विद्यार्थ्यांसाठी 'एक खिडकी योजना' राबवा, संजय गांधी योजनेचा सर्वे तात्काळ पूर्ण करा – आ. किशोर जोरगेवार (Implement 'One Window Scheme' for students, complete the survey of Sanjay Gandhi Scheme immediately – MLA Kishore Jorgewar)

Vidyanshnewslive
By -
0
विद्यार्थ्यांसाठी 'एक खिडकी योजना' राबवा, संजय गांधी योजनेचा सर्वे तात्काळ पूर्ण करा – आ. किशोर जोरगेवार (Implement 'One Window Scheme' for students, complete the survey of Sanjay Gandhi Scheme immediately – MLA Kishore Jorgewar)

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; विविध विभागांच्या कामाचा आढावा


चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, पर्यटन, सामाजिक कल्याण, तसेच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांशी संबंधित अनेक प्रस्तावांवर चर्चा झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अविनाश नकवा, संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार सीमा गजभिये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमरशेट्टीवार, तांगडे, पगारे, निर्माण वर्धा रेल्वेचे कार्यकारी अभियंता वर्मा यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकश देवतडे, तुषार सोम, रवींद्र गुरुनुरे, रशिद हेसेन, नकुल वासमवार, करणसिंग बैस, कार्तिक बोरेवार, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजांमध्ये प्रवेश घेताना आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे. या प्रक्रियेत अडचण येऊ नये म्हणून प्रत्येक तहसील कार्यालयात नायब तहसीलदाराच्या नेतृत्वाखाली ‘एक खिडकी योजना’ तात्काळ सुरू करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश आमदार जोरगेवार यांनी या बैठकीत दिले. तसेच, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यावर त्यांनी भर दिला. सदर योजनेत २७०० अर्ज प्राप्त झाले असून, यातील १२०० नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्वेक्षण पुढील १५ दिवसांत पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. या बैठकीत चंद्रपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे मां सा कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. येत्या सप्टेंबर महिन्यात नव्या इमारतीतच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचनाही आमदार जोरगेवार यांनी दिल्या. रामाळा तलावात मत्स्योत्पादन व मासेमारीसाठी ‘वाल्मिकी मछुआ सहकारी संस्था मर्या., चंद्रपूर’ यांना कोणत्याही अटी व शर्तीशिवाय करार देण्याची शिफारस यावेळी करण्यात आली. यामुळे स्थानिक मच्छीमार समाजाला स्थिर रोजगार मिळेल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. तसेच, मध्य रेल्वेच्या तिसऱ्या लाईन प्रकल्पामुळे नझूल जमिनीवरील जे नागरिक विस्थापित होणार आहेत, त्यांना योग्य मोबदला मिळावा आणि म्हाडाच्या माध्यमातून त्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने योग्य नियोजन करावे, रस्ते पाण्याने डुंबू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देशही आमदार जोरगेवार यांनी यावेळी दिले. या बैठकीस वाल्मिकी मच्छुआ सहकारी संस्थेचे पदाधिकारीही उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)