शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल (For the rights of farmers, MLA Sudhir Mungantiwar has filed a written complaint against Coromandel International Limited at Ballarpur Police Station.)

Vidyanshnewslive
By -
0
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल (For the rights of farmers, MLA Sudhir Mungantiwar has filed a written complaint against Coromandel International Limited at Ballarpur Police Station.)
शेतकऱ्यांवर होणाऱ्या आर्थिक अन्यायाविरोधात कायदेशीर लढ्याची ठाम भूमिका

बल्लारपूर : शेतकऱ्यांना रासायनिक खत देताना जबरदस्तीने इतर उत्पादने खरेदीस भाग पाडणाऱ्या कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनी विरोधात आज, शनिवार, दि. ५ जुलै २०२५ रोजी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांना खताचा पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकारी यांनी खताचे वाटप आणि वितरण कसे करावे, याबाबत कोरोमंडल कंपनीला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्यानंतरही कोरोमंडल शेतकऱ्यांना अनावश्यक उत्पादने घेण्यास जबरदस्ती करीत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोमंडल कंपनीला दोन नोटीस दिल्या. लिंकींगचा हट्ट धरू नये, असे सुचवले. त्यानंतर ही कंपनी शेतकऱ्यांना डीएपीची खरेदी करताना सल्फर, पीडीएम पोटॅश आणि १५:१५:१५ खते जबरदस्तीने घ्यायला लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचे आ. मुनगंटीवार म्हणाले. ते पुढे म्हणाले, "या संदर्भात मी कृषी विभागाचे सचिव श्री. विकास रस्तोगी यांची वैयक्तिकरित्या भेट घेतली आणि चंद्रपूर जिल्ह्यात अशा प्रकारचे शेतकऱ्यांविरोधातील अन्यायकारक प्रकार होऊ नयेत, याबाबत त्यांचे लक्ष वेधले. 'जगाच्या पोशिंद्यांवर असा अन्याय होतो आहे,' हे त्यांच्यासमोर स्पष्टपणे मांडले.तसेच, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे विक्री व विपणन उपप्रबंधक श्री. प्रितम सिंह यांच्याशीही मी संवाद साधला. त्यांना विनंती केली की, शेतकऱ्यांवर जबरदस्ती थोपवू नका आणि झालेल्या चुका तात्काळ दुरुस्त करा."
            कोरोमंडल लिमिटेड आणि कंपनीचे विक्री व विपणन उपप्रबंधक प्रितम सिंह यांच्या विरुद्ध तक्रार देताना भाजपचे स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक अधिनियमांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशीही आ.सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केली आहे. "शेतकऱ्यांचे शोषण थांबले नाही, तर यापुढे आंदोलनात्मक मार्गही अवलंबण्यात येईल," असा इशाराही आ.मुनगंटीवार यांनी यावेळी दिला. कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय शेतकऱ्यांना रासायनिक खत पुरवठा करताना जबरदस्तीने इतर वस्तू विकत घेण्यास भाग पाडणाऱ्या खत पुरवठाधारकांविरोधात कायदेशीर लढा उभारण्याचा निर्णय आ. श्री. मुनगंटीवार यांनी घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून आज तक्रार दाखल करण्यात आली. शेतीसाठी अत्यावश्यक असलेले रासायनिक खत कोरोमंडलसारख्या नामांकित कंपन्यांकडून वितरित केले जाते. मात्र, या खतांच्या वितरणासोबत अन्य वस्तूंची "लिंकिंग" करून छोट्या विक्रेत्यांवर जबरदस्ती केली जाते. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो, कारण त्यांना ही अनावश्यक उत्पादने खरेदी करूनच खत मिळते. परिणामी, त्यांच्या आर्थिक शोषणाची स्थिती निर्माण होते. याकडे आ. श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)