जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने कॉफी टेबल बुकचे अनावरण, चंद्रपूर आणि गडचिरोली हे इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे, औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Unveiling of coffee table book by District Mineral Foundation, Chandrapur and Gadchiroli are industrial magnet districts, industrial development will create a prosperous economy: Chief Minister Devendra Fadnavis)

Vidyanshnewslive
By -
0
जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने कॉफी टेबल बुकचे अनावरण, चंद्रपूर आणि गडचिरोली हे इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे, औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Unveiling of coffee table book by District Mineral Foundation, Chandrapur and Gadchiroli are industrial magnet districts, industrial development will create a prosperous economy: Chief Minister Devendra Fadnavis)


चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्यावर आधारित रोजगार, आरोग्य ,पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुल (जि. चंद्रपूर) येथील विश्रामगृहात, जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुकचे अनावरण करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहन ठवरे व इतर अधिकारी उपस्थित होते. ज्या ठिकाणी उत्खनन होते, तेथील नागरिकांना खनिज निधीचा फायदा झाला पाहिजे, अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, खनिज उत्खनन आणि वाहतुकीमुळे जो त्रास स्थानिकांना होतो. त्यामुळे सर्वात जास्त वाटा स्थानिक लोकांनाच मिळाला पाहिजे.
         चंद्रपूर जिल्ह्याने खनिज क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम हाती घेतले आहेत. विशेष म्हणजे खनिज विकास निधीमधून रोजगार निर्मिती, आरोग्य, विकास, शिक्षण, कौशल्य आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली हा परिसर इंडस्ट्रियल मॅग्नेट म्हणून तयार होत आहे. त्यामुळे दीड लक्ष लोकांना रोजगार मिळणार आहे. पर्यावरणाचे संतुलन राखून हा विकास आपल्याला करायचा आहे. औद्योगिकरणासोबतच चंद्रपूरने पर्यावरण संतुलन राखले, असा संदेश गेला पाहिजे. कौशल्य विकास आणि रोजगारावर भर देऊन 100 टक्के स्थानिकांना रोजगार मिळेल, अशी व्यवस्था आपण उभी करणार आहोत. गतकाळात आपण 50 कोटी वृक्ष लागवड मोहीम यशस्वीरीत्या राबवली. यावेळी सुद्धा चंद्रपूरने वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट गाठावे. संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्र राज्याने ग्रीन कव्हर वाढवले असून आपला परिसर नैसर्गिक समृद्ध आहे. मात्र आता आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राचे वनक्षेत्र 33 टक्क्यांच्या वर नेण्याकरिता करिता विशेष लक्ष द्यायचे आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने खनिज विकास निधीतून अतिशय चांगले काम केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी तर आभार जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मानले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)