धक्कादायक ! काँग्रेसमध्ये संघटनात्मक गोंधळ : उमेदवार असतानाच देवेंद्र आर्य यांची पदावरून मुक्ती, अब्दुल करीम प्रभारी शहराध्यक्ष (Shocking ! Organizational chaos in Congress: Devendra Arya removed from his post despite being a candidate, Abdul Karim appointed as acting city president.)
बल्लारपूर :- नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठी संघटनात्मक उलथापालथ झाली आहे. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध प्रचार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवेंद्र सत्यदेव आर्य यांची पदावरून मुक्तता करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, देवेंद्र आर्य हे स्वतः नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी निवडणूक पार्श्वभूमीवर पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना खपवून घेतले जाणार नाही, अशा आशयाचे प्रसिद्धीपत्रक काढत बंडखोरांना तंबी दिली होती. मात्र, त्यांच्यावरच काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात प्रचार केल्याचा ठपका ठेवत थेट पदमुक्तीची कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात तसेच शहरात आश्चर्य आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कारवाईनंतर रिक्त झालेल्या बल्लारपूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी अब्दुल करीम अब्दुल रहीम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे. दरम्यान, ही कारवाई महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि, काँग्रेसच्या संघटनात्मक रचनेनुसार शहर काँग्रेस अध्यक्षांची नियुक्ती व पदमुक्ती ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अधिकारक्षेत्रात येते. त्यामुळे प्रदेश पातळीवरून थेट करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पक्षांतर्गत अधिकारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या निर्णयामुळे प्रदेश व जिल्हा नेतृत्वामधील अधिकारांच्या मर्यादांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणूक निकालानंतर या प्रकरणावर पक्षाकडून खुलासा होतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068



टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या