केंद्र शासनाच्या निरीक्षकांकडून ‘आदि कर्मयोगी’ अभियानचा आढावा (Central Government Inspectors Review 'Adi Karmayogi' Campaign)

Vidyanshnewslive
By -
0
केंद्र शासनाच्या निरीक्षकांकडून ‘आदि कर्मयोगी’ अभियानचा आढावा (Central Government Inspectors Review 'Adi Karmayogi' Campaign)

चंद्रपूर :- केंद्र शासनाच्या जनजातीय कार्य मंत्रालयाच्या संचालक व महाराष्ट्र राज्याच्या निरीक्षक दीपाली मासिरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवर व जिल्हा मास्टर ट्रेनर्स, ब्लॉक मास्टर ट्रेनर्स उपस्थित होते. सदर बैठकीत जिल्ह्यातील आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत सुरू असलेल्या कार्यक्रमांचे सादरीकरण प्रकल्प अधिकारी विकास राचेलवर यांनी केले. या बैठकीत विविध विभागांचे समन्वयन, आदिवासी समाजाच्या शाश्वत विकासासाठी सुरू असलेल्या योजनांची अंमलबजावणी, तसेच प्रलंबित कामे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
             दीपाली मासिरकर यांनी प्रत्येक जिल्हा व ब्लॉक लेव्हल्स मास्टर ट्रेनर्सच्या कामकाजाचा आढावा घेतला. तळागाळातील लोकांपर्यंत अभियानाचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याच्या सूचना देऊन त्या म्हणाल्या, ग्राम कृती आराखडा 30 सप्टेंबर 2025 पूर्वी पूर्ण करून 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये तो मंजूर करून घ्यावा. तसेच आदिसेवा केंद्र सक्रीय करून या अभियानाबाबतच्या पायाभूत सुविधा, उपजीविका वृद्धी या क्षेत्रांवर भर द्यावा. सर्व ग्रामसेवकांनी व्हिलेज ॲक्शन प्लॅन तयार करत असताना गावातील सर्व नागरिकांना त्यामध्ये समाविष्ट करायचे आहे. आदीसेवा केंद्र स्थापन झाल्यानंतर नागरिकांच्या ज्या काही समस्या आहे, त्या आदि सेवा केंद्रांतर्गत सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. पुढे त्या म्हणाल्या, व्हिलेज ॲक्शन प्लॅन तयार करत असताना गावातील आवश्यक असलेल्या बाबी सुटून जाणार नाही, याकडे आदि कर्मयोगी यांनी लक्ष द्यावे. सर्व आराखडे हे गावामध्ये शिवार फेरी करून करायचे आहे आणि त्याला 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये मंजुरी द्यायची आहे. सदर आराखडे हे जिल्हास्तरीय समितीकडे येतील आणि नंतर ते राज्यस्तरीय समितीकडे जातील. अभियानांतर्गत निश्चित केलेले सर्व उपक्रम दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दीपाली मासिरकर यांनी दिल्या. बैठकीत परस्पर सहकार्य वाढवून आदिवासी समाजाच्या शाश्वत विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरले. या भेटीदरम्यान दीपाली मासिरकर यांच्या हस्ते व मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकीत सिंह, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या उपस्थितीत लोहारा (ता. चंद्रपूर) व जानाळा (ता. मूल) येथे आदिसेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)