राज्यातील २६४ नगरपालिका/नगर पंचायतींसाठी मतदान सुरु, मात्र मतमोजणी 3 की २१ डिसेंबरला संभ्रम कायम, न्यायालयीन निर्णयाकडे लक्ष (Voting begins for 264 municipalities/nagar panchayats in the state, but confusion remains over whether counting will take place on December 3 or 21, focus on court decision)
वृत्तसेवा :- नऊ वर्षांनंतर होणाऱ्या राज्यातील २५० पेक्षा अधिक नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. नगरपालिका निवडणुकीत खरी चुरस ही महायुतीमधील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या महायुतीमधील तीन पक्षांमध्येच मुख्यत्वे आहे. राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध पार पडल्या. कायदेशीर पेच निर्माण झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने २४ संपूर्ण नगरपालिका तर १५० पेक्षा अधिक प्रभागांमधील निवडणूक स्थगित केली. या निवडणुकीत एक कोटीपेक्षा अधिक मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होत आहे. याशिवाय नगरपालिकांसाठी दोनसदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकेसाठी मतदारांना तीन मते द्यावी लागणार आहेत. नगर पंचायतीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी अशी दोन मते द्यावी लागतील. न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे २४ नगरपालिका आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी आता २० डिसेंबरला मतदान होईल. यामुळे बुधवारची अन्य ठिकाणची मतमोजणी रोखण्याच्या न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींची मतमोजणी एकत्रीत २१ डिसेंबरला घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगात सुरु आहेत. मंगळवारीच न्यायालयात त्यावर शिक्कमोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगरपालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने सारी ताकद पणाला लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी गेले आठवडाभर राज्यभर सभांचा धडाका लावला आहे. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोधी पक्षीयांमध्ये सर्वाधिक सभा घेतल्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रचारापासून दूर राहिले. पालिका निवडणुकीत लढत ही मुख्यत्वे भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातच दिसते. न्यायालयीन प्रक्रियेमुळे २४ नगरपालिका आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी मंगळवारी होणारे मतदान राज्य निवडणूक आयोगाने पुढे ढकलेले आहे. या ठिकाणी आता २० डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे बुधवारी होणारी मतमोजणी २१ डिसेंबर पर्यंत थांबविण्याची मागणी करीत काही उमेदवारांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केल्या असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेस विलंब झाल्याने २४ नगरपालिका आणि विविध पालिकांमधील १५४ सदस्यांची निवडणूक लांबणीवर टाकण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) या पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या