केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर, शासनाच्या दुर्लक्षामुळेच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टॉप टेनच्या बाहेर (A shocking revelation has emerged from a report published by the Central Ministry of Tourism: the world-famous Ajanta Caves have fallen out of the top ten due to government neglect.)

Vidyanshnewslive
By -
0
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर, शासनाच्या दुर्लक्षामुळेच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी टॉप टेनच्या बाहेर (A shocking revelation has emerged from a report published by the Central Ministry of Tourism: the world-famous Ajanta Caves have fallen out of the top ten due to government neglect.)

छत्रपती संभाजीनगर -: अजिंठा आणि वेरूळ लेणी ही स्थळे जागतिक वारसा स्थळे असून मराठवाडा व महाराष्ट्राचे भूषण आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या ठिकाणावर देशी - विदेशातील लाखो पर्यटक मोठ्या संख्येने दररोज हजेरी लावतात. तथापि विदेशातील पर्यटकाने भेटी दिलेल्या दहा अतिप्रसिद्ध ठिकाणात (टेन मोस्ट पॉप्युलर सेंट्रली टिकिटेड एएसआय मोन्यू फॉर फॉरेन व्हिजिटर्स) महाराष्ट्रातील अजिंठा वेरूळ लेणींसह जि. छत्रपती संभाजीनगर एकही स्थळाचा समावेश नसल्याचे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या अजिंठा लेणीपर्यंत रस्ता असताना अनेक ठिकाणी रस्त्याचे काम चालू असल्यामुळे पर्यटकांना त्याचा त्रास होत आहे. लेणीच्या परिसरात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक बसेसची व्यवस्था नसल्याने डिझेलच्या बसने प्रदूषण होत आहे. बुद्ध लेणीच्या आतील ठिकाणी असलेले रंग उडालेले आहेत. कारण याला जबाबदार प्रदूषण विभाग व शासन आहे. या परिसरात पर्यटकांसाठी ॲम्बुलन्स किंवा दवाखान्याची व्यवस्था नाही. पर्यटकांसाठी खाजगी दवाखाना किंवा सरकारी दवाखाना जवळपास नाही. रुग्णाला अटॅक किंवा काही प्रॉब्लेम झाला तर फारदापूर, सिल्लोड किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हलवावे लागते. अनेक ठिकाणी मधमाशांचे पोळ असल्याने पर्यटकांना त्या ठिकाणी भीतीचे वातावरण तयार झाले आहे, या अजिंठा लेणीच्या बसस्थानकापासून पार्किंगपासून पावसाळ्यात खूपच पाणी साचलेले असते. याच परिसरात कुत्र्यांनी अनेक ठिकाणी घाण केलेली आहे. लेणीच्या ठिकाणी एक नदी वाहत आहे. या नदीवर लाकडी फळ्या असल्याने त्या सडलेल्या आहेत. त्या केव्हाही पडू शकतात. त्यामुळे एखादा मोठा अपघात होऊ शकतो, तसेच बसस्थानकापासून जाणाऱ्या गाड्या यामध्ये रस्त्यातील झाडे झुडुपांच्या फांद्या गाडीत शिरतात. त्याचा नाहक त्रास पर्यटकांना होतो आहे. अजिंठा लेणीमध्ये थंड पाण्याचे वॉटर कुलर गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. बसस्थानकाजवळ पर्यटकांना उभे राहण्यासाठी शेड नाही. त्यामुळे पर्यटकांना उन्हात किंवा पावसात तासन् तास थांबावे लागते. ८८ करोड रुपये खर्च करून बनविलेले अजिंठा अभ्यास केंद्र सात ते आठ वर्षांपासून बंद आहे. यामध्ये चार बुद्ध लेणीची हुबेहुब प्रतिकात्मक लेण्या आहेत. त्यासुद्धा बंद आहेत. पर्यटकांना खाण्या पिण्याची व एटीएमची सुविधा नाही, स्वस्त भोजन नाही, खाजगी हॉटेलवाले लुटतात, नेटवर्कची सुविधा नाही, त्यामुळे पर्यटकांना नाहक त्रास होतो.
            केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने राज्यातील दहा ऐतिहासीक तसेच सांस्कृतिक वारसा स्थळांचा समावेश मस्ट सी इंडियन हेरिटेजच्या यादीत केला आहे. यात दहा पैकी पाच स्थळे ही एकट्या संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत. यात अजिंठा, वेरूळ लेणी, औरंगाबाद लेणी, देवगिरी किल्ला आणि बीबी का मकबरा या स्थळांचा समावेश आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने इंडिया टुरिझम डाटा कॉम्पेंडीयम हा २६० पानांचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला असून यातून ही बाब समोर आली. वर्ष २०२३-२४ मध्ये देखील या टॉप टेनमध्ये महाराष्ट्र नव्हता. यंदा मात्र समावेश होण्याची अपेक्षा होती. पर्यटन आणि पुरातत्व विभागाने यासाठी विदेशी पर्यटकांसाठी बरेच विशेष उपक्रम राबविले होते. या दहा ठिकाणात ताज महल, आग्रा किल्ला, कुतुब मिनार, हुमायूची कबर, फत्तेपूर शिक्री, नालंदा, लाल किल्ला आदी स्थळांचा समावेश आहे. तर, अहवालानुसार, वर्ष २०२४-२५ मध्ये अजिंठा लेणीला २०,८५५ तर वेरूळ लेणीला २०,७१० विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. तर बीबी का मकबरा १०,६१२ देवगिरी किल्ला ४,०३२ तर औरंगाबाद लेणीला १,६०९ विदेशी पर्यटक येऊन गेले. २०२३-२४ मध्ये अजिंठा लेणीला १८,८२९ तर वेरूळ लेणीला १९,६४३ विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या. दिलेल्या दहा अती प्रसिद्ध ठिकाणात मात्र महाराष्ट्रातील एकही ठिकाणाचा समावेश नाही. पण सर्वाधिक विदेशी पर्यटकांनी भेटी दिलेल्या राज्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानी आहे. तर स्थानिक (देशातील) पर्यटकांनी भेटी दिलेल्या स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील बीबी का मकबरा (२० लाख) आणि वेरूळ (१७.३० लाख) लेणीचा समावेश झाला असून त्यांचा क्रमांक अनुक्रमे ५ आणि ६ असा आहे. शिवाय स्थानिक पर्यटकांनी भेटी दिलेल्या पहिल्या पाच राज्यांतही महाराष्ट्राचा समावेश नाही. उत्तरप्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानचा यात समावेश आहे.
            जगप्रसिद्ध बुद्ध अजिंठा लेणीच्या विकासाच्या बाबतीत बुद्ध धम्म जन जागृती अभियानातर्फे अभियानाचे प्रमुख रमेश डावकर, विशाल बनकर, ॲड. नामदेव सावंत, प्रथम कांबळे, भगवान किर्ते, दीपक अण्णा सतदिवे, भीमराव नवतुरे, नितीन साळवे, संदेश जाधव आदींनी या बाबतीत सर्व्हे करून अनेक ठिकाणचे महत्वाचे फोटो काढून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तक्रार केली. त्यांनी महाराष्ट्र सरकार यांना लेखी पत्र दिले. रमेश डावकर यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना याबाबतीत भेटून लेखी पत्र दिले. त्यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना पत्र काढून त्यांचेसोबत बैठक घेऊन प्रलंबित असलेली लेणीचे कामे तातडीने सुरु करण्याचे आदेश केले. मात्र कोणीही त्याची दखल घेतली नाही, यामुळे केवळ शासन व प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे अजिंठा लेणीचा विकास झाला नाही. म्हणून विदेशी पर्यटकांनी याची दखल घेत अजिंठा लेणीला टॉपटेनच्या बाहेर ठेवले असल्याची खंत रमेश डावकरसह शेकडो पर्यटकांनी व्यक्त केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)