पुस्तकावर अतोनात प्रेम करणाऱ्या बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली ?(Why did Babasaheb, who had an immense love for books, burn the Manusmriti ?)
वृत्तसेवा :- महाड येथे २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बापूसाहेब (गंगाधर नीळकंठ) सहस्रबुद्धे आणि सहा अन्य सहकाऱ्यांच्या साथीने, मोठ्या जनसमुदायासमोर मनुस्मृती दहन करून मानवी समतेची पायाभरणी केली होती. ही ऐतिहासिक घटना म्हणजे स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची आणि मानवतेची पडलेली ठिणगी होती. मनुस्मृती जाळली गेली, तेव्हा केवळ काही पाने आगीत झोकून दिली गेली नव्हती, त्या ज्वाळांमध्ये हजारो वर्षांचा अन्याय, अपमान, बहिष्कार आणि मानसिक गुलामगिरी भस्मसात होत होती. तो क्षण एका ग्रंथा विरोधातील निव्वळ प्रतीकात्मक निषेध नव्हता, तर माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारलेल्या कोट्यवधी शोषित, वंचित जीवांचा उसळलेला हुंकार होता. डॉ. आंबेडकर यांची ही कृती म्हणजे अत्यंत विचारपूर्वक केलेला निर्णय होता. ही प्रत्यक्ष कृती डिसेंबरच्या अखेरीला झाली असली तरी, एप्रिल १९२७ मध्ये डॉ. आंबेडकरांनी निपाणी येथील भाषणात, जाचक हिंदू ग्रंथ जाळूनच टाकले पाहिजेत असे म्हटले होते. डिसेंबरात त्यांनी मनुस्मृतीच्या रोखाने काही लेख लिहून अन्यायाच्या मुळांचा ऊहापोह केला होता. 'दुसऱ्या महाड परिषदे'त मनुस्मृती दहन हाच महत्त्वाचा कार्यक्रम ठरला, हे मात्र खरे. मनुस्मृती हा ग्रंथ इ.स.पूर्व सुमारे २०० ते इ.स. २०० या कालखंडात मनु नावाच्या ऋषी द्वारे रचला गेला,असे इतिहासतज्ज्ञ मानतात.या ग्रंथाने भारतीय समाजाला चार वर्णांमध्ये विभागून जन्माच्या आधारे माणसाचे मूल्य ठरवले. कर्तृत्व,बुद्धिमत्ता,श्रम किंवा नैतिकता यांना दुय्यम ठरवत जन्मालाच श्रेष्ठ-कनिष्ठतेचा निकष बनवण्यात आला. मनुस्मृतीने समाजाला शिकवले की काही लोक जन्मतःच श्रेष्ठ आहेत आणि काही लोक जन्मतःच नीच.ही कल्पना इतकी खोलवर रुजवली गेली की माणसाची ओळख त्याच्या कर्माने नव्हे,तर त्याच्या जातीने ठरवली जाऊ लागली.
भारताच्या प्राचीन व मध्ययुगीन काळात मनुस्मृतीमुळे समाजाची प्रचंड प्रमाणात विभागणी झाली होती. आधुनिक काळात १९०१ च्या ब्रिटिश जनगणनेनुसार भारतातील एकूण साक्षरता केवळ सुमारे पाच टक्के होती, तर दलित व मागास समाजातील साक्षरता १ टक्क्यांपेक्षाही कमी होती.बहुसंख्य समाज अज्ञानात ठेवला गेल्यामुळे देशाची बौद्धिक, वैज्ञानिक आणि सामाजिक प्रगती खुंटली. समाज एकसंध होऊ शकला नाही आणि म्हणूनच भारत शतकानुशतके परकीय सत्तांच्या अधीन राहिला.अंतर्गत भेदभावाने राष्ट्राची शक्ती आतूनच पोखरली. अशा अंधारात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रकाशस्तंभासारखे उभे राहिले. त्यांनी मनुस्मृतीकडे धर्मग्रंथ म्हणून नव्हे, तर गुलामगिरीचा लिखित जाहीरनामा म्हणून पाहिले. त्यांच्या मते हा ग्रंथ ईश्वरप्रणीत नसून माणसाने माणसावर केलेल्या अन्यायाचे समर्थन करणारा दस्तऐवज होता. म्हणूनच त्यांनी तो जाळला. बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले की मनुस्मृती जाळणे म्हणजे धर्म नष्ट करणे नाही, तर धर्माच्या नावाखाली चाललेली अमानवी व्यवस्था नष्ट करणे आहे. महाडमधील मनुस्मृती दहनाचा जो वृत्तान्त फेब्रुवारी १९२८ च्या 'बहिष्कृत भारत'मध्ये आला, त्यात प्रत्यक्ष दहनापूर्वीच्या एका संभाषणाचा आवर्जून उल्लेख आहे. एकाने विचारले, 'पण मनूची जात कोणती होती?' – यावर डॉ. बाबसाहेब उत्तरले : 'केसरी' म्हणतो की मनू क्षत्रिय होता, तर 'पुणे समाचार' म्हणतो की ब्राह्मण होता- पण आम्हाला मनूची जात कोणती होती या अजिबात रस नाही- आम्ही जातीवर नव्हे, व्यवस्था लादणाऱ्या 'स्मृती'वर टीका करतो आहोत. मनुस्मृती जाळली गेली,पण तिच्याविरुद्धचा लढा अजून संपलेला नाही.कारण विचार राखेतूनही जिवंत राहू शकतात. म्हणूनच बाबासाहेबांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे-अन्यायाविरुद्ध उभे राहा, प्रश्न विचारा आणि माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागा ! कोणाही व्यक्तीच्या जातीविरुद्ध ही लढाई नव्हती, हे डॉ. बाबासाहेबांनी त्याआधी व नंतरही वेळोवेळी स्पष्ट केलेले आहेच. Annihilation of Caste या ग्रंथात बाबासाहेब लिहितात की, जातीय व्यवस्था ही लोकशाही, बंधुता आणि राष्ट्रीय एकतेची सर्वात मोठी शत्रू आहे. मनुस्मृतीने दिलेल्या जन्माधारित विषमतेला त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून ऐतिहासिक उत्तर दिले.जिथे मनुस्मृती म्हणते 'तू जन्मतः नीच आहेस', तिथे संविधान म्हणते 'सर्व नागरिक समान आहेत'. जिथे मनुस्मृती गुलामगिरी शिकवते, तिथे संविधान स्वातंत्र्य, समता आणि मानवी प्रतिष्ठेची हमी देते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या