चंद्रपूर जिल्ह्यातील सहा पीएचसींना ‘राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र’ जाहीर (Six PHCs in Chandrapur district have been awarded the 'National Quality Certificate'.)

Vidyanshnewslive
By -
0
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा पीएचसींना ‘राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र’ जाहीर (Six PHCs in Chandrapur district have been awarded the 'National Quality Certificate'.)

चंद्रपूर :- ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यात चंद्रपूर जिल्ह्याने मोठी झेप घेतली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांनी केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून दिला जाणारा 'राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक' (NQAS) हा अत्यंत मानाचा बहुमान पटकावला आहे. बाह्य परीक्षकांनी केलेल्या कडक मूल्यमापनात राजोली (ता. मुल) प्राथमिक आरोग्य केंद्राने 88.55 टक्के गुण, नेरी (ता. चिमूर) प्रा.आ.केंद्राने 88.99 टक्के गुण, वाढोणा (ता. नागभीड) प्रा.आ.केंद्राने 87.38 टक्के गुण, बाळापुर (ता. नागभीड) प्रा.आ. केंद्राने 89.84 टक्के गुण, मोहाडी नलेश्वर (ता. सिंदेवाही) प्रा.आ.केंद्राने 92.92 टक्के गुण व कळमना (ता. बल्लारपूर) प्राथमिक आरोग्य केंद्राने 93.51 टक्के गुण मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. असे झाले 'क्वालिटी' ऑडिट नोव्हेंबर 2025 या महिन्यामध्ये या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे, केंद्रीय पथकाद्वारे सूक्ष्म निरीक्षण करण्यात आले. यामध्ये दवाखान्याची स्वच्छता, औषधांची उपलब्धता, रुग्णांना मिळणारी वागणूक, गुणवत्ता पूर्ण सेवा, प्रसूती कक्षातील सोयी, प्रयोगशाळेतील अचूकता आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे कर्मचाऱ्यांचे कौशल्य, जंतुसंसर्ग नियंत्रण, मागील वर्षभरात किती रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला व लाभार्थ्यांचे अभिप्राय अशा सर्व निकषानुसार या संस्थेचे मूल्यमापन करण्यात आले.
        गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी पुढील 'ॲक्शन प्लॅन' केवळ प्रमाणपत्र मिळवणे हे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट नसून ही गुणवत्ता निरंतर टिकवून ठेवण्यासाठी खालील बाबींवर विशेष भर दिला जाणार आहे. यात 1) मूल्यमापन अहवालात सुचवलेल्या किरकोळ त्रुटी दूर करून 100 टक्के उद्दिष्टाकडे वाटचाल करणे. 2) रुग्णांना अधिक आपुलकीची आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम सेवा मिळावी यासाठी कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण घेणे. 3) स्थानिक स्तरावर गुणवत्ता नियंत्रण समिती स्थापन करून दरमहा आरोग्य सेवांचा आढावा, 4) रुग्णांच्या सूचना आणि तक्रारींसाठी विशेष यंत्रणा राबवून त्याद्वारे सेवेचा दर्जा अधिक सुधारण्यावर भर राहणार आहे. आरोग्य संस्थाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे प्रमाणपत्र हा केवळ कागदोपत्री सन्मान नसून जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या उत्तम आरोग्याचा पुरावा आहे. आमच्या सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सांघिक परिश्रमाचे हे फळ आहे, जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या विशेष नियंत्रणाखाली आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत असल्यामुळे जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे. जिल्ह्यातील जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केद्रांनी 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून या प्रमाणपत्रामुळे आता केंद्राकडून विशेष प्रोत्साहनपर निधी मिळणार व त्यातून आरोग्य सेवांचा चेहरामोहरा बदलणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी सांगितले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)