MJP कार्यालयाला ‘आप’चा निर्वाणीचा इशारा पाणीप्रश्नी ठोस उपाय न झाल्यास तीव्र आंदोलन (AAP warns MJP office of 'Nirvana', if water issue is not resolved, strong agitation)

Vidyanshnewslive
By -
0
MJP कार्यालयाला ‘आप’चा निर्वाणीचा इशारा पाणीप्रश्नी ठोस उपाय न झाल्यास तीव्र आंदोलन (AAP warns MJP office of 'Nirvana', if water issue is not resolved, strong agitation)


बल्लारपूर -: राज्य शासनाच्या ‘24x7 जल योजना’च्या गाजावाजास न जुमानता, बल्लारपूर शहर आजही गढूळ, दुर्गंधीयुक्त आणि अनियमित पाणीपुरवठ्याच्या संकटात होरपळत आहे. या प्रश्नावर आता आम आदमी पार्टी बल्लारपूर थेट आक्रमक पवित्र्यात आली आहे. शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) च्या विभागीय अभियंत्यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले असून, तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे. पाणीपुरवठा योजना कुठे अडकल्यात?
             2019 साली तत्कालीन अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जाहिर केलेली १०० कोटींची पाणीपुरवठा योजना ही बल्लारपूरकरांसाठी ‘स्वर्गीय वचन’ ठरली होती. शहराला 24x7 शुद्ध पाणीपुरवठा होईल असे सांगण्यात आले, पण २०२५ उजाडूनही ही योजना फक्त कागदावरच फिरते आहे. या योजनेसाठी सुसज्ज पंपिंग स्टेशन, नवीन जलवाहिन्या, फिल्टरेशन यंत्रणा यांचे वादळी उद्घाटन झाले, पण पाणी मात्र नाहीच! शहरातील बहुसंख्य वॉर्डांत अजूनही एक दिवसाआड गढूळ आणि कुजलेल्या वासाचे पाणी नागरिकांना मिळते आहे. हे अपयश केवळ प्राधिकरणाचे नाही, तर राजकीय पातळीवरही जबाबदारी झटकणाऱ्या यंत्रणेचे आहे.
‘आप’च्या निवेदनातील ठळक मुद्दे - 
1. शुद्ध पाण्याचा अभाव – नागरी आरोग्य धोक्यात अनेक वॉर्डांतून दररोज गढूळ, पिवळसर, दुर्गंधीयुक्त पाणी पुरवले जात असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे कावीळ, अतिसार, डायरिया यांसारखे आजार वाढण्याचा धोका आहे.
शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा हा फक्त सुविधा नाही, तर नागरिकांचा मूलभूत हक्क आहे.
2. अनियमित वेळा – नागरिकांमध्ये असंतोष:
पाणीपुरवठा कोणत्या वेळेस होईल याचा अंदाज नागरिकांना राहत नाही. त्यामुळे अनेकांना रात्रभर जागून पाण्याची वाट पाहावी लागते. महिलांमध्ये विशेष संताप आहे.
3. १०० कोटींच्या योजनेचे काय झाले?
‘२४ तास पाणी’ हे आश्वासन खोटे ठरवणारे चित्र आहे. योजनेची गंभीर अंमलबजावणी नसल्यामुळे कोट्यवधी रुपये वाया गेल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.
4. MJP कार्यालयात नागरिकांची अवहेलना
निवेदनात म्हटले आहे की, सामान्य नागरिक तक्रार घेऊन गेले की त्यांची अवहेलना होते, अपमानास्पद वागणूक दिली जाते. शासकीय कार्यालय हे जनतेसाठी खुले हवे, पण येथे अधिकारी लोकशाहीचा अपमान करतात, असा ‘आप’चा आरोप आहे. “हे निवेदन नाही, जनतेचा चेतावणीवजा आवाज आहे” – रवी पुप्पलवार शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की  “शुद्ध व मुबलक पाणी मिळवणे हे आमच्या नागरिकांचे जन्मसिद्ध हक्क आहेत. शासन जर हे देण्यात अयशस्वी ठरत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. MJP आणि स्थानिक प्रशासनाने जर तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर ‘आप’ रस्त्यावर उतरेल – आणि संघर्षाच्या माध्यमातून उत्तर मागेल.”
          या निवेदनप्रसंगी आम आदमी पार्टीचे प्रा. नागेश्वर गंडलेवार- जिल्हा उपाध्यक्ष, सय्यद अफजल अली- शहर उपाध्यक्ष, आसिफ हुसेन शेख- प्रवक्ता, सलमा सिद्दीकी- सहसंघटन मंत्री, किरण खन्ना- महिला अध्यक्ष, मनिषा अकोले- महिला उपाध्यक्षा, स्नेहा गौर- युवा उपाध्यक्षा तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अंतिम इशारा "पाणीप्रश्न हा निवडणूकपूर्व घोषणांचा विषय नसून, तो जीवनमरणाचा प्रश्न आहे" – असे ठाम मत ‘आप’ने निवेदनात मांडले आहे. त्यामुळे जर तात्काळ सुधारणा न झाल्या, तर बल्लारपूरमध्ये एक संघटित आणि निर्णायक जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा ‘आप’ने दिला आहे. बल्लारपूरचे पाणी प्रश्न फक्त तांत्रिक नाहीत, ते शासनाच्या उदासीनतेचे जळजळीत उदाहरण आहेत. ‘जनता हीच मालक आहे’ हे राज्यघटनेत लिहिले असले तरी त्याची अंमलबजावणी नागरिकांच्या नशिबावर सोडण्यात आली आहे. आता हा प्रश्न “कधी पाणी येईल?” असा राहिलेला नसून, तो – “कधी जनता उठून प्रशासनाला धडा शिकवेल?” असा झाला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)