राजुरा :- राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथील अंतरिक्ष बंडू रामटेके यांनी आपल्या जिद्द, अथक मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर देशातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) वाराणसी येथे प्रवेश मिळवून संपूर्ण परिसराचे नाव उज्वल केले आहे. अंतरिक्ष यांनी JEE मेन्स आणि JEE अॅडव्हान्स 2025 या दोन्ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत बनारस हिंदू विश्वविद्यालय अंतर्गत असलेल्या IIT वाराणसीमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण राजुरा तालुका आणि विरूर स्टेशन परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, सहज म्हणून दिलेल्या CET 2025 परीक्षेतसुद्धा अंतरिक्ष यांनी आपली चमक दाखवत 98.30 टक्के परसेंटाईल मिळवले. या निकालाने देखील ते महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले आहेत. अंतरिक्ष यांचे प्राथमिक शिक्षण गावातील क्राईस्ट इंग्लिश स्कूल मध्ये झाले. त्यानंतर इंदिरा गांधी गार्डन स्कूल, चंद्रपूर येथे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, इंदिरा गांधी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, विरूर स्टेशन येथून बारावी शिक्षण पूर्ण केले. याच काळात त्यांनी IIT मध्ये जाण्याचा निर्धार केला. घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असूनही कोणत्याही महागड्या कोचिंग क्लासचा आधार न घेता, केवळ ऑनलाइन साधनांचा वापर करून आणि वडिलांचे मार्गदर्शन घेत अंतरिक्ष यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या मेहनतीची आणि चिकाटीची ही गोष्ट आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा ठरत आहे. मेकॅनिकल अभियांत्रिकी या शाखेत विशेष रुची असलेले अंतरिक्ष लवकरच IIT वाराणसीमध्ये आपले शिक्षण सुरू करणार आहेत. या अभिमानास्पद यशाबद्दल संपूर्ण विरूर स्टेशन, राजुरा तालुका आणि चंद्रपूर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अंतरिक्ष यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या