पुरोगामी महाराष्ट्राला हादरविणारी घटना, सावकाराच्या कर्जाची रक्कमेची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्याने विकली चक्क स्वतःची किडनी (A shocking incident that has shaken progressive Maharashtra: a farmer sold his own kidney to repay a loan from a moneylender.)

Vidyanshnewslive
By -
0
पुरोगामी महाराष्ट्राला हादरविणारी घटना, सावकाराच्या कर्जाची रक्कमेची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्याने विकली चक्क स्वतःची किडनी (A shocking incident that has shaken progressive Maharashtra: a farmer sold his own kidney to repay a loan from a moneylender.)

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात एक अत्यंत गंभीर व संतापजनक घटना समोर आली आहे. मिंथुर येथील पीडित शेतकरी रोशन कुडे यांनी त्यांनी काही वर्षांपूर्वी दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी सावकाराकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती असलेल्या कुडे या शेतकऱ्याला आसमानी, सुलतानी संकटांचा सामना करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. मात्र सततच्या नैसर्गिक आपत्ती मुळे दोन वेळेची सांज भागणे मुश्किल झाले. कुटुंबाचे पोट जगवण्यासाठी त्यांनी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरवले. गाई खरेदीसाठी त्यांनी दोन सावकारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये, असे एकूण एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. परंतु दुर्दैवाने खरेदी केलेल्या गाई मरण पावल्या आणि शेतीही पिकली नाही. परिणामी, कर्जाचा बोझा अधिकच वाढत गेला. कर्ज वसुलीसाठी सावकार वारंवार त्यांच्या घरी येऊन मानसिक त्रास देऊ लागले. या कर्जातून मुक्त होण्यासाठी रोशन कुडे यांनी दोन एकर जमीनही विकली, तसेच ट्रॅक्टर आणि घरातील मौल्यवान साहित्यही विकावे लागले. तरीसुद्धा कर्जाची रक्कम फेडता आली नाही. एका कर्जबाजारी शेतकऱ्याला सावकाराने किडनी विकून कर्जाची परत फेड करण्याचा दबाव आणला.आणी चारही बाजूने आर्थिक हतबल झालेल्या शेतकऱ्याने किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेमुळे खाजगी सावकारांचा पाश आणी शेतकऱ्यांची दारुण अवस्था सिद्ध होतांना याचे पडसाद राज्यात खोलवर उमटण्याची शक्यता आहे. एक लाख रुपयांवर दररोज दहा हजार रुपयांप्रमाणे पाशवी व्याज आकारले जात असल्याने सुरुवातीचे एक लाख रुपयांचे कर्ज वाढत जाऊन तब्बल ७४ लाख रुपयांपर्यंत पोहोचले. रोशन कुडे कर्ज आणी व्याजाची रक्कम देत नाही हे पाहून सावकारणी त्यांना किडनी विकून कर्ज फेडीचा सल्ला दिला. सावकाराच्या सल्ल्यानुसार हतबल शेतकऱ्याने कोलकाता आणि नंतर कंबोडियात जाऊन आपल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ८ लाख रुपयांमध्ये स्वतःची किडनी विकली. याबद्दल या पीडित शेतकऱ्यांनी या सावकारावर कारवाई करण्याची मागणी केली असली तरी या गंभीर प्रकरणी राज्यातील शेतकरी संघटना, संवेदनशील नेते,समाजिक संस्था, सत्ताधारी काय भूमिका घेतात याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे आणी जनतेचे लक्ष लागले आहे. रोशन कुडे यांना कर्ज देणारे आणि त्यासाठी किडनी विकण्यास बाध्य करणाऱ्या सहा सावकारांवर पोलिसांनी आज मंगळवारी नागभीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे यात ब्रह्मपुरी येथील मनीष घाटबांधे, किशोर बावणकुळे, लक्ष्मण उरकुडे, प्रदीप रामभाऊ बावणकुळे, संजय बल्लारपूरे, सत्यवान बोरकर यांचा समावेश आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता १२० (ब), ३२६, ३४२, २९४, ३८७, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ६ पैकी ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून २ आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मम्मूका सुदर्शन यांनी दिली. 

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)