डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश !
नागपूर :- नागपूरजवळील चिंचोली गावात शांतिवन ही एक शांत, प्रसन्न पण इतिहासाच्या स्पंदनांनी भरलेली भूमी आहे. नाव जरी शांततेचे असले तरी या भूमीने जपलेली कथा संघर्षाची, समर्पणाची आणि बाबासाहेबांवरील अपार प्रेमाची आहे. इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनमोल स्मृती त्यांचा सूट, पुस्तकं, पदव्या आणि संविधान टाईप केलेली टाईपरायटर अत्यंत जपून ठेवण्यात आली आहेत. या सर्व वस्तू बाबासाहेबांचे खास सचिव नानकचंद रत्तू यांनी वामनराव गोडबोले यांच्याकडे सुपूर्द केल्या. आणि या स्मृती जतन व्हाव्यात म्हणून एका ओबीसी उपासिका देविकाबाईंनी तब्बल १४ एकर जमीन दान केली. हीच बाबासाहेबांप्रतीची खरी भक्ती… शब्दांच्या पलीकडील समर्पण! संजय पाटिल सध्या हया वास्तुची निगरानी करतात. त्यानी बराच पाठ पुरवा शासन दरबारी केला होता. पण इतक्या मौल्यवान वस्तू फक्त एका छोट्याशा खोलीत ठेवलेल्या हे नक्कीच मनाला खटकणारे. सरकारने मोठ्या संग्रहालयाची घोषणा केली होती, पण निधीअभावी काम अर्धवट राहिले… तब्बल ६ वर्षे हा प्रकल्प थांबलेलाच राहिला. हजारो भाविक दरवर्षी शांतिवनात येतात, पण एकच प्रश्न कायम उभा होता “हे स्मारक पूर्ण का होत नाही?” अशा वेळी सामाजिक न्याय विभागात प्रधान सचिव म्हणून डॉ. हर्षदीप कांबळे साहेब रुजू झाले. त्यांनी शांतिवन पाहिलं आणि मनोमन ठरवलं हे काम पूर्ण करायचंच! यानंतर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय सिरसाट यांनी प्रत्यक्ष शांतिवनाला भेट देऊन पाहणी केली. १३ डिसेंबर रोजी अधिकाऱ्यांची बैठक झाली, आणि १४ डिसेंबर २०२५ रोजी मंत्री महोदय स्वतः शांतिवनात उपस्थित राहून संपूर्ण स्थितीची तपासणी करून गेले. आणि दुसऱ्याच दिवशी डॉ. कांबळे साहेबांनी १५ कोटी रुपये देण्याचा ऐतिहासिक शासनादेश जारी केला ! हा निधी म्हणजे फक्त पैशांची मदत नाही… ही बाबासाहेबांच्या स्मृतींप्रतीची निष्ठा, सामाजिक कर्तव्याची जाणीव, आणि समतेच्या मूल्यांची जिवंत साक्ष आहे. यापूर्वीही डॉ. कांबळे साहेबांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले अट्रॉसिटीतील ८९८ पीडित कुटुंबांना सरकारी नोकऱ्या मिळवून देणं, आणि बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या PES सोसायटीस ५५० कोटींचा निधी उपलब्ध करून देणं...ही कामं म्हणजे त्यांनी बाबासाहेबांचे विचार प्रत्यक्ष कृतीत कसे जिवंत ठेवले आहेत याचं ज्वलंत उदाहरण. डॉ. कांबळे साहेब नेहमी म्हणतात “We are because He was.” आपण आहोत कारण बाबासाहेब होते… आणि त्यांचं ऋण आपण कर्मानेच फेडू शकतो. आज शांतिवनातील हे संग्रहालय नव्या उंचींकडे वाटचाल करत आहे. हे फक्त बांधकाम नाही, ही बाबासाहेबांच्या स्मृतींची जपणूक, समाजाच्या आशेची वास्तुरचना, आणि समतेच्या मार्गावरून पुढे जाण्याची प्रेरणा आहे. समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणारी काही माणसं असतात. त्यांच्या कृतीत माणुसकी दिसते, आणि त्यांच्या निर्णयांतून बदल घडतो. डॉ. हर्षदीप कांबळे साहेब असेच एक व्यक्तिमत्त्व !
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या