाणीव मन सुन्न करणारी आहे. आबालवृद्धासाठी नेहमी तत्पर राहणारा त्यांचा अजितदादा, सकाळी सहा वाजता पासून जनसेवेसाठी तत्पर राहणारा हा लोकनेता आता आपल्यात नाही ही कल्पना सहन होत नाही. त्यांचा आवाज शांत झाला असला, तरी त्यांनी जपलेले मूल्य, त्यांची राजकीय भूमिका आणि माणुसकीचा वारसा कायम स्मरणात राहील.कै. अजितदादा पवार यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना व असंख्य समर्थकांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर देशाच्या राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात अपूरणीय पोकळी निर्माण झाली आहे. सामाजिक भान, अनुभव आणि नेतृत्वगुण असलेला एक मोठा नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे गेला पाहिजे असे ते नेहमी मनापासून म्हणायचे. मी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा होती. अनेक वेळा त्यांनी मला वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन केले; त्यांच्या शब्दांनी आणि विश्वासाने मला नेहमीच बळ दिले. त्यांनी माझ्या निवासस्थानी भेट देत ‘अम्मा का टिफिन या सेवाभावी उपक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली होती. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याची त्यांची तळमळ आणि संवेदनशीलता त्या भेटीतून प्रकर्षाने जाणवली. दादा हे नेहमी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडणारे नेतृत्व होते. होणारे काम असेल तर ते निर्भीडपणे “हो” म्हणायचे, आणि जे शक्य नाही त्यासाठी स्पष्टपणे “नाही” सांगण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. शब्दांची गुंडाळी न करता, वास्तव स्वीकारून निर्णय घेणारा हा स्वभावच त्यांना वेगळा ठरवणारा होता. ही प्रामाणिकता आणि स्पष्टवक्तेपणा आजच्या राजकारणात दुर्मिळ आहे. एक संवेदनशील, कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा नेता देशाने गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. स्व. अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना, समर्थकांना व लाखो चाहत्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो हीच माता महाकाली चरणी प्रार्थना करतो.
उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना."
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या