महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ.मिर्झा यांचे अमरावती येथे निधन (Maharashtra's famous poet and humorist Dr. Mirza Baig passes away in Amravati)

Vidyanshnewslive
By -
0
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट 
डॉ.मिर्झा यांचे अमरावती येथे निधन (Maharashtra's famous poet and humorist Dr. Mirza Baig passes away in Amravati)

अमरावती :- महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट, 'मिर्झा एक्सप्रेस 'फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज 28 नोव्हेंबर शुक्रवारला सकाळी 6.30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज - माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ' मिर्झा एक्सप्रेस ' या घरात त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, महाजबी व हुमा या दोन सुविद्य कन्या आहेत. त्यांच्यावर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानात दुपारी दोन नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉ.मिर्झा रफी अहमद बेग आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांचे एकूण २० काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपल्या 'मिर्झा एक्सप्रेस ' या काव्य मैफिलीचे ६ हजारावर सादरीकरण केले आहे. गेल्या काही दिवसापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर अमरावती येथे ईलाज सुरू होते. वयाच्या अकरा वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली होती.17 सप्टेंबर 1957 चा त्यांचा जन्म. 1970 पासून त्यांनी मंचावर कविता सादर करायला सुरुवात केली. पुढील 50 वर्ष विदर्भ, मराठवाड्यातील कवी संमेलनाचे ते केंद्रबिंदू ठरले. वृत्तपत्रातील विविध स्तंभातून लेखनही त्यांनी केले.त्यांचा 'मिर्झाजी कहीन ' हा त्यांचा स्तंभ तुफान लोकप्रिय ठरला होता.त्यांचे २० काव्यसंग्रह असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता.शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या, आणि सामाजिक समस्यांवर व राजकीय विरोधाभासावर नर्म विनोदी शैलीमध्ये लिखाण करणे ही त्यांची खास हातोटी होती.   
        विदर्भातील ख्यातनाम संत फकीरजी महाराज या मंदिर ट्रस्टचे ते ट्रस्टी होते. त्यांचे वडील मिर्झा रज्जाक बेग उर्फ भाईजी हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रभावी राजकीय सामाजिक व्यक्तिमत्व होते. विदर्भातील नागपूर येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधीज्ञ फिरदोस मिर्झा हे त्यांचे चुलत बंधू आहेत. मराठी, वऱ्हाडी भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांच्या कार्यक्रमांनी वऱ्हाडी भाषेची महती देशभर झाली.राजधानी दिल्ली पासून तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईपर्यंत त्यांचे कार्यक्रम सतत सुरू असायचे. मोठा माणूस, सातवा महिना, उठ आता गणपत, जांगडबुत्ता अशा कितीतरी कविता त्यांच्या लोकप्रिय झाल्या.जांगडबुत्ता या शब्दाचे ते जनक आहेत
      मुसलमान असूनही येते मला मराठी 
      ठोकू नका माई पाठ याच्यासाठी 
      जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा 
      पऱ्हाटीकून बोंडाचीच करानं आशा
अशा शब्दात त्यांचे काव्य लेखन असायचे.धर्मभेदाची अतिशय सोपी त्यांची व्याख्या होती. त्यामुळे ते सर्वधर्मीयांच्या गळ्यातील ताईत होते.
     हिंदू मुसलमानात काय आहे फरक
     हा म्हणते हटजा तो म्हणते सरक 
     काथा संग जसा चुना असते पानात 
     हिंदू संग मुसलमान तसा हिंदुस्थानात
अशा अनेक रचना त्यांच्या व्यासपीठावरून लोकांच्या कायम स्मरणात आहेत. ते लोककवी होते.संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे हजारो चाहते आहेत. त्यांच्या निधनाने वऱ्हाडी भाषेचा स्तंभ ढासळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)