सत्ता समीकरण बदलते का, विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर ? Will the power dynamics change ? Has Vijay Wadettiwar become the kingmaker ?
चंद्रपूर :- जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय चित्र स्पष्टपणे बदलल्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेसने तब्बल सात नगरपरिषदांवर विजय मिळवत जोरदार मुसंडी मारली असून, नेत्यांची मोठी फौज असताना भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असूनही, या निकालांचे पडसाद जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवर दूरगामी परिणाम करतील, असे एकूणच चित्र निर्माण करणारे ठरू पाहतील, हे या निकालावरून दिसून येते. भाजपसाठी ही निवडणूक अनेक अर्थानी धक्कादायक ठरली. सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे, किशोर जोरगेवार आणि करण देवतळे या चार आमदारांच्या मतदारसंघात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. याउलट केवळ आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी चिमूर नगरपरिषद राखत आणि भिसी नगरपंचायत जिंकत भाजपची मान राखली. मात्र, नागभीड गमावल्याने भाजपचा एकूण प्रभाव मर्यादित झाल्याचे दिसते. काँग्रेसच्या यशामागे स्थानिक नेतृत्व, उमेदवारांची निवड आणि संघटनात्मक ताकद ही महत्त्वाची कारणे ठरली आहे. घुग्घूस, वरोरा, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, बल्लारपूर आणि राजुरा या सात नगरपरिषदांमध्ये काँग्रेसने विजय मिळवत जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह खासदार प्रतिभा धानोरकर आणि जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांची एकी काँग्रेसच्या नेतृत्वाची ताकद अधोरेखित करणारी ठरली. शिवसेना (शिंदे गट) ला भद्रावतीत यश मिळाले असले तरी त्याचा जिल्ह्याच्या एकूण राजकारणावर मर्यादित परिणाम आहे. गडचांदूरमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा विजय हा भाजपमधील अंतर्गत असंतोष आणि गटबाजीचे स्पष्ट द्योतक मानला जात आहे. एकूणच, चंद्रपूर जिल्ह्यात भाजपविरोधी वातावरण वाढत असून काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल भाजपसाठी आत्मपरीक्षणाची तर काँग्रेससाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरू शकतात, ही बाब अधोरेखित करणारी आहे.
काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव क्रत जिल्ह्यात ११ पैकी ७ नगरपरिषदांवर विजय संपादन केला. काँग्रेसच्या या मोठ्या यशात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हे किंगमेकर ठरले असून जिल्ह्यातील भाजपच्या पाच मतदारसंघात आमदारांच्या काँग्रेसचा वरचष्मा राहिला हे विशेष. आमदार विजय वडेट्टीवार यांचा गृह मतदारसंघ असलेल्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी येथे जिल्ह्यात काँग्रेसने सर्वांत मोठा विजय मिळवला. भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार, चिमूर आ. कीर्तीकुमार भांगडिया, चंद्रपूर आ. किशोर जोरगेवार, वरोरा आ. करण देवतळे यांच्या गडाला सुरुंग लावत विधिमंडळ पक्षनते आमदार वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या बल्लारपूर, मूल, नागभीड, घुग्गुस, वरोरा, राजुरा नगरपरिषदेवर काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या रस्सीखेच शर्यतीत घवघवीत यश मिळवत चंद्रपूर काँग्रेसचा गड असल्याचे दाखवून दिले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, जिल्ह्यातील काँग्रेसचे स्थानिक नेते व पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यात थेट भाजप आमदारांच्या मतदार संघात जाऊन एकतर्फी किल्ला लढविला आणि विजयाची मुहूर्तमेढ रोवली. या विजयाने काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या