बौद्ध धम्मात याच पौर्णिमेपासून वर्षावास प्रारंभ होतो. याच दिवशी बुद्धांनी सर्वात पहिले "धम्मचक्रप्रवर्तन" केले. त्याचा इतिहास आपण जाणून घेऊ यात .. पहिले धम्मचक्रप्रवर्तन, पहिला वर्षावास - सारनाथ , उरुवेला (बुद्धगया) वरून इसीपतन मिगदाव वनात जाताना बुद्धांनी गयाचा मार्ग घेतला. वाटेत त्यांना एक आजीवक भेटला व त्याच्याशी वार्तालाप करताना बुद्ध त्याला म्हणाले "मी जीन आहे. बुद्ध आहे कारण मी सर्व अस्रवांचा, सर्व पाप धर्माचा नाश केला आहे". ललितविस्तार या ग्रंथात नमूद केल्या प्रमाणे गया येथील सुदर्शन नागराज याच्या निवास्थानी मुक्काम व भोजन घेतले. त्यानंतर चारिका आणि पिण्डपात करत इसीपतन मिगदाव वनात पोहचले. तेथे त्यांची भेट त्यांना आधी सोडून गेलेल्या ५ परिव्राजकांशी झाली. इथेच सम्राट अशोकांनी स्तंभ उभारला ज्याचे शीर्षस्थानी त्याची चार सिंह असलेले शिल्प आहे. दुसऱ्या दिवशी आषाढ पौर्णिमा होती आणि त्या दिवशी बुद्धांनी " धम्मचक्कापवत्तनसुत्त "चा उपदेश दिला. पहिल्यांदाच बुद्ध धम्म संघ सरणं गच्छामिचे स्वर वातावरणात उमटले. भ. बुद्धांचा हा प्रथम वर्षावास होता. त्यानंतर पाच दिवसांनी बुद्धांनी अनत्तलक्खण सुत्तचा उपदेश दिला. पाचही भिक्खू स्रोतापन्न अवस्थेत पोहचले आणि पाचच दिवसात अर्हत देखील झाले. ही प्रक्रिया इतकी सोपी नव्हती, मात्र या पाचही भिक्खुंनी त्या आधी अनेक वर्षे प्रचंड परिश्रम घेतले होते. त्यामुळे त्यांची मनाची तपोभूमी तयार झाली होती. बुद्धांची देशना ऐकून वाराणसीच्या श्रेष्ठीचा पुत्र यश प्रचंड प्रभावित झाला होता. त्याच्या बरोबर त्याच्या अनेक मित्रांनी परिव्रज्या घेतली. थोड्याच दिवसात यश आणि त्याच्या मित्रांनी स्रोतापन्न अवस्था गाठली आणि काही काळानंतर तेही अर्हत झाले. अतिशय श्रद्धापूर्वक, मनाची एकाग्रता न ढळू देता, बुद्धांनी सांगितलेल्या प्रत्येक उपदेश आणि विचारांचे ते पालन करत होते आणि त्यामुळेच ते थोड्या अवधीत अर्हत झाले. या पहिल्या वर्षावासात भ.बुद्धांच्या व्यतिरिक्त पृथ्वीवर त्यावेळेस ६० अर्हत झाले होते . त्यानंतरच्या अश्विन पौर्णिमेला या सर्व भिक्खूंना बुद्धांनी वेगवेगळ्या दिशेला धम्म प्रचारासाठी पाठवून दिले व स्वतः सेनानिगाम कडे जायला निघाले. या दोन पौर्णिमेच्या मधला काळ हा "वर्षावास" असतो .
वाराणसीच्या पुढे जाताना बुद्ध कप्पासिय वनखण्ड येथे पोहचले व तेथील ३० लोकांना प्रवज्या दिली. नंतर ते उरुवेला येथे पोहचले. त्याकाळी उरुवेलात तीन हट्टयोगी / जटिल साधू बंधू राहत होते. प्रत्येकाचा स्वतःचा मोठा शिष्यवर्ग होता. उरुवेला कश्यप, नदी कश्यप आणि गया कश्यप अशा या तिन्ही बंधूंनी बुद्धांचा मार्ग योग्य वाटल्याने परिव्राजित होऊन बुद्धधम्म संघात सामील झाले. बुद्धांचा हा संघ मग गया येथील गयासिस पर्वतावर गेला. (आत्ताचा ब्रह्मयोनी पर्वत ज्यावर १८०० मध्ये बाळाजी पंडित या मराठा सरदाराने मंदिर बांधले आणि १८४३ मध्ये राव साहेब सिंदिया यांनी पायथ्यापासून वर पर्यंत पायऱ्या बसवल्या.) याच पर्वतावर भ.बुद्ध यांनी "आदित्त परियाय सुत्त" ची देशना दिली. त्यानंतर सर्व संघाला घेऊन बुद्ध पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी राजगृहाला पोहचले. तेथे मगधराज बिम्बिसार त्यांना भेटायला आला. दुसऱ्या दिवशी भोजनानंतर बिम्बिसाराने भिक्खूसंघाला वेळूवन दान दिले. लिच्छवींच्या आग्रहाखातर बुद्ध वैशाली नगरीत गेले, मात्र त्यावेळेस तेथे भयंकर महामारीचा रोग पसरला होता. बुद्धांनी तेथे 'रतनसुत्त' चा उपदेश दिला व नगरवासियांचे सांत्वन केले. नंतर पुन्हा राजगृहाला येऊन दोन महिने वेळुवनात थांबले." धम्मचक्कप्पवत्तन सुत्तं "ला त्रिपिटक मध्ये कुठे नमूद केले आहे ते पाहुयात - त्रिपिटक : सुत्तपिटक, अभिधम्मपिटक, विनयपिटक सुत्त पिटक मध्ये ५ निकाय आहेत : दीघ निकाय, मज्झिम निकाय, संयुत्त निकाय, अङगत्तुर निकाय, खुद्दक निकाय " धम्मचक्कप्पवत्तन वग्गो मध्ये १० सुत्त आहेत. त्यातील पाहिले सुत्त आहे "धम्मचक्कप्पवत्तन सुत्तं" याच धम्मचक्कप्पवत्तन सुत्तंची देशना भ. बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खुंना आषाढ पौर्णिमेच्या दिवशी दिला. म्हणून या पौर्णिमेच्या दिवसाला "धम्मचक्कप्पवत्तन दिन" म्हणतात आणि या पौर्णिमेला विश्वातील या महागुरूंनी दिलेल्या देशनेमुळे "गुरू पौर्णिमा" म्हटले जाते. आपल्या सर्वांना "धम्मचक्कप्पवत्तन दिन" तथा गुरू पौर्णिमेच्या खूप सदिच्छा. म्हणूनच या दिवशी आपल्याला मार्ग दाखविणाऱ्या गुरुजनांना आदर दाखवायला सुरुवात झाली.
संकलन - अतुल भोसेकर - 9545277410
संपादक -: दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या