प्रियदर्शिनी सभागृह येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन, धरती आबा जनभागिदारी अभियान शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा - आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके (District level program organized at Priyadarshini Auditorium, Dharti Aaba Jan Bhagidari Abhiyan to reach the last phase - Tribal Development Minister Dr. Uike)

Vidyanshnewslive
By -
0
प्रियदर्शिनी सभागृह येथे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन, धरती आबा जनभागिदारी अभियान शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा - आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके (District level program organized at Priyadarshini Auditorium, Dharti Aaba Jan Bhagidari Abhiyan to reach the last phase - Tribal Development Minister Dr. Uike)
चंद्रपूर :- जल, जंगल, जमीन मुक्तीसाठी ज्यांनी वर्षानुवर्षे लढा दिला, अशा आदिवासींचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान आणि पी.एम. जनमन योजना सुरू केल्या आहेत. आदिवासी बांधवांना ग्रामस्तरावरच योजनांचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्र उपलब्ध व्हावे, हा मुख्य उद्देश ठेवून चंद्रपूर मध्येही हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचविण्यासाठी लोकचळवळ म्हणून काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरद्वारे प्रियदर्शिनी सभागृह येथे धरती आबा जनभागीदारी अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. महापालिका आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, श्री. लाटकर आदी उपस्थित होते. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त धरती आबा जनभागिदारी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे, असे सांगून मंत्री डॉ. उईके म्हणाले, या अभियानाच्या लाभापासून कोणीही वंचित राहता कामा नये. धरती आबा अभियानाचा लाभ प्रत्येकाला मिळावा, यासाठी गावागावात जनजागृती करून यात लोकसहभाग वाढवावा. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता, आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या इतर नागरिकांनीही हे अभियान यशस्वी करावे. या अभियानांतर्गत 17 विभागाच्या 25 योजनांद्वारे सेवा देण्यात येते. विशेष म्हणजे आदिवासी समाजामध्ये येणाऱ्या 45 पैकी 42 जातींसाठी भरती आबा योजना आहे. आपल्या गावातील कोणीही या योजनांपासून वंचित राहणार नाही, असा संकल्प करावा. चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावांचा धरती आबा अभियानमध्ये समावेश आहे. आदिवासी संस्कृतीमुळेच आपली ओळख निर्माण झाली आहे, याअनुषंगाने धरती अबा अभियानाकडे पहावे. आदिवासी सांस्कृतिक सभागृहासाठी जागा उपलब्ध असल्यास विभागाद्वारे त्वरित निधी देण्यात येईल. तसेच धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी खासदार डॉ. किरसान म्हणाले, आदिवासींच्या बाबतीत प्रशासन लोकाभिमुख व्हावे, आदिवासींना योजनांचा लाभ वेळेवर मिळावा, हा या अभियानाचा उद्देश आहे. केवळ ठराविक कालावधीसाठीच नव्हे तर हे अभियान वर्षभर राबवावे.
             आदिवासी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय - आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हे या जिल्ह्याचे पालकमंत्री असून आदिवासींच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहे, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. आदिवासी बांधव हा शक्तिशाली असून जयसेवा म्हणताना समाजाची सेवासुद्धा अपेक्षित आहे. जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाचे अतिशय चांगले नियोजन केले असून आदिवासी बांधव समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात राणी हिराईचा पुतळा व आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचे भव्यदिव्य निर्माण व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.
            अभियानात आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी विनय गौडा धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत योजनांचा लाभ ग्रामस्तरावरच देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेमध्ये जिल्ह्यातील 167 गावांचा समावेश आहे. योजनांच्या लाभापासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी प्रशासन एकजुटीने काम करत आहे. सर्व आदिवासी बांधवांनी या अभियानात सहभागी व्हावे व हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. लाभार्थ्यांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र वाटप : यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते वनहक्क पट्टा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात गोदाबाई कुमरे, पार्वता किन्नाके, धर्मराव तोडासे, दिवाकर मडावी, पुरुषोत्तम गेडाम आदींचा समावेश होता. शबरी घरकुल अंतर्गत निमकर पंधरे, मिलिंद शेडमाके, राकेश मडावी, मारुती कुळमेथे येथे यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच जातवैधता प्रमाणपत्र श्रेयस पेंदोर, सोमांश कुमरे, मोहित चांदेकर, नाविन्य तळेकर, तन्वी गेडाम, श्रुती वरठी, शिवानी गेडाम यांना तर अमर गेडाम यांना वाहन खरेदी कर्ज वाटप प्रमाणपत्र देण्यात आले. तत्पूर्वी मान्यवरांनी येथे लागलेल्या विविध स्टॉलची पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी तर संचालन सपना पिंपळकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)