चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची दणदणीत विजयासह जोरदार मुसंडी 7 नगराध्यक्षासह 140 नगरसेवक, भाजपचे 2 नगराध्यक्षासह 72 नगरसेवक विजयी...! (In Chandrapur district, the Congress party made a strong comeback with a resounding victory, winning 7 mayoral posts and 140 corporator seats, while the BJP won 2 mayoral posts and 72 corporator seats...!)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसची दणदणीत विजयासह जोरदार मुसंडी 7 नगराध्यक्षासह 140 नगरसेवक, भाजपचे 2 नगराध्यक्षासह 72 नगरसेवक विजयी...! (In Chandrapur district, the Congress party made a strong comeback with a resounding victory, winning 7 mayoral posts and 140 corporator seats, while the BJP won 2 mayoral posts and 72 corporator seats...!)

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील दहा पैकी बल्लारपुर, ब्रम्हपुरी, राजुरा, वरोरा, नागभीड, मूल व घुग्घुस या सात नगर पालिकांच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवित काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. चिमूर येथे भाजप, भद्रावतीत शिंदे शिवसेना आणि गडचांदूर येथे अपक्ष नगराध्यक्ष विजयी झाला आहे. भिसी या एकमेव नगर पंचायतीत भाजप नगराध्यक्ष निवडून आला. दहाही पालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक विजयी झाले आहेत. दरम्यान माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, आमदार देवराव भोंगळे यांच्यासाठी हा निकाल धक्का मानला जात आहे. 
             आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे वर्चस्व असलेल्या बल्लारपूर मतदार संघातील बल्लारपूर व मूल या दोन्ही नगर पालिकेत भाजपचा दारूण पराभव झाला. बल्लारपूर पालिकेत नगराध्यक्ष पदी काँग्रेसच्या अल्का वाढई केवळ २१५ मतांनी विजयी झाल्या. वाढई यांना १४ हजार ६०७ तर भाजपच्या रेणुका दुधे यांना १४ हजार ३९२ मते मिळाली. मूल येथे काँग्रेसच्या एकता समर्थ २ हजार ८१ मतांनी विजयी झाल्या. समर्थ यांना ७ हजार १५४ तर किरण कापगते यांना ५ हजार ८७३ मते मिळाली. ब्रम्हपुरी नगर पालिकेत काँग्रेसचे योगेश मिसार ९ हजार ५७३ मतांनी विजयी झाले. मिसार यांना १५ हजर ४०८ मते मिळाली तर भाजपचे प्रा.सुयोग बाळबुधे यांना ५ हजार ८३५ मते मिळाली. राजुरा पालिकेत काँग्रेस अरूण धोटे नगराध्यक्ष पदी २ हजार ७३३ मतांनी विजयी झाले. धोटे यांना ९ हजार ११ मते मिळाली तर भाजपचे राधेश्याम अडानिया यांना ६ हजार २७८ मते मिळाली. गडचांदूर नगर पालिकेत भाजप बंडखोर अपक्ष निलेश ताजने २ हजार ६२३ मतांनी विजयी झाले. ताजने यांना ५ हजार ७१६ तर काँग्रेसचे सचिन भोयर यांना ३ हजार १९३ मते मिळाली. भद्रावती नगर पालिकेत शिवसेना शिंदे पक्षाचे प्रफुल्ल चटकी यांनी काँग्रेसचे सुनील नामोजवार यांचा ८२९ मतांनी पराभव केला. चटकी यांना १० हजार ३०४ मते मिळाली तर नामोजवार यांना ९ हजार ४७५ मते मिळाली. नागभीड पालिकेत काँग्रेसच्या स्मिता खापर्डे २ हजार २२४ मतांनी नगराध्यक्ष पदी निवडून आल्या. खापर्डे यांना ११ हजार ५८१ तर भाजपचे प्रा.लोमेश दुधे यांना ९ हजार ३५७ मते मिळाली. घुग्घुस नगर पालिकेत काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के ३४६ मतांनी विजयी झाल्या. सोनटक्के यांना ७ हजार १९६ तर भाजपच्या पुजा दुर्गम यांना ६ हजार ८५० मते मिळाली. चिमूर या एकमेव पालिकेत भाजपच्या गीता लिंगायत ६५४ मतांनी नगराध्यक्ष पदी निवडून आल्या. लिंगायत यांना ७ हजार ३९४ तर कॉग्रेसच्या सारिका नंदेश्वर यांना ६ हजार ७४० मते मिळाली. वरोरा नगर पालिकेत काँग्रेसच्या अर्चना ठाकरे २ हजार ७८५ मतांनी विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या माया राजूरकर यांचा पराभव केला. ठाकरे यांना ११ हजार ३९६ तर राजुरकर यांना ८ हजार ६११ मते मिळाली. भिसी या एकमेव नगर पंचायतीत भाजपचे अतुल पारवे नगराध्यक्ष पदी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे विक्की कटारे यांचा ५२१ मतांनी पराभव केला. पारवे यांना २ हजार ७४० तर कटारे यांना २ हजार २१९ मते मिळाली. 
            जिल्ह्यात दहा पालिकेत २४८ नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक १४० नगरसेवक निवडून आले. त्या पाठोपाठ भाजप ७२, शिंदे शिवसेना १४, अपक्ष १६ , ठाकरे शिवसेना ९, अजित पवार राष्ट्रवादी ७, बसप १, वंचित ४, शरद पवार राष्ट्रवादीचा १ नगरसेवक निवडून आला. नगर पालिकेची पहिलीच निवडणूक असलेल्या आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, आमदार देवराव भोंगळे पूर्णत: अपयशी ठरले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा येथे विजय तर भद्रावतीत पराभव झाल्याने त्या वरपास झाल्या आहे. काँग्रेस विधीमंंडळ नेेते आमदार विजय वडेट्टीवार व भाजपचे किर्तीकुमार भांगडीया यांनी यश संपादन केले आहे. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मूल व बल्लारपूर या पालिकेत पराभव चाखावा लागला. तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा येथे भावाला विजय मिळवून दिला मात्र गडचांदूरात काँग्रेस पराभूत झाली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)